श्राद्धपक्ष, पुनर्जन्म, पिंड आणि कावळा… यांविषयीची उत्तरे

पितृपक्षाच्या निमित्ताने…

पितरांप्रती आदर व्यक्त करण्याच्या प्रथा तर सगळ्याच धर्मांमध्ये आहेत आणि त्या त्या धर्मातील बहुतेक सर्वजण त्या पाळतात; पण याची थट्टा, टवाळी केवळ हिंदु धर्मातच होते. पितृपक्ष आला की, गोंधळात टाकणारे लेख पुनःपुन्हा येऊ लागतात. माध्यमांमधून हिंदु धर्माच्या टवाळक्या चालू होतात. त्याच्या खुलाशासाठी काही सूत्रांची माहिती येथे दिली आहे.

उत्सुकतेपोटी केलेला माझा या विषयाचा थोडा अभ्यास, काही चांगल्या जाणकारांचे मार्गदर्शन, स्वतःला आलेले अनेक अनुभव यांवरून अनेक निष्कर्ष काढता आले आणि ते माझ्या अनेक प्रश्नांना अन् शंकांना बरेचसे अचूक उत्तर देणारे आहेत.

१. सप्तपाताळ, मानवलोक आणि सप्तस्वर्ग हे काय आहे ? ८४ लक्ष जन्मांनंतर मनुष्य जन्म लाभतो, म्हणजे काय ?

मृत्यूनंतरचे जीवन आणि मोक्षाची जी संकल्पना हिंदु धर्मामध्ये मांडलेली आहे, तशी अन्य कुठल्याही संस्कृतीत इतक्या परिपूर्णपणे मांडलेली नाही; मात्र यासाठी हिंदु धर्मामध्येच सहस्रो वर्षे प्रचलित असलेल्या पुनर्जन्म, कर्मसिद्धांत, पंचमहाभूतांनी बनलेला मनुष्य देह, यांसारख्या गोष्टी एकदा समजून घ्यायला हव्यात. प्रसिद्ध शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतीवादाच्या शोधाच्या सहस्रो वर्षे आधी हिंदु धर्मात उत्क्रांतीचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. अगदी ढोबळमानाने एखाद्या एकपेशीय जीवापासून अनेकदा पालट होत होत सजिवांची निर्मिती झाली, असा थोडक्यात सिद्धांत ! हिंदु धर्मातील तत्त्वज्ञान काय सांगते ? सप्तपाताळ, मानवलोक आणि सप्तस्वर्ग हे काय आहे ? ८४ लक्ष जन्मांनंतर मनुष्य जन्म लाभतो, म्हणजे काय ?

डार्विनला केवळ देहाचीच उत्क्रांती सांगता आली. हिंदु धर्मात देहासह त्याच्या आत्म्याचे पूर्वकर्म, पाप-पुण्य, बरे-वाईट संस्कार, अशा अनेक गोष्टींचा एकत्रित विचार केलेला आहे. विज्ञानाला मनुष्य जन्मापर्यंतच उत्क्रांती सांगता आली आहे; पण आपल्या हिंदु धर्माने मात्र पुढे भू, भुव, महा, जन, तप आणि सत्य लोक किंवा स्तर असे नंतरच्या उत्क्रांतीचे टप्पेही सांगितलेले आहेत. तेथील कामकाजाची माहिती दिली आहे. माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा देह (कोष) गळून पडला, तरीही प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, ज्ञानमय हे कोष तसेच राहून पुढे प्रगती करतात. मनुष्यदेहातील पाणी, वायू, अग्नी, आकाश या सर्व ऊर्जा (energy) असल्याने ‘लॉ ऑफ इनडिस्ट्रक्टिबिलिटी ऑफ एनर्जी’, म्हणजे ऊर्जेच्या अविनाशीपणाच्या नियमानुसार ती नष्ट न होता अनंतात विलीन होतात, म्हणजेच एका मोठ्या कोषात (Universal Reservoir) खेचली जाते. भौतिक शरीर जळून ते अन्य अनेक भौतिक रूपांमध्ये मध्ये रूपांतरित होते.

२. हिंदु तत्त्वज्ञानानुसार जिवंत माणूस हा त्याचा देह सोडून गेलेल्या पूर्वजांच्या आत्म्यांच्या साखळीचाच एक भाग असतो. माणसाचा देह हे जरी ‘मटेरियल’ (भौतिक) असले, तरी आत्मा ही नष्ट न होणारी शक्ती आहे. या शक्तीवर अनेक जन्मांमधून निर्माण झालेल्या आसक्ती, भावभावना, इच्छा, वासना, बरे-वाईट कर्म यांचे संस्कार झालेले असतात. अनेकदा पुनर्जन्मामध्ये या सगळ्याचे प्रतिबिंब दिसू शकते.

