हिंदूंनो, जागरूक व्हा आणि वारकरी संप्रदाय अन् हिंदु धर्मविरोधी ‘फेक नॅरेटिव्ह’ हाणून पाडा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आळंदी येथे वारकरी आणि धार्मिक शिक्षण संस्था यांचे संमेलन उत्साहात !

आळंदी (जिल्हा पुणे) – सध्या ‘धार्मिकता’ आणि ‘आधुनिकतावाद’ यांच्यात संघर्ष चालू आहे. सध्या माहिती युग असले, तरीही ‘आपल्या भ्रमणभाषमध्ये येणारी माहिती सत्य आणि योग्य आहे का ?’, याची निश्चिती केली जात नाही; म्हणून ‘खोटी कथानके’ बनवली जातात. सध्या ‘एआय’ आणि ‘चॅट जीपीटी’(संगणकीय कृत्रिम बुद्धमित्ता) याचा वापर चुकीची माहिती पसरवण्यासाठी अधिक प्रमाणात केला जातो. आजच्या जगात चुकीची माहिती पसरवणे, हे सर्वांत मोठे शस्त्र म्हणून वापरले जाते. तरी यापुढील काळात हिंदूंनी जागरूक होऊन वारकरी संप्रदाय अन् हिंदु धर्मविरोधी ‘फेक नॅरेटिव्ह’ हाणून पाडावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी केले. येथील ‘फ्रूटवाले धर्मशाळा’ येथे २० सप्टेंबर या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत ‘वारकरी आणि धार्मिक शिक्षण संस्था’ यांचे संमेलन उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. 

श्री. रमेश शिंदे

सनातन विद्या फाऊंडेशन, हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि स्वराज्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित केले होते. ४०० हून अधिक वारकरी उपस्थित होते. संमेलनात सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन कु. प्राची शिंत्रे आणि कु. क्रांती पेटकर यांनी केले.

व्यासपिठावर बसलेले (डावीकडून) श्री. राम डावरे, श्री. संजय शेठ थोरात, अधिवक्त्या रोहिणी पवार, श्री. दिलीप देशमुख, ह.भ.प. बाळासाहेब शेळके, ह.भ.प. बाजीराव बांगर महाराज, श्री. रमेश शिंदे, श्री. सुनील घनवट; वारकरी संमेलनात बोलतांना डॉ. अंकुश अगरवाल
सध्या हिंदुत्वाचे सरकार असले, तरी वैयक्तिक स्वार्थासाठी, लाभासाठी, पदासाठी सनातन संस्था कार्य न करता केवळ हिंदुत्वासाठी अविरतपणे अन् मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे. चंद्र-सूर्य असेपर्यंत भगवा ध्वज फडकत राहिला पाहिजे, या उद्देशाने सनातन संस्था कार्यरत आहे. – ह.भ.प. संग्रामबापू भंडारे महाराज

क्षणचित्रे

१   या वेळी वारकरी शिक्षण संस्था आणि देवस्थान यांचे विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२  वारकरी शिक्षण संस्था आणि देवस्थान समितीच्या विश्वस्तांनी त्यांना असलेल्या कायदेविषयक शंकांना श्री. दिलीप देशमुख यांनी सविस्तर मनमोकळेपणाने उत्तरे देऊन त्यांचे शंकानिरसन केले.

३   कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे) तोट्याचे पुरावे श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थितांना संगणकाद्वारे दाखवले आणि सावध रहाण्याचे आवाहन केले.

४  श्री. सुनील घनवट यांनी शहरी नक्षलवाद्यांचा खरा चेहरा दाखवणारे पुरावे सादर केले. त्यामुळे उपस्थितांना त्याचे गांभीर्य लक्षात आले.

५   वारकरी शिक्षण संस्थांसमोर असलेल्या समस्यांवर संघटित होऊन उपाय काढण्याची सिद्धता उपस्थितांनी दर्शवली.

६   सनातन विद्या फाउंडेशन आणि स्वराज्य संघटना यांचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत सेवाभावाने संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात त्यांनी सहभाग घेतला.

७   या वेळी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा महाराष्ट्रात व्हावा, यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात येणार आहे.

तुम्हाला तुमच्या धर्मापासून दूर करायचे षड्यंत्र चालू आहे ! – अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी 

श्री. अविनाश धर्माधिकारी

‘सर्वेत्र सुखिनः सन्तु ।’ हे केवळ हिंदु धर्मात आहे. इतर पंथ ‘आमचाच ईश्वर खरा आहे’, असे म्हणतात. तुम्हाला तुमच्या धर्मापासून दूर करायचे किंवा मारून टाकायचे षड्यंत्र चालू आहे. यासाठी जागतिक शक्तीकडून अर्थपुरवठा होत आहे. जगात सुख शांती नांदायला हवी असेल, तर हिंदु धर्मच हे देऊ शकतो.

