नाशिक येथील सिंहस्थपर्वाच्या पार्श्वभूमीवर ‘वैदिक संस्कार’ हा अल्पमुदतीचा अभ्यासक्रम शिकवणार ! – मंगलप्रभात लोढा, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री

२०६ नवीन अल्पमुदतीच्या रोजगार अभ्यासक्रमांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घघाटन

नाशिक – येथे वर्ष २०२७ मध्ये होणार्‍या सिंहस्थपर्वाच्या (मेळ्याच्या) पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ‘आयटीआय’मध्ये (शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये) ‘वैदिक संस्कार ज्युनिअर असिस्टंट’ हा नवा अभ्यासक्रम चालू करण्यात येणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयातील पत्रकार परिषदेत दिली. सिंहस्थपर्वात वैदिक पद्धतीने धार्मिक विधी करणार्‍यांची उणीव भासू शकते. त्यासाठी वरील प्रकारचा ३ ते ६ मासांचा अभ्यासक्रम सिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे वैदिक संस्कार करणार्‍या व्यक्ती सहज उपलब्ध होऊ शकतील. प्रत्येक सिंहस्थपर्वात अशा व्यक्तींचा अभाव जाणवत असल्याने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध ‘आयटीआय’ महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येईल.

शासनाकडून ‘अल्पमुदतीचे रोजगार अभ्यासक्रम’ हा एक अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत वरील अभ्यासक्रम आहे. या राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय तांत्रिक विद्यालय येथे नव्याने २०६ हून अधिक रोजगारक्षम अभ्यासक्रम अन् त्यांसाठी २ सहस्र ५०६ तुकड्या चालू करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ सप्टेंबर या दिवशी या अभ्यासक्रमांचे ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. या अभ्यासक्रमांत ‘ड्रोन तंत्रज्ञान’, ‘सायबर सुरक्षा’, ‘सौरऊर्जा’, ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’, ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’, ‘ग्रीन हायड्रोजन’, ‘भ्रमणभाष दुरुस्ती’, ‘समाजमाध्यम प्रभावीव्यक्ती’ आदी विषयांचा समावेश आहे.

यातील २५ टक्के जागा संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी आहेत. राज्यभरात ६०० ठिकाणी या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून या वर्षात ७५ सहस्र युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिलांसाठी ३६४ विशेष तुकड्या असणार आहेत.