३. आपण नेहमी ऐकतो की, विज्ञानाची इतकी प्रगती झाली आहे की, आता माणसाची पावले चंद्रावरसुद्धा उमटली ! वगैरे..; पण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण विसरतो. ती अशी की, माणसाचे पाय जरी चंद्राला लागले, तरी त्या चंद्रामुळे पृथ्वीवर येणारी भरती आणि ओहोटी बंद झालेली नाही. त्याचा आपल्यावर होणारा परिणाम पालटलेला नाही.

४. आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट, जिवंत असतांना अनेकदा माणसाच्या देहाच्या आकाराच्या प्रमाणात त्याला न्यूनाधिक अन्न लागते. देह सोडल्यावर आत्म्याला अन्नाचा केवळ वास पुरेसा असतो. त्यामुळे तेथे अन्नाच्या प्रमाणाचा (क्वांटिटी) संबंध नसतो. पदार्थांच्या वासानेच तो तृप्त होतो; म्हणूनच आत्म्यासाठी ठेवल्या जाणार्‍या जेवणाच्या पानावर वासापुरते थोडे थोडे अन्न वाढले जाते. त्याचप्रमाणे त्या आत्म्याला अन्नातील नक्की कुठला रस आवडेल ? याची कल्पना नसल्याने श्राद्धाला चवीच्या सर्व रसांचे म्हणजे कडू, गोड, तिखट, खारट, तुरट आणि आंबट अशा सर्व चवींचे पदार्थ केले जातात. उदा – कारल्याची भाजी, आवळ्याची – आमसुलाची चटणी, लाडू-खीर, वडे, गवार – भोपळ्याची भाजी इत्यादी. तीव्र मधुमेह असलेल्या माणसाने जिवंतपणी गोड खाणे पूर्ण बंद केले असले, तरी त्याच्या मृत्यूनंतर, त्याला ते बंधन पाळायची आवश्यकता नसते. मधुमेह शरिराला होतो, आत्म्याला नाही.

५. दुसरे महत्त्वाचे असे की, आपल्या धर्मशास्त्रात पितरांच्या ३ पिढ्यांना आवाहन केले जाते. त्यासह कुटुंबातील त्या आधीच्याही मोक्ष, मुक्ती, सद्गती न मिळलेल्यांना, ज्यांच्यावर रितसर दहनसंस्कार होऊ शकले नाहीत अशांना, गर्भातच मरण पावलेल्यांना, तसेच विविध अवस्थेत मृत पावलेल्यांना अन्न किंवा पिंड दिले जातात. शस्त्राघाताने मृत्यू आलेल्या, घातपाताने मरण आलेल्या, संन्यास घेतलेल्या इत्यादी पूर्वजांसाठी करायच्या श्राद्धासाठी विशिष्ट दिवस राखून ठेवण्यात आले आहेत.

६. श्राद्धासाठी जर जाणकार पुरोहित मिळाला नाही, जेवणासाठी शास्त्रोक्तपणे पदार्थ करता आले नाहीत, सगळे धार्मिक विधी करणे शक्य झाले नाही, कुठल्याही कारणामुळे परवडत नाही, असे असेल, तरी अत्यंत श्रद्धेने अर्पण केलेला, जो जमेल, जसा जमेल, तसा अन्न नैवेद्य पितरांना नक्कीच पोचतो. त्यासाठी कर्ज काढून, उधार-उसनवार, बडेजाव करू नयेत.

७. काही जणांना वाटते, कशावरून हे सर्व पितरांना पोचते ? आपण ३६४ दिवस पितरांसाठी फारसे काही करत नाही, मग केवळ श्राद्धाच्या, सर्वपित्रीच्या एखाद्या दिवशी सर्व पितरांसाठी मिळून चमचा-चमचा वाढलेल्या अन्नाचा इतका विचार कशासाठी करायचा ? समजा पितरांपर्यंत नाही पोचले, तरी कावळा आणि अन्य पक्षी, कीटक, प्राणी हे तरी ते अन्न खातीलच ना !

८. ते अन्न खाणारे कावळा आणि इतर पक्षी, कीटक, प्राणी हे जीवनसाखळीची एकेक कडी असतात. त्या मूक प्राण्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये कावळा हा तर आपल्या अवतीभवतीचे, आपल्या दृष्टीने अनेक त्याज्य पदार्थ खातो आणि स्वच्छता राखतो. माणसाला सर्वाधिक प्राणवायू, सावली देणारे, भूमीची धूप रोखणारे वड-पिंपळासारखे वृक्ष तर कावळ्याच्या विष्ठेतूनच रूजतात. त्यामुळे कावळ्याला आत्मा दिसतो कि नाही ? या विचारापेक्षा त्याची ही उपयुक्तता आपला स्वार्थ म्हणून तरी आपण जोपासायला हवी.

