महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानीदेवीची सध्या मंचकी निद्रा चालू आहे. त्या निमित्ताने…

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून २१ दिवस निद्रा घेते. उरलेले ३४४ दिवस देवी अष्टौप्रहर जागृत असते. असे असणारे तुळजाभवानी शक्तीपीठ एकमेवाद्वितीय आहे. देवीची मंचकी निद्रा २१ दिवसांत विभागलेली आहे. याविषयीची माहिती येथे देत आहे.
१. श्री तुळजाभवानीदेवीच्या ३ निद्रा
श्री तुळजाभवानीदेवी वर्षातून ३ वेळा निद्रा घेते. या निद्रा चांदीचा आणि लाकडी अशा २ प्रकारच्या मंचकावर होतात. ‘मंचक’ याचा अर्थ ‘पलंग’ असा आहे. देवी भवानीची निद्रा ३ प्रकारात विभागली आहे. त्याची माहिती खालीलप्रमाणे :

अ. घोर निद्रा : नवरात्रीच्या आधी देवी योगनिद्रेत होती, म्हणजे महिषासुराशी युद्ध करण्यापूर्वी देवी ही निद्रा घेत होती; पण महिषासुराचे देवतांवरील वाढते अत्याचार पाहून ब्रह्मा, विष्णु आणि महेश हे त्रिदेव देवीला ८ दिवसांनंतर योग निद्रेतून उठवून देवीदेवतांचे रक्षण करण्याची विनवणी करतात. या निद्रेतून जागी होऊन देवीने घोर रूप प्रकट केले. यामुळे या निद्रेस ‘घोर निद्रा’ म्हणतात.
ही निद्रा तुळजाभवानी मंदिर संस्थानात असलेल्या चांदीच्या मंचकावर भाद्रपद कृष्ण अष्टमी ते भाद्रपद अमावास्या समाप्तीपर्यंत निद्रा असते आणि आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवी सिंहासनावर आरूढ होते.
आ. श्रमनिद्रा : घोर निद्रेतून जागी होऊन देवीने महिषासुराचे चाललेले अधर्म कारस्थान पाहून युद्धास सिद्ध झाली. ९ दिवस असुरांशी युद्ध केले. नवव्या दिवशी असुर शरण आला. देवीच्या चरणी स्थान मागून देवतांची क्षमा मागितली. या वेळी ९ दिवस युद्धामुळे देवीला थकवा आल्याने शारदीय नवरात्रानंतर देवी ५ दिवसांची निद्रा घेते. यालाच ‘श्रमनिद्रा’ असे म्हणतात. या निद्रेसाठी तुळजाभवानीचे माहेर अहिल्यानगर येथून पलंग येतो. त्यावर आईसाहेब (देवी) निद्रा घेतात, या निद्रेस ‘मंचकी निद्रा’ म्हणतात. ही निद्रा माहेरच्या लाकडी पलंगावर आश्विन शुद्ध दशमीपासून (दसर्यापासून) अश्विन शुद्ध पौर्णिमेपर्यंत (कोजागरी पौर्णिमेपर्यंत) असते. नंतर देवी पुन्हा सिंहासनावर आरूढ होते.
निद्रा घेण्याच्या आधी देवीला १०८ साड्या नेसवल्या जातात. हा पलंग तुळजापूरला दसर्याच्या आदल्या दिवशी पायी आणला जातो. पहाटे देवी सीमोल्लंघन खेळून या पलंगावर निद्रा घेते.
इ. मोहनिद्रा : शाकंभरी नवरात्रीच्या कालावधीत चांदीच्या मंचकावर पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी या काळात देवी निद्रिस्त असते. देवीची मोह निद्रा हे सृजनाचे प्रतीक असून हा निद्राकाळ संपल्यानंतर नवमी, म्हणजे तुळजाभवानी प्रकट दिवस असतो. त्यामुळे या निद्रेस ‘मोहनिद्रा’ म्हणतात. हे ९ दिवस, म्हणजे ९ मासांचे सूचक आहेत, जसे ९ मासांनी सृजन होते, तसाच हा कालावधी असतो.
२. निद्रेविषयीची अन्य माहिती
देवी शारदीय आश्विन नवरात्राच्या आधी ८ दिवस चांदीच्या मंचकावर निद्रा घेते. शारदीय, म्हणजेच आश्विन नवरात्रीनंतर ५ दिवस माहेरच्या लाकडाच्या पलंगावर विश्रांती निद्रा घेते आणि शाकंभरी पौष नवरात्रीच्या वेळी देवी ८ दिवस चांदीच्या मंचकावर निद्रा घेते.
अशा अवघ्या विश्वाचा भार सोसून विसावा घेण्यासाठी आई गादीवर असते; म्हणून तमाम देवीभक्त तथा देवीचे आराधी (भक्त) देवीच्या या निद्राकालात गादी, उशी, तक्क्या यांसारख्या सर्व सुखासनांचा त्याग करतात.
आईराजा उदो उदो ।
– श्री. सुनीत तथा बंडोपंत गणेश पाठक, श्री तुळजाभवानीदेवी मंदिराचे शासकीय उपाध्ये, तुळजापूर. (१७.९.२०२५)
श्री तुळजाभवानीदेवी चैत्र पौर्णिमा उत्सवासाठी ‘श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान’च्या वतीने सुरक्षेला प्राधान्य !
श्री तुळजाभवानीदेवीचा पारंपरिक छबिना उत्साहात साजरा
गुढीपाडव्यानिमित्त तुळजापूरात गुढी उभारणी आणि पारंपरिक विधी, पंढरपुरात विठ्ठल मंदिरात मनमोहक फुलांची रंगीबेरंगी सजावट !
तुळजापूर आणि अक्कलकोट येथे हुताशनी पौर्णिमेनिमित्त होलिकादहन उत्साहात पार पडले !
स्पेनमधील झेवियरची पुष्कर (राजस्थान) ते तुळजापूर (महाराष्ट्र) पदयात्रा !
धार्मिक ग्रंथाची प्रत आणि हाताने लिहून काढलेला धार्मिक ग्रंथ यांतून प्रक्षेपित होणारी स्पंदने याविषयीचे संशोधन