संपादकीय : कराची गाठाच !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

‘ऑपरेशन सिंदूर’ चालू असूनही भारताला वाकुल्या दाखवणार्‍या पाकचे खोडसाळ चाळे काही केल्या थांबलेले नाहीत. ‘चोराच्या उलट्या बोंबा’ ही म्हण सार्थ करणारा पाक मिळेल त्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात भारताच्या विरोधात गरळओक करत आहे. क्रिकेट स्पर्धा, आंतरराष्ट्रीय परिषदा असे कोणतेही ठिकाण पाकने सोडलेले नाही. जनता भिकेला लागली असूनही सैन्यबळ वाढीसाठी तो प्रयत्नरत आहे. त्यातच ‘सर क्रीक’ या वादग्रस्त सीमाभागात सैन्य उपकरणे तैनात करून तो भारताला डिवचत आहे. ‘कच्छच्या ‘सर क्रीक’ भागात पाकिस्तानच्या कुरापती चालूच राहिल्या, तर पाकला ‘जशाच  तसे’ उत्तर देण्यात येईल. पाकचा इतिहास आणि भूगोल दोन्ही पालटून टाकू. आता लक्ष्य लाहोर नाही, तर कराची असेल. कराचीचा मार्ग ‘सर क्रीक’मधून जातो’, अशी चेतावणी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे पाकला दिली खरी; पण निगरगट्ट पाकिस्तान चेतावणीच्या पलीकडे गेला आहे, हे लक्षात घेऊन भारताने वाक्बाणांवर न थांबता त्याच्यावर अग्नीबाणांचा वर्षाव करणे अपेक्षित आहे.

जेव्हा एखादी गोष्ट बराच काळ निराकरण न होता तशीच रहाते, तेव्हा ती केवळ वाद न रहाता सवय बनते आणि पाकसारख्या शत्रूदेशाची सवय पालटण्यात भारताची शक्ती मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. त्यामुळेच ‘सर क्रीक’चा वाद, जो सवयीत रूपांतरित झाला आहे, त्यावर कायमचा तोडगा काढला जाणे आवश्यक आहे.

‘सर क्रीक’चे महत्त्व

सर क्रीक

भारत आणि पाकिस्तान यांच्यात कच्छच्या रणातील दलदलीचा ‘सर क्रीक’ या ९६ किलोमीटर लांबीच्या अरबी समुद्रापर्यंतच्या पाण्याच्या पट्ट्यावरून वाद आहे. ‘बाण गंगा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या भागाला एका ब्रिटीश अधिकार्‍याच्या नावावरून ‘सर क्रीक’ असे नाव देण्यात आले. ‘सर क्रीक’ हा भाग गुजरातच्या कच्छ प्रदेशाला पाकिस्तानच्या सिंध प्रांतापासून वेगळे करतो. ब्रिटीश भारताच्या ‘बाँबे प्रेसिडेन्सी’चा भाग असलेला हा पट्टा ७८ वर्षांपासून वादग्रस्त म्हणून ओळखला जातो. वर्ष १९६०-६५ च्या काळात पहिल्यांदा येथे वाद झाला. आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यात समाविष्ट असलेल्या थलवेग सिद्धांतानुसार २ देशांमधील नदीतील सीमा त्याच्या मध्यभागी चिन्हांकित केली पाहिजे; परंतु पाकिस्तान सिंध सरकार आणि कच्छचे राव महाराज यांच्यात झालेल्या वर्ष १९१४ च्या ठरावातील कलम ९ अन् १० चा हवाला देत संपूर्ण ‘सर क्रीक’वर दावा करत आहे. दुसरीकडे भारताचा दावा आहे की, दोन्ही देशांमधील सीमा वर्ष १९२५ च्या नकाशात दाखवल्याप्रमाणे खाडीतून जाते. या नकाशानुसार समुद्राच्या मध्यभागी खांबही उभारण्यात आले होते.

पाण्याची धूप आणि मोठ्या प्रमाणात येणारी भरती-ओहोटी यांमुळे बनलेल्या या दलदलीच्या भागाला तेल, नैसर्गिक वायू आणि मासे उत्पादन क्षेत्र यांमुळे दोन्ही देशांच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. सागरी सीमा वादामुळे ‘सर क्रीक’च्या खाली असलेले तेल आणि नैसर्गिक वायूचे संभाव्य स्रोत अद्याप शोधले गेलेले नाहीत; पण पाकिस्तानची त्यावर कुदृष्टी आहे.

