पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) येथील ४० श्री गणेशोत्सव मंडळांवर पोलिसांकडून गुन्हे नोंद !

अधिक ध्वनीपातळी, प्रकाशझोतांचा वापर

प्रतिकात्मक चित्र

पिंपरी (पुणे) – श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनीक्षेपकांचा आवाज मोठा असणे, ‘प्रकाशझोतां’चा (लेझर बीम) उपयोग करणे या प्रकरणी पिंपरी-चिंचवडमधील ४० श्री गणेशोत्सव मंडळांवर पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. त्याचसमवेत ध्वनीक्षेपकांचे मालक, वाहनचालक यांच्यावरही गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रकाशझोतांचा वापर करू नका, ध्वनीक्षेपकांच्या आवाजाची पातळी निश्चित क्षमतेपेक्षा अधिक नसावी, अशा सूचना पोलिसांनी शहरातील सर्वच गणेशोत्सव मंडळांना केल्या होत्या. याकडे मंडळांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. वाकड पोलीस ठाण्यात १७, पिंपरी येथे ८, निगडी आणि सांगवीमध्ये प्रत्येकी ५, दापोडीत ३ आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात २ श्री गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

विनाअनुमती मिरवणूक काढल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद

पिंपळे सौदागरच्या (पिंपरी) मुख्य रस्त्यांवर विनाअनुमती, कोणतीही पूर्वकल्पना न देता ध्वनीक्षेपण यंत्रणा लावून रस्ता रोखून धरला. वाहतुकीस अडचण केली म्हणून अनेक गणेशोत्सव मंडळांतील कार्यकर्त्यांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

पुणे महापालिकेकडून ७०६ टन कचरा संकलित !

पुणे शहरातील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर महापालिकेकडून मार्गांवरील ७०६ टन कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत ओला कचरा ४२० टन, सुका कचरा २८६ टन, सजावट साहित्य ३० टन आणि चप्पल-बूट १ टन ६०७ किलो एवढा कचरा संकलित करण्यात आला.