ते म्हणाले की, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वरून सहजतेने हिंदु धर्माच्या विरोधात षड्यंत्र चालू आहे. ‘अल्लाविषयी विनोद सांगा’ असे विचारल्यास ‘धार्मिक भावना दुखावल्या जातात’, असे उत्तर येते; पण ‘विष्णु, दुर्गा आणि गणपति यांवर विनोद सांगा’, असे म्हटल्यास सहस्रो विनोद येतात, हे रोखले पाहिजे.

उपस्थित मान्यवर

प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे पीठासन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित, ह.भ.प. माणिक महाराज मोरे, श्री. गिरीशभाऊ कारेकर, ह.भ.प. बाळासाहेब शेळके, प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. संजयशेठ थोरात, ह.भ.प. बाळासाहेब मोरे, ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर, ह.भ.प. संग्रामबापू भंडारे, ह.भ.प. घुंडरे पाटील महाराज, राष्ट्रीय वारकरी सेनेचे कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर

आळंदी येथील संमेलनातील संत आणि मान्यवर यांचे मार्गदर्शन !

श्री. प्रकाश लोंढे म्हणजे ‘योजकः तत्र दुर्लभः’ !

‘सनातन विद्या फाऊंडेशन’चे संचालक श्री. प्रकाश लोंढे यांचा कार्यक्रमाच्या आयोजनात सिंहाचा वाटा होता. आयोजनातील प्रत्येक बारकाव्यांसह कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आळंदी, देहू पंढरपूर, जुन्नर, मंचर येथील शिक्षण संस्थांच्या विश्वस्तांना भेटणे, निमंत्रण देणे, आयोजन करणे आणि आर्थिक भार उचलणे अशा सर्व सेवा त्यांनी समर्थपणे अन् लीलया पार पाडल्या. त्यांच्या संदर्भात ‘योजकः तत्र दुर्लभः’ (कार्यक्रमांचे योग्य प्रकारे आयोजन करून सर्व सेवा आणि सुव्यवस्थापन उत्तमरित्या पार पाडणार दुर्लभ व्यक्ती) ही उक्ती सार्थ ठरते.

सर्व वारकरी शिक्षण संस्थांना अनुदान द्यावे ! – प्रकाश लोंढे, संचालक, सनातन विद्या फाऊंडेशन

संमेलनात बोलतांना श्री. प्रकाश लोंढे यांनी महाराष्ट्रातील सर्व वारकरी आणि धार्मिक शिक्षण संस्थांना एका झेंड्याखाली तथा व्यासपिठावर येण्याचे आव्हान केले आणि ‘इतर धर्माच्या धार्मिक संस्थांना सरकारकडून अनुदान मिळते, तर आपल्या वारकरी शिक्षण संस्थांना का मिळत नाही ?’ असे सूत्र उपस्थित केले.

वारकरी संप्रदायाला संपवण्याचा प्रयत्न करणार्‍यांची चौकशी करा ! – ह.भ.प. बाजीराव बांगर महाराज, विश्वविक्रमी-शिव व्याख्याते   

पाच पातशाह्यांच्या जुलमी अत्याचाराला विरोध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बालवयातच स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यासाठी त्यांनी अवघ्या १० जणांना घेऊन हिंदूंचे मोठे स्वराज्य उभे केले. यात लाखोंचे सैन्यदल आणि मोठे हेर खाते होते. असे असतांना छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) दाखवण्याचे षड्यंत्र चालू आहे. अनेक खोटी कथानके पसरवली जात आहेत. हे सर्व कोण करत आहे, याची चौकशी करून ते हाणून पाडले पाहिजे.

‘धर्मासाठी जगा आणि धर्मासाठी मरा’, ही शिकवण आचरणात आणण्याची आवश्यकता आहे ! – ह.भ.प. माणिक महाराज मोरे, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे १० वे वंशज

‘धर्माचे कारण । करणे पाखंड खंडण ।।’ असे जरी असले, तरी हिंदु कधी पाखंड खंडण करत नाही. त्यामुळे आज हिंदूंची दुरावस्था झाली आहे. १२ व्या शतकापासून हिंदूंवर अनेक आक्रमणे होत आहेत. त्यामुळे १३ व्या शतकातच भागवत धर्माचा पाया ज्ञानेश्वर माऊलींनी रचला. अनेक संतांनी यासाठी आयुष्य वेचले. १६ व्या शतकात संत तुकाराम महाराज यांनी भागवत धर्माची वाढ करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. ‘धर्मासाठी जगा आणि धर्मासाठी मरा’ ही शिकवण आज आचरणात आणण्याची आवश्यकता आहे.

