
पणजी, २० सप्टेंबर (वार्ता.) – गेल्या काही दिवसांपासून गोवा आणि सिंधुदुर्ग यांच्या हद्दीत फिरणार्या ओंकार नावाच्या हत्तीला पुन्हा जंगलात पाठवण्यासाठी गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांतील वन विभागांचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. या भागात फिरतांना या हत्तीने सीमेवरील नागरिकांची केळीची झाडे, शेती इत्यादींची हानी केली आहे. यामुळे गोवा राज्यातील वन विभागाने महाराष्ट्रातील वन विभागाच्या साहाय्याने या हत्तीला योग्य दिशेने वळवून पुन्हा जंगलात पाठवण्यासाठी अथक प्रयत्न चालू केले आहेत. या हत्तीच्या पावलांच्या खुणांवरून हत्तीचा मागोवा घेण्यासाठी ड्रोनचेही साहाय्य घेतले जात आहे.
याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘हत्तीला सुरक्षितपणे जंगलात पाठवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावे, याविषयी वन विभागाला आदेश दिले आहेत.’’ सध्या परिस्थिती नाजूक असल्याचे वन विभागाच्या एका अधिकार्याने सांगितले. ते म्हणाले, ‘‘ओंकार हा सध्या लोकांच्या शेती-बागायतीतून फिरत आहे. आमची मुख्य चिंता म्हणजे माणसाला त्याच्यामुळे हानी पोचू नये. जर नैसर्गिकरित्या तो परत जंगलात गेला नाही, तर आम्हाला आणखी पर्यायी मार्ग वापरावे लागतील.’’
सध्या हा हत्ती फिरत असलेल्या गोवा आणि महाराष्ट्र यांच्या सीमारेषेवरील गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांतील वन विभागांची पथके या हत्तीला योग्य तर्हेने वळवून जंगलातील त्याच्या कळपामध्ये पोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वनमंत्री विश्वजीत राणे यांनी कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांद्रे यांची भेट घेऊन पेडणे येथे हत्तीमुळे निर्माण झालेल्या समस्येविषयी चर्चा केली. वनमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘या हत्तीचे कर्नाटकातील जंगलात पुनर्वसन करावे. ज्या ठिकाणी त्याला आवश्यक वातावरण मिळून त्याची काळजी घेतली जाईल. याविषयी आम्ही कर्नाटक सरकारला विनंती केली आहे. येत्या १४ दिवसांत याविषयी कृती करण्याचा निश्चय केला आहे. वन्य प्राणी आणि माणसे यांच्यातील संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने एकत्रितपणे प्रयत्न करण्यासाठी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्ये मिळून त्रिपक्षीय करार करण्याविषयीही चर्चा केली आहे.’’
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !