महालय कृतज्ञता ‘धर्मपिंड’ !

पितरांना उद्देशून करण्याच्या अनेक श्राद्धांपैकी महालय श्राद्ध हा असा श्राद्धप्रकार आहे की, ज्यामध्ये धर्मपिंड दिले जातात. पिंड आणि पाणी देण्यामागे एवढाच उद्देश असतो की, ज्याला उद्देशून ते दिले गेले आहे, तो ज्या ज्या लोकांमध्ये ज्या रूपामध्ये असेल, त्या त्या लोकातील त्याला आवश्यक अशा अन्नपदार्थांमध्ये त्या त्या जीवाला तो भाग मिळत असतो. (‘देवल स्मृति’मध्ये याचे विश्लेषण केले आहे.)

महालय श्राद्ध आपल्याशी प्रत्यक्ष संबंधित असणार्‍या व्यक्तींना उद्देशून केले जाते. सर्वांना पिंडदान झाल्यानंतर महालयामध्ये ‘धर्मपिंड’ या नावाने ४ पिंड दिले जातात. ते कुणासाठी असतात…

१. मित्र, पशू, वृक्ष, घरावर उपकार करणारे आदींसाठी पहिला पिंड

आब्रह्मणो ते पितृवंशजाता मातुस्तथा वंशभवा मदीयाः ।
वंशद्वयेस्मिन्ममदासभूता भृत्यास्तथैवाश्रितसेवकाश्च ।।

अर्थ : ब्रह्मदेवापासून वडिलांच्या वंशामध्ये जे जन्मले, तसेच जे आईच्या वंशामध्ये जन्मले (ब्रह्मदेवांपासून सृष्टी आणि आपणा सर्वांची उत्पत्ती झाली), माझ्या या दोन्ही वंशांमधील सेवक, सेविका, आश्रित, म्हणजे आपल्यावर अवलंबून जीवन जगणारे सेवक होते.

मित्राणि सख्यः पशवश्च वृक्षा दृष्टाश्च पृष्टाश्च कृतोपकाराः ।
जन्मान्तरे ये मम सङ्गताश्च तेभ्यः स्वधा पिण्डमहं ददामि ।।

अर्थ : मित्र, सखेसोयरे, घरचे पशू, वृक्ष, घरावर ज्यांचे उपकार आहेत, असे सर्व, याच नव्हे, तर पूर्वजन्मातही जे आमच्या संगतीत होते, त्यांना मी हा पिंड देतो.

‘जे मित्र होते, मैत्रिणी होत्या, पाळलेले (गायी, म्हशी, कोंबडे, कुत्रे, शेळ्या, मेंढ्या इत्यादी) पशू होते. वृक्ष (ज्यांची कधी सावली, फुले, फळे, लाकडे किंवा प्रसंगी औषधांसाठी पाने, मुळे, साली, खोडे घेतली असतील) ज्याने प्रेमाने बघितले असेल, आमची विचारपूस केली असेल, ज्यांनी आमच्यावर उपकार केले असतील, जन्म जन्मांतरामध्ये माझ्या सोबतीला जे होते, त्या सर्वांसाठी मी हा पिंड देतो’, असे म्हणत पहिला पिंड दिला जातो.

२. दुसरा पिंड कुणासाठी दिला जातो ?

पितृवंशे मृता ये च मातृवंशे तथैव च ।
गुरुश्वशुरबन्धूनां ये चान्ये बान्धवा मृताः ।।

अर्थ : पितृवंशामध्ये किंवा मातृवंशामध्ये जे मृत, तसेच गुरु, सासरे, भाऊ यांपैकी जे मृत झाले आहेत

ये मे कुले लुप्तपिण्डाः पुत्रदारविवर्जिताः ।
क्रियालोपगताश्चैव जात्यन्धाः पङ्गवस्तथा ।।

विरूपा आमगर्भाश्च ज्ञाताज्ञाताः कुले मम ।
धर्मपिण्डो मया दत्तो ह्यक्षय्यमुपतिष्ठतु ।।

अर्थ : काही कारणाने माझ्या कुलामध्ये कुणी ज्ञात किंवा अज्ञात लुप्तपिंड (अपत्य आणि पत्नी इत्यादी नसलेले ज्यांचे पिंडदान होत नाही असे), काही कारणांनी ज्यांची अंत्यक्रियाच झालेली नाही असे, जन्मापासूनच अंध, पंगू, कुरूप आहेत (यांचे विवाह इत्यादी संस्कार होत नाहीत या कारणाने), जे भ्रूणावस्थेमध्ये मृत झाले आहेत, अशा सर्वांसाठी मी दिलेला धर्मपिंड हा अक्षय्य तृप्ती देणारा असो. (असे म्हणून दुसरा पिंड दिला जातो.)

३. नरकांमध्ये पडलेल्यांच्या उद्धारासाठी तिसरा पिंड

असिपत्रवने घोरे कुम्भीपाके च ये गताः ।
तेषामुद्धारणार्थाय इमं पिण्डं ददाम्यहम् ।।

अर्थ : आपापल्या पापकर्मामुळे जे कुणी असिपत्र, कुंभीपाक इत्यादी नरकांमध्ये पडलेले आहेत. त्यांच्या उद्धारासाठी मी हा पिंड देतो, असे म्हणत तिसरा पिंड दिला जातो.

४. कुळात पिंड देणारा नसलेल्यांसाठी धर्मपिंड

उच्छिन्नकुलवंशानां येषां दाता कुले न हि ।
धर्मपिण्डो मया दत्तो ह्यक्षय्यमुपतिष्ठतु ।।

अर्थ : ज्यांचा वंश अथवा पूर्ण कुल छिन्न (नष्ट) झाले आहे, तसेच ज्यांच्या कुळात (स्वतःच्या मातापित्यांनाही अन्न, पिंड इत्यादी देऊ शकेल असा) एकही दाता नाही, अशा मृतांना मी हा चौथा धर्मपिंड देत आहे.

५. हिंदु धर्माची उदारता

प्रत्यक्ष संबंध असलेल्या किंवा अप्रत्यक्ष संबंध आलेल्या किंवा कोणताही संबंध नसलेल्यांप्रतीही समर्पण करण्याच्या भावनेमागे हिंदु धर्माचा किती सूक्ष्म विचार आहे, हे लक्षात येईल. मनुष्य, वृक्ष, पशू इत्यादींकडून आपण उपकार स्वीकारले आहेत, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे, हे एक वेळ आपण समजू शकतो; परंतु केवळ ज्यांना देणारे कुणी नाही म्हणून शेवटचा जो पिंड दिला जातो, त्यामागे आपल्या हिंदु धर्माची उदारताच दिसून येते.