वारकरी संमेलनात उपस्थित असलेले वारकरी

हिंदु धर्म टिकावा आणि वाढावा, यासाठी वारी चालू झाली ! – ह.भ.प. संग्रामबापू भंडारे

‘वारकरी संप्रदाय आणि हिंदु धर्म यांचा काही संबंध नाही’, असा नवा वाद चालू झाला आहे. माऊलींनी आळंदी-पंढरपूर वारी चालू केली. त्यांनी जो ध्वज खांद्यावर वाहिला, तो ‘भगवा’ होता, म्हणजेच हा हिंदु धर्म टिकावा आणि वाढावा, यासाठी वारी चालू झाली. त्यामुळे वारकरी संप्रदाय हा हिंदु धर्माला मानतो आणि तो हिंदुत्वनिष्ठही आहे. हिंदु धर्माचा प्रचार-प्रसार आळंदीच्या पुण्यभूमीतून वर्षानुवर्षे चालू आहे आणि पुढेही तो चालू राहील.

जिहादी आक्रमणांच्या विरोधात कीर्तनकारांनी कीर्तनातून हिंदूंचे प्रबोधन करावे ! – डॉ. अंकुश अगरवाल, हिंदु जागरण मंच  

गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर जिहादी आक्रमण करत आहेत. आषाढी वारीत खोटे फलक लावले, वारीतील वारकर्‍यांवर मांसाचे तुकडे फेकले गेले, ‘भजन, कीर्तन आणि आरती करायची नाही’, असे काही जिहादी जेथे त्यांची बहुसंख्याने वस्ती आहे, अशा ठिकाणी सांगत आहेत. या आक्रमणांच्या विरोधात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांनी प्रत्येक कीर्तनात किमान १० मिनिटे बोलून हिंदूंमध्ये प्रबोधन करावे.

आर्थिक साहाय्य आणि अनुदान यांसाठी धार्मिक संस्थेची नोंदणी आवश्यक ! – अधिवक्त्या डॉ. रोहिणी पवार, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या विश्वस्त 

कायद्याच्या अधीन राहून कार्य केल्यास अडचणी येत नाहीत. कोणत्याही संघटनेचे कार्य चालू ठेवायचे असेल, तर आर्थिक साहाय्य लागते. यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयातून संस्था नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राच्या लोककला टिकून रहाव्यात; म्हणून एकूण ४ कोटी ५० लाख रुपयांचे प्रावधान केले आहे. वारकरी संस्था, भजनी मंडळ, दिंड्या यांना साहित्य खरेदी करण्यासाठी या निधीचा उपयोग होऊ शकतो.

मंदिरांचे विश्वस्त रामायणातील भरताप्रमाणे असतील, तर संस्था चांगल्या चालतील ! – दिलीप देशमुख, माजी धर्मादाय आयुक्त

महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट १९५० ची माहिती देतांना दिलीप देशमुख म्हणाले की, मंदिरांचे विश्वस्त म्हणजे रामायणातील भरतासारखे असावेत. भरताप्रमाणे संस्था चालल्यास सर्व संस्था चांगल्या चालतील. संस्थेची नोंदणी करतांना उद्देश, मिळकत, विश्वस्त ही माहिती देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात सध्या ‘कलम ४१ अ’अंतर्गत निर्धन रुग्ण निधी योजना लागू केली आहे. यामध्ये रुग्णाचे उत्पन्न १ लाख ६० सहस्र रुपयांपर्यंत असल्यास रुग्णाला विनामूल्य उपचार मिळतात. महाराष्ट्रातील ४३० रुग्णालयांमध्ये ही योजना लागू आहे.

‘मी कायदेविषयक मार्गदर्शन करू शकतो; पण यातून कृतीशील होऊन मार्ग कसा काढायचा, हे हिंदु जनजागृती समितीच करू शकते’, असा विश्वास माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख यांनी या वेळी व्यक्त केला.’

हिंदु धर्मातील काही लोक शहरी नक्षलवादी होऊन हिंदु धर्म संपवण्याचे कारस्थान करत आहेत ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती 

शहरी नक्षलवाद्यांचा खरा चेहरा उघड करण्याची आवश्यकता आहे. ‘सनातन धर्म हा रोग आहे’, असे म्हणणारे देशाला लागलेली कीड वाढवत आहेत. हिंदु धर्मातील लोक शहरी नक्षलवादी बनून हिंदु धर्म संपवण्याचे कारस्थान करत आहेत. शहरी नक्षलवाद्यांनी वारीत ‘समता दिंडी’ काढून संत, वारी आणि धर्म यांविषयी चुकीचे सांगत त्यांनी हिंदुविरोधी कृती केली. याला आमचा विरोध आहे.

‘वारकरी मुक्त विद्यापीठ’ स्थापन करून शिक्षण देण्याची आवश्यकता आहे ! – श्री. राम डावरे, सी.ए.

सरकारने केलेले कायदे वारकरी संप्रदायासाठी थोडे शिथिल करण्याची आवश्यकता आहे. ‘वारकरी मुक्त विद्यापीठ’ स्थापन करून शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. वारकरी संस्थांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करावी.

भजन, कीर्तन आणि आरती करायची नाही, हे सांगण्याचे जिहाद्यांचे धैर्य कसे होते ?