नवी मुंबई येथे मंदिर विश्वस्तांचा मंदिरांसाठी संघटित होण्याचा निर्धार

मंदिरांसाठी संघटित झालेले विश्वस्त

नवी मुंबई, १३ ऑक्टोबर (वार्ता.) – सारसोळे (नेरूळ) येथील श्री गणेश शिव मंदिर येथे १२ ऑक्टोबर या दिवशी महाराष्ट्र मंदिर महासंघाची बैठक पार पडली. शहरातील विविध मंदिरांच्या अनेक विश्वस्तांनी या बैठकीत सहभाग घेतला. या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाची पंचसूत्री, कार्याची आवश्यकता यांविषयी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते वैद्य उदय धुरी यांनी उपस्थितांना माहिती दिली.

या वेळी वैद्य धुरी म्हणाले की, मंदिर विश्वस्त संघटित झाले, तर विविध आघातांचा सामना करणे सोपे जाणार आहे. त्याचप्रमाणे समाजाभिमुख कार्यक्रम राबवण्यासाठी साहाय्य होणार आहे.

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनी या वेळी ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’विषयी सविस्तर माहिती दिली. या कायद्याची आवश्यकता कशी आहे आणि यासाठी आपण विश्वस्त म्हणून कसे प्रयत्न करावेत ? याविषयी सांगितले. हा कायदा व्हावा, यासाठी सर्व विश्वस्त आणि भाविक यांनी संघटित होण्याची भावना व्यक्त केली. त्याचप्रमाणे याची जागृती जनमानसात करण्याचा निर्धार व्यक्त केला. या वेळी प्रत्येक मासातून एकदा विविध मंदिरांमध्ये भेटण्याची इच्छा सर्व विश्वस्तांनी व्यक्त केली आणि त्याप्रमाणे नियोजन करण्यात आले.