माजी पोलीस अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान याच्याविरुद्ध मानहानीचा आणखी एक खटला प्रविष्ट (दाखल)

समीर वानखेडे (उजवीकडे)

मुंबई – चित्रपट अभिनेते शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याने प्रथमच दिग्दर्शित केलेल्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या ‘वेब सिरीज’च्या (ऑनलाईन प्रसारित करण्यात येणारी व्हिडिओंच्या मालिकेच्या) विरोधात माजी ‘एन्.सी.बी.’चे (अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे) अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला प्रविष्ट (दाखल) केला आहे. हा खटला अभिनेते शाहरूख खान आणि त्यांची पत्नी गौरी खान यांच्या मालकीच्या ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’, ओटीटी (थेट इंटरनेटद्वारे प्रसारित मालिका किंवा चित्रपट) प्लॅटफॉर्म आणि ‘नेटफ्लिक्स’ यांच्याविरुद्ध प्रविष्ट केला आहे.

या वेब सिरीजमध्ये खोट्या आणि अपकीर्ती करणार्‍या गोष्टी सादर करण्यात आल्या आहेत.  या वेब सिरीजमध्ये अमली पदार्थविरोधी कार्यवाही करणार्‍या संस्थांविषयी नकारात्मक दृष्टीकोनातून निर्माण होईल, अशा पद्धतीने चित्रण केले गेले आहे. त्यामुळे या संस्थांवरील जनतेचा विश्वास अल्प होतो, असे समीर वानखेडे यांचे म्हणणे आहे. यात समीर वानखेडे यांच्यासारखे दिसणारे पात्र घेण्यात आले आहे. त्यामुळे याच्या प्रसारणावर मनाई आदेश देऊन हानीभरपाई देण्याची मागणी वानखेडे यांनी केली आहे.

समीर वानखेडे आणि आर्यन खान यांच्याशी संबंधित पूर्वीचा खटला सध्या मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबईतील एन्.डी.पी.एस्. विशेष न्यायालयात प्रविष्ट आहे.

वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार अन्य आक्षेपार्ह गोष्टी

१. यातील एक पात्र ‘सत्यमेव जयते’ असे म्हणून लगेच अश्लील हावभाव करते. हे कृत्य राष्ट्रीय चिन्हाचा भाग असलेल्या घोषणेचा अपमान असून तो ‘राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा १९७१’ अंतर्गत हा दंडनीय गुन्हा आहे.

२. यात अश्लील आणि आक्षेपार्ह सामग्री वापरून राष्ट्रीय भावना दुखावण्याचा प्रयत्न झाल्याने ‘माहिती तंत्रज्ञान कायदा’ आणि ‘भारतीय न्याय संहिता’ यांच्या विविध कलमांचे उल्लंघन झाले आहे.

समीर वानखेडे यांनी २ कोटी रुपयांची हानीभरपाई मागितली असून ही रक्कम कर्करोगाने ग्रस्त असणार्‍या रुग्णांच्या उपचारांसाठी ‘टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल’ला दान करण्याचा वानखेडे यांचा प्रस्ताव आहे.