पाकिस्तान ‘सर क्रीक’ परिसरात नियंत्रणरेषेविषयी वाद निर्माण करत असतांना भारत परंपरागत चर्चेच्या माध्यमातून उपाययोजना काढण्याचा प्रयत्न करतांना दिसतो. पाकिस्तानच्या सैन्याने ‘सर  क्रीक’ नियंत्रणरेषेच्या जवळ सैनिकी उपकरणे तैनात केली आहेत, तसेच त्या भागात तो विकासकामेही करत आहे. लेह ते ‘सर क्रीक’पर्यंतच्या भारत-पाकिस्तान सीमारेषेवरून भारतात घुसण्याचा पाकचा प्रयत्न असतो. भारताच्या सीमांचा प्रश्न केवळ नकाशावरील रेषा ठरवण्यापुरता मर्यादित नाही. या मर्यादांच्या पलीकडे दडलेल्या अर्थसंकल्पना आजच्या काळासाठी निर्णायक आहेत. त्यातही १ सहस्र वर्षे मोगलांच्या आणि नंतर १५० वर्षे ब्रिटिशांच्या गुलामीत गेल्यामुळे भारतासाठी हा राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहेच. त्यामुळेच आता जर पाक वादग्रस्त जागांवर मानवी, आर्थिक आणि सैन्यबळ यांची गुंतवणूक करत आहे, तर त्याचा उद्देश ‘हा भाग माझा आहे’ एवढे म्हणण्याइतका साधा नाही, हे लक्षात घ्यायला हवे. भारतावर दीर्घकालीन दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. सीमेवरील ‘सर क्रीक’ हा भाग आर्थिक आणि सामरिक लाभांचा स्रोत असल्यामुळे त्याचे नियंत्रण मिळवून पाक भविष्यकाळात सामर्थ्यशाली बनू पहात आहे.

सीमावादाचे निराकरण हे एखाद्या कराराइतके साधे नाही, ते बहुआयामी आणि काळानुरूप कार्यवाहीचे काम आहे. ‘सर क्रीक’सारख्या संवेदनशील ठिकाणी भारताची त्वरित आणि परिपूर्ण सामरिक उपस्थिती आवश्यक आहे. नौदल, तटरक्षक दल, तसेच अत्याधुनिक ड्रोन्स, सैन्य आणि तटरक्षक यांचे समन्वय केंद्र या प्रदेशावरील नियंत्रणासाठी आवश्यक आहे. ‘सर क्रीक’ येथील भारताच्या मोठ्या उपस्थितीमुळेही पाकचे मनोबल खच्ची होऊ शकते.

भारतीय सीमांचे निश्चितीकरण हवेच !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारताच्या सीमा स्पष्ट करून त्या पूर्णतः बंद करण्यास सांगितले होते, ते भविष्यातील शेजारी शत्रूदेशांची मानसिकता ओळखूनच ! शत्रूदेश असलेला पाकिस्तान, चीन यांच्यासह बांगलादेश आणि नेपाळ हे भारताचे शेजारी भारताविरुद्ध उभे रहात असल्याची अलीकडची उदाहरणे आहेत. काश्मीर प्रश्न चिघळत ठेवण्यासह आतंकवाद्यांना भारताच्या अनिश्चित सीमाद्वारांतून पाक त्याचे आतंकवादी नित्यनेमाने भारतात पाठवत आहे. बांगलादेशी घुसखोरांचा तर सुळसुळाट आहेच. चीनचे अक्साई चीनसह अन्य प्रदेशांवरील विस्तारवादी ‘सलामी स्लायसिंग’ (छोटे प्रदेश कह्यात घेणे) प्रयोग आणि नेपाळसारख्या पारंपरिक मित्रदेशांमधील ‘नकाशे बदलण्याचे’ राजकारण या सर्व वेगवेगळ्या घटना एकत्रितपणे पाहिल्यास भारताच्या अखंडतेवर, अर्थशक्तीवर आणि मनोवैज्ञानिक स्थितीवर आघात करणार्‍या रणनीतींचा भाग आहेत.

शत्रू केवळ एकच नसतो; विविध रूपांनी, विविध पद्धतीने, आणि विविध धोरणांनी तो उभा रहातो आणि आता तो जुन्या चाली खेळत नाही. काळानुसार नव्या, सूक्ष्म, बहुस्तरीय आणि आर्थिक-सांस्कृतिक स्वरूपाचा दबाव असे तंत्र तो वापरू लागला आहे. या पालटलेल्या चाली ओळखून भारताने स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितलेला देशाच्या सीमा बंद करण्याचा उपाय आजतरी करायला हवा. जर आताही भारत केवळ चेतावण्यांवर काम चालू ठेवणार असेल, तर पाकचा उद्दामपणा वाढत जाईल. त्यामुळे आता भारताला संयमाच्या सीमेचे उल्लंघन करावेच लागेल. भारतावर पुनःपुन्हा आक्रमण करण्याची पाकची सवय मोडण्यासाठी संरक्षणमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे ‘सर क्रीक’मधून कराचीपर्यंत पोचण्याची वेळ आली आहे. हीच वेळ साधून भारताने आता कराची गाठावीच, तरच पाकच्या आतंकवादी कारवायांना चाप बसेल.

भारताने पाकला सज्जड दम देऊन गप्प न बसता, त्याला जन्माची अद्दल घडवण्यासाठी कृती करणे आवश्यक !