९. सध्या मृत माणसांच्या नावाने वृत्तपत्रांमधून वर्षानुवर्षे त्यांची छायाचित्रे, कविता, श्रद्धांजलीचे लिखाण, दूरदर्शनवर विज्ञापने, गावभर मोठमोठे फ्लेक्स फलक अशा गोष्टी सहस्रो रुपये खर्चून केल्या जातात. अगदी कळकळीने भावना व्यक्त केलेल्या दिसतात. व्हॉट्सॲप, फेसबुक यांवरूनही हे संदेश फिरतात. कशावरून ते या मृत व्यक्तींना किंवा पितरांना पोचते ? असा प्रश्न कुणीही विचारत नाही. बहुतेक सगळी माध्यमे ही केवळ हिंदूंच्याच संदर्भात पुरोगामी आहेत; पण तीही असली विज्ञापने छापून पैसे कमवण्याचा धंदा करतातच ना !

१०. आपल्या धर्मानुसार आत्म्यांना अन्न अर्पण करणे, हेच अत्यंत महत्त्वाचे मानलेले आहे. त्याऐवजी काही मंडळी कोरडा शिधा (तांदूळ, गहू, साखर, डाळ इत्यादी) अर्पण करतात; पण विचार करा, एखादा अत्यंत भुकेला माणूस तुमच्या पुढे उभा आहे. त्याला त्या वेळी तुम्ही जरी १-१ गोण भरून डाळ, तांदूळ हे पदार्थ दिले, तर त्या वेळी त्याची भूक भागेल का ? ते तुमचे पुण्यकर्म ठरेल; पण श्राद्ध मात्र नक्कीच ठरणार नाही ! अन्नदान हे असे एकच दान आहे की, ते घेणारा, त्याचे पोट भरल्यावर तरी तृप्तीने ‘आता पुरे, आणखी नको’, असे म्हणतो. अन्य कुठल्याही प्रचलित दानांच्या संदर्भात असे घडू शकत नाही. ते केवळ अन्नदानानेच घडते.

११. तुमच्या दिवंगत आई-वडिलांनी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगितले असेल, लिहून ठेवले असेल की, त्यांचे क्रियाकर्म, श्राद्ध करू नका, तरीही त्यांच्या मृत्यूनंतर या गोष्टी तुम्ही नक्कीच करा; कारण माणसे असे काही सांगतात, तेव्हा त्यांचे विचार हे येथील अनुभवानुसार आणि ज्ञानानुसार असतात; पण परलोकात गेल्यावर ‘आपण पृथ्वीवर मुलाबाळांना असे सांगून चूक केली’, असे जर त्यांच्या लक्षात आले, तर ते तुम्हाला पुन्हा येऊन ‘माझे श्राद्ध कर रे बाळा’, असे सांगू शकत नाहीत. त्यामुळे सहस्रो वर्षे आपल्या धर्मात अस्तित्वात असलेले विधी एक दिवस करायला काय हरकत आहे ?

१२. दिवंगत पूर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ एखाद्या संस्थेला देणगी देणे, पाणपोई किंवा विहीर बांधणे, मंदिराला दान देणे, ही सर्व पुष्कळ मोठी सत्कार्ये – पुण्यकर्मे आहेत; पण हे श्राद्धाला पर्याय नक्कीच नाहीत.

१३. आपल्या धर्मामध्ये असाही एक विश्वास आहे की, माणसाविषयीच्या सर्व गोष्टी देवाने स्वतःच्या हातात ठेवल्या आहेत; पण माणसाला संतती आणि संपत्ती देण्याची सर्व सूत्रे मात्र त्याने माणसाच्या दिवंगत पूर्वजांवर सोपवली आहेत.

१४. कर्मफळाचा बाऊ करू नका. तुमची जन्मपत्रिका अचूक असेल, तर त्यातील ग्रहस्थिती ही तुमचे जन्म घेतांना असलेले गुण दाखवणारे प्रगतीपुस्तक असते. त्यावरून तुमचे आयुष्य कसे असू शकेल ? याचे केवळ अनुमान करता येते; पण तसेच अचूक घडत नाही; कारण ते तुमचे भविष्य नसतेच मुळी ! तुमच्या आयुष्यात चांगल्या कर्तृत्वाने तुम्हाला अनेक गोष्टी पूर्ण पालटता येतात. किंबहुना तेच करण्यासाठी तुम्ही जन्म घेतलेला असतो. आधीच्या इयत्तेतील प्रगतीपुस्तक हे तुमचे तोपर्यंतचे ‘कर्मफळ’ दाखवते. पुढच्या इयत्तेत तुम्ही जोरदार अभ्यास करून सुवर्णपदकही जिंकू शकता; म्हणूनच अत्यंत अशिक्षित, गरीब आणि मागास भागात जन्मलेला माणूसही कष्टाच्या जोरावर डॉक्टर, सनदी अधिकारी, वैज्ञानिक झालेला पहायला मिळतो. रिक्शावाल्याची मुलगी सनदी लेखापाल, भांडीवाल्याबाईचा मुलगा जिल्हाधिकारी, हमालाची मुलगी डॉक्टर झालेली आपण पहातो. कर्माचे फळ सांगणार्‍या कर्मविपाक सिद्धांतासमवेतच तुमचे प्रयत्न, श्रद्धेने केलेले कष्ट फळाला येते.

(क्रमशः उद्याच्या दैनिकात)

– श्री. मकरंद करंदीकर, ठाणे