आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त…

१. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या प्रत्येकाचे राष्ट्र आणि जग यांचा उत्कर्ष साधण्याचे ध्येय असणे
यंदाच्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शतकोत्तर प्रवास चालू केला आहे. चारित्र्यवान आणि राष्ट्रप्रेमी लोक निर्माण करणे, त्यातून राष्ट्र आणि जग यांचा उत्कर्ष साधणे या ध्येयाने संघाशी निगडित प्रत्येक जण अविरत कार्य करत आहे. राष्ट्रावर मानवनिर्मित किंवा नैसर्गिक कोणतीही आपत्ती आल्यास पीडित व्यक्तींच्या साहाय्यासाठी धावून जाणे आणि त्यात वैयक्तिक फळाची कोणतीही अपेक्षा न करणे हे संघाच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. समाजातील उपेक्षित, वनवासी, दुर्लक्षित व्यक्तींमधे राहून त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना सक्षम बनवणे, हे काम संघाने निरंतर चालू ठेवले आहे.
२. भारतमातेला उच्चासनावर नेण्याच्या ध्येयाला अभिवादन !
हे काम करणार्या प्रचारकांनी सुशिक्षित असूनही, तसेच लाभाचे अनेक पर्याय उपलब्ध असूनही त्याकडे पाठ फिरवून या कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. तळमळीने कार्य करणार्या राष्ट्रप्रेमी संघ कार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि भारतमातेला उच्चासनावर नेण्याच्या त्यांच्या ध्येयाला अभिवादन करतो आणि त्यांना सुयश इच्छितो.
३. संघ करत असलेली अखंड लोकसेवा जगात एकमेव !
संघाचे वैशिष्ट्य म्हणजे संघात व्यक्तीपूजेस मुळीच स्थान नाही. राष्ट्र सर्वतोपरी ठेवून ‘इदम् न मम’ (हे माझे नाही) म्हणत सतत राष्ट्रासाठी प्रयत्न करणे हाच जीवनयज्ञ समजून वागणे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. ‘कोविड’सारखी ‘न भूतो’ अशी राष्ट्रीय आपत्ती असतांना स्वतःच्या प्राणांचीही पर्वा न करता त्यांनी अखंड लोकसेवा केली. तिला जगाच्या इतिहासात तोड नाही.

४. भावाने संघासाठी आयुष्य समर्पित करणे; पण आतंकवाद्यांनी त्यांची हत्या करणे
माझे थोरले भाऊ प्रमोद दीक्षित यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ प्रचारक म्हणून संघासाठी आयुष्य समर्पित करण्याचे ठरवले आणि संघाच्या आदेशानुसार ते आसाममध्ये रुजू झाले. १९७३-७४ हे ते वर्ष होते. आम्ही ५ भाऊ होतो. ‘त्यातील एकाने देशसेवेसाठी स्वतःला अर्पण करावे’, असे ते आमच्या आईला सांगत. पुढे सरसंघचालक बाळासाहेब देवरस हेही आमच्या घरी आले होते. त्यांनी ‘प्रमोदजींनी स्वीकारलेला मार्ग योग्य आहे’, याला मान्यता दिली होती. आसाममध्ये शाळा किंवा रक्तपेढी चालवणे आणि इतर लोकोपयोगी कामे करणे हे देशद्रोही ‘उल्फा’च्या सदस्यांना मात्र खुपत होते. १४ ऑगस्ट १९९१ या दिवशी प्रमोदजी संघाच्या कार्यालयात बसलेले असतांना बंदूकधारी उल्फा आतंकवादी तेथे आले आणि प्रमोदजी यांचे नाव विचारून निश्चिती झाल्यावर त्यांच्यावर गोळीबार करून भ्याडपणे त्यांची हत्या करण्यात आली. स्थानिक लोकांनी मात्र प्रमोदजींचे बारपेटा येथे भव्य स्मारक बांधून त्यांच्या कार्याचा गौरव केला अन् त्यांना अमर केले.
५. रेशीमबागेत जाण्याचा योग !
वर्ष १९६६ मध्ये मी परिचितांच्या लग्नासाठी आईसमवेत नागपूरला गेलो होतो. तेव्हा आई मला घेऊन रेशीमबागेत घेऊन गेली होती. तेथे संघ संस्थापक प.पू. डॉ. हेडगेवार यांच्या समाधीचे आम्ही दर्शन घेतले होते. आमचे मूळ गाव भोर. माझे आजोबा भोरचे संस्थानिक पंतसचिव ! त्यांच्याकडे राजगुरु म्हणून काम करत असत. त्यावेळेस रथखाना येथे चालणार्या शाखेत जाऊन संघाची प्रार्थना गंभीरपणे म्हणण्याचा प्रसंग आजही माझ्या मनावर कोरलेला आहे.
६. कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यायला संघ सिद्ध !
पुढे भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्यानंतर माझी पोलीस आयुक्त, नागपूर म्हणून नेमणूक झाली. वर्ष २००६ मध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांनी संघाच्या मुख्य कार्यालयावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु सतर्क पोलिसांनी त्या सर्वांना थोपवून यमसदनी पाठवले. त्यामुळे पुढचा भीषण प्रसंग टळला. संघकार्यालयाची सुरक्षा हे महत्त्वाचे सूत्र होते. त्या अनुषंगाने मी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना भेटायला गेलेलो असतांना हसत हसत ते मला म्हणाले, ‘‘पोलिसांविना संघाची सुरक्षा करणारे आजूबाजूचे सर्व लोक सदैव सतर्क असतात. त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यायला आम्ही सिद्ध आहोत.’’
७. मुंबईत असताना प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत वेळात वेळ काढून आमच्या घरी आले होते. जवळ जवळ १ घंटा त्यांनी मोकळेपणाने गप्पा मारल्या.
८. संघाची अनेक कामे मी जवळून पाहिली आहेत. चारित्र्यवान लोकांनी ती केली असल्यामुळे त्यांच्याविषयीचा आदर सतत द्विगुणित झाला आहे.
भारतमाता की जय । नमस्ते सदा वत्सले मातृभूमे ।
– श्री. प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, मुंबई
धर्म आणि संस्कार यांची महती अन् हिंदु पालकांचे दायित्व
संस्कारक्षम पालकत्व कसे असावे ?
भ्रमणभाषच्या विळख्यात अडकलेली पिढी !
संस्कार, आरोग्य आणि राष्ट्रनिर्मिती : काळाची आवश्यकता !
मुलांच्या जीवनशैलीत सकारात्मक पालट होण्यासाठी ‘बालसंस्कार’ हे एकमेव प्रभावी माध्यम आहे !
‘एकल अभियाना’च्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रात परिवर्तन !