POK Protest : पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाक सैन्याच्या गोळीबारात १० आंदोलनकर्ते ठार : १०० जण घायाळ

२५ सैनिकांना आंदोलनकर्त्यांनी ठेवले ओलीस !

पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन करतांना स्थानिक लोक

मुझफ्फराबाद (पाकव्याप्त काश्मीर) – पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्थानिक लोकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. येथील नागरिकांच्या मूलभूत गरजांवरील अनुदानात पाक सरकारकडून कपात करण्यात आल्याने हे आंदोलन चालू आहे. या आंदोलनाच्या वेळी पाकच्या सैन्याने केलेल्या गोळीबारामध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी पाकच्या २५ सैनिकांना पकडून ओलीस ठेवले आहे. या सैनिकांचा वापर मानवी ढाल म्हणून केला जात आहे, ज्यामुळे पाकच्या सैन्याला कोणतीही थेट कारवाई करणे कठीण झाले आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन करतांना स्थानिक लोक

१. आंदोलन मोडून काढण्यासाठी गुप्तचर संस्था गुप्त आक्रमणे करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. साध्या वेशातील अज्ञात व्यक्ती नेत्यांना लक्ष्य करतात आणि गर्दीत दहशत निर्माण करतात, असा आरोप त्यांनी केला.

२. जम्मू-काश्मीर संयुक्त अवामी कृती समितीच्या (जेकेजेएएसी – जम्मू-काश्मीर ज्वाईंट ॲक्शन कमिटीच्या) आदेशावरून हे आंदोलन केले जात आहे.

. या संघटनेने सरकारसमोर ३८ मागण्या ठेवल्या आहेत, ज्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरच्या विधानसभेतील पाकिस्तानच्या प्रतिनिधींना असलेल्या १२ राखीव जागा रहित करणे, या सूत्राचा समावेश आहे.

४. महागाईने लोक त्रस्त असल्याने पीठ आणि वीज देयक यांत सवलत देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.