श्री. अजय केळकर, कोल्हापूर

कोल्हापूर, ८ सप्टेंबर (वार्ता.) – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी देवस्थान विकास परिसराच्या अंतर्गत असलेल्या दीड सहस्र कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्यातील १४३ कोटी ९० लाख रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. या प्रस्तावाच्या अंतर्गत पुरातत्व विभाग, राज्यशासन यांच्याकडून विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. श्री महालक्ष्मीदेवी मंदिर हे अत्यंत प्राचीन असून मंदिरात आणि मंदिर परिसरात असलेल्या अनेक देवतांच्या मूर्ती सध्या भग्नावस्थेत आहेत. ६४ योगिनी, भैरव, काळवेताळ, यक्ष यांसह अन्य अशा १५६ देवतांच्या मूर्ती परत एकदा पुरातत्व विभागाने जतन करून मूळ स्थितीत आणाव्यात, अशा सूचना ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’ने पुरातत्व विभागास केल्या आहेत. त्यापैकी पहिली मूर्ती सिद्ध करण्याचे काम पुरातत्व विभागाकडून चालू आहे.

३५० कोटी रुपयांचा भूसंपादनाचा प्रस्ताव !श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी ३५० कोटी रुपयांचा भूसंपादनाचा प्रस्ताव सिद्ध करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने मंदिराच्या आवारातील ५ दुकानांना स्थलांतरित करून योग्य त्या ठिकाणी जागा देण्यात येणार आहे. विस्तारित कामासाठी साडेचार एकर भूमी संपादन केली जाणार आहे. यात महालक्ष्मी बँक ते बिनखांबी गणेश मंदिर ते मंदिर परिसर, शेतकरी संघाचे कार्यालय परिसर यांसह अन्य ठिकाणांचा समावेश आहे. |
साधारणत: ६ व्या शतकात बांधलेल्या मंदिराचे बांधकाम चालुक्यकालीन शिल्पशैलीसारखे आहे. काळाच्या ओघात अनेक शतके लोटल्यानंतर मंदिर परिसरात असलेल्या अनेक दुर्मिळ आणि प्राचीन मूर्तींची अवस्था चांगली नाही. काही मूर्तींना हात-पाय, डोळे-कान, तसेच अन्य अवयव नाहीत किंवा अस्पष्ट झाले आहेत. ‘हे सर्व अवयव घडवण्यात यावेत’, अशी सूचना मंदिर समितीने पुरातत्व विभागास केली आहे. यातील काही मूर्ती या पूर्णत: दगडातील आहेत, तर काही वाळुकाश्म आहेत.

मंदिर परिसरात ४ सहस्र ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता !
मंदिर परिसरात ४ सहस्र ठिकाणे अशी शोधण्यात आली आहेत, जिथे दुरुस्ती, डागडुजी करण्याची आवश्यकता आहे. काही ठिकाणी दगडांचे कपचे उडाले आहेत, काही ठिकाणी चिरा गेल्या आहेत, काही ठिकाणी संपूर्ण खांब परत सिद्ध करण्याची आवश्यकता आहे.
विद्युत् व्यवस्था, सीसीटीव्ही आणि अग्नीशमन यंत्रणेचे नूतनीकरण !
मंदिर परिसरात असलेल्या संपूर्ण विद्युत् व्यवस्थेचे नूतनीकरण करण्यात येणार असून संपूर्ण भाग नूतनीकरण झाल्यावर त्याच्या वाहिन्या या भूमीगत रितीने सर्वत्र फिरवण्यात येणार आहेत. मंदिराच्या आतमध्येही विशेष विद्युत व्यवस्था करण्यात येणार आहे. मंदिरातील अग्नीशमन यंत्रणाही अद्ययावत् करण्यात येणार आहे. ‘सीसीटीव्ही’ यंत्रणाही अद्ययावत् करण्यात येणार असून भूमीगत गटार योजनाही अद्ययावत् करण्यात येणार आहे.
सध्या मंदिर परिसरात वाहनतळाची प्रचंड मोठी समस्या आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी गाड्या वाहनतळात लावाव्या लागतात. नवीन प्रस्तावित वाहनतळात ३०० हून अधिक गाड्या लावता येतील, असे भव्य वाहनतळ सिद्ध करण्यात येईल.
अन्नछत्र मंडपात ३ ते ५ सहस्र भाविकांना महाप्रसाद देण्याचा प्रस्ताव !
सद्यस्थितीत श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात देवस्थान समितीच्या वतीने अथवा मंदिराच्या वतीने भाविकांना महाप्रसाद देण्याची सोय नाही. प्रस्तावित आराखड्यात अन्नछत्र आणि दर्शन मंडपात अन्नछत्रामध्ये एकाच वेळी ३ ते ५ सहस्र भाविकांना महाप्रसाद घेता येईल, असा भव्य मंडप उभारण्याचा प्रस्ताव देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे.
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली