प्रभु श्रीरामाच्या पावलांचा मागोवा घेत देहली येथील अभ्यासकांची ओंकारेश्वर तीर्थक्षेत्राला (जळगाव) भेट !

डॉ. राम अवतार यांच्या भेटीने धार्मिक पर्यटन नकाशावर स्थान !

रावेर (जळगाव)– रावेर येथून ५ कि.मी. अंतरावर भोकर नदीकाठावर ओंकारेश्वर हे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. वनवासकाळात प्रभु श्रीरामाने येथे शिवलिंग स्थापन केले, अशी आख्यायिका आहे. या तीर्थक्षेत्रस्थळी केंद्रीय पर्यटन मंत्रालयांतर्गत कार्यरत देहली येथील ‘रामायण परिपथ’चे अध्यक्ष डॉ. राम अवतार यांनी नुकतीच भेट दिली. डॉ. अवतार हे प्रभु श्रीराम ज्या मार्गाने वनवासात गेले, त्या मार्गाचा अभ्यास आणि नोंदी घेत आहेत. त्यांनी आतापर्यंत २४९ स्थळांच्या नोंदी घेतल्या. त्यात रावेरमधील ओंकारेश्वर मंदिर उपेक्षित होते. त्यांच्या भेटीने देशाच्या धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर ओंकारेश्वरचा समावेश होण्याचे संकेत आहेत.

१. डॉ. राम अवतार यांनी ओंकारेश्वर तीर्थक्षेत्रातील प्रभु श्रीरामाचे मंदिर, त्यातील प्रभु श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती, रामकुंड, केशवकुंड, सीता न्हानी, भस्म टेकडी यांची बारकाईने पहाणी केली.

२. ओंकारेश्वर मंदिरात येण्या-जाण्याचे मार्ग, दळणवळण सुविधा, भौगोलिक स्थिती यांच्या नोंदी घेतल्या.

३. ‘डॉ. राम अवतार यांच्या भेटीने ओंकारेश्वर मंदिराचा धार्मिक पर्यटन नकाशावर समावेश झाल्यास रावेर तालुक्याचा बहुमान वाढेल’, असे ट्रस्टी आणि स्थानिक यांनी सांगितले.

४. या वेळी संस्थानचे अध्यक्ष श्री. विजय पाटील, सदस्य श्री. रमेश पाटील, सचिव श्री. मुरलीधर चौधरी, रावेरचे श्री. प्रभूदत्त मिसर, सर्वश्री दिलीप वैद्य, मोहन पाटील, पुजारी श्री. पांडुरंग महाराज, श्री मुकेश महाराज, भाविक श्री. सुरेश पाटील उपस्थित होते.

५. मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर शहरापासून काही अंतरावर तापी आणि मोहना नद्यांच्या काठावर पवित्र स्थळाला डॉ. राम अवतार यांनी भेट दिली.

६. वनवासात असतांना प्रभु श्रीरामांनी आपले पिता राजा दशरथ यांचे श्राद्धकर्म केले होते. ही जागा धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

७. खरगोन (मध्य प्रदेश) येथील श्री. दिलीप करपे आणि बुर्‍हाणपूर येथील श्री. लोकेश शुक्ला यांनी एप्रिल २०२५ मध्ये अयोध्या येथील कारसेवक पुरममध्ये ‘शोध संन्यास न्यास’च्या संमेलनात भाग घेतला होता. या वेळी त्यांनी रावेरमधील ओंकारेश्वर या क्षेत्राची माहिती डॉ. राम अवतार यांनी दिली होती. त्यानुसार न्यासाच्या अध्यक्षांनी स्वतः ओंकारेश्वरला भेट दिली.

‘आतापर्यंत देशातील विविध राज्यांतील एकूण २४९ स्थळांचा ‘वन गमन पथ’ यावरील पुस्तिकेत समावेश केला आहे; मात्र ओंकारेश्वर येथील ही जागा रामायणकालीन परंपरेचा जिवंत पुरावा आहे. अशा पवित्र स्थळांचे संवर्धन करणे हे आपले दायित्व आहे.’

– डॉ. राम अवतार, अध्यक्ष, श्रीराम सांस्कृतिक शोध संस्थान न्यास, देहली