GST Rates Revised : जी.एस्.टी.तील कपातीमुळे १०० जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार !

  • आरोग्य वस्तू आणि जीवन विमा करमुक्त

  • केंद्र सरकारचा सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा

  • सरकारने कर १८ टक्क्यांवरून थेट ५ टक्क्यांपर्यंत खाली आणले  

(जी.एस्.टी. म्हणजे गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स अर्थात् वस्तू आणि सेवा कर)

अर्थमंत्री निर्मला सीतारामन्

नवी देहली – केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर अर्थात् जी.एस्.टी.मध्ये दरकपात करून सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. ३ सप्टेंबरला जी.एस्.टी. परिषदेच्या झालेल्या ५६ व्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. जी.एस्.टी.तील करकपातीमुळे १०० जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार आहेत. सरकारने हे कर १८ टक्क्यांवरून थेट ५ टक्क्यांपर्यंत खाली आणले आहेत. या पालटांचा उद्देश सामान्य माणसाला दिलासा देणे, लहान व्यवसायांना आधार देणे आणि तंबाखूसारख्या हानीकारक उत्पादनांवर कर वाढवून त्यांचा वापर कमी करणे, हा आहे.

त्यामुळे केंद्र सरकारने तंबाखू, कॉफीनयुक्त पेय, कॅसिनो, क्रिकेट सामन्यांची तिकिटे, ३५० सीसीपेक्षा अधिक क्षमतेची माध्यम आणि मोठी चारचाकी वाहने आदी चैनीच्या गोष्टींवरील कर वाढवला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून, म्हणजे २२ सप्टेंबरपासून हे नवे पालट लागू होतील.

याविषयी माहिती देतांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन् म्हणाल्या की, दूध, गहू, पिझ्झा, ब्रेड यांसह अनेक अन्नपदार्थ जी.एस्.टी.मुक्त असतील. आरोग्य वस्तू आणि जीवन विम्यावर कुठलाही कर आकारला जाणार नाही. यासह ३३ जीवनरक्षक औषधे, दुर्मिळ आजारांसाठीची औषधे आणि गंभीर आजारांसाठीची औषधेदेखील करमुक्त असतील.

या वस्तू स्वस्त होतील !

सुकामेवा, ब्रँडेड नमकीन, दात घासायची पावडर, टूथपेस्ट, साबण, केसांचे तेल, सामान्य अँटीबायोटिक्स, वेदनाशामक औषधे, प्रक्रिया केलेले अन्न, स्नॅक्स, फ्रोझन भाज्या, कंडेन्स्ड मिल्क, काही मोबाईल, काही संगणक, शिलाई यंत्र, प्रेशर कुकर, गीझर यांसारख्या वस्तू स्वस्त होतील. या वस्तूंवरचा कर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत न्यून होणार आहे. यासह नॉन-इलेक्ट्रीक वॉटर फिल्टर, इलेक्ट्रीक इस्त्री, व्हॅक्यूम क्लीनर, १ सहस्र रुपयांपेक्षा अधिक किमतीचे तयार कपडे, ५०० ते १ सहस्र रुपयांपर्यंतचे बूट, अनेक लसी, एच्आयव्ही, टीबी डायग्नोस्टिक किट, सायकली आणि भांडी यावरही कमी दराने कर आकारला जाईल. भूमिती बॉक्स, नकाशे, ग्लोब, ग्लेझ्ड टाइल्स, प्री-फॅब्रिकेटेड इमारती, व्हेंडिंग मशीन, सार्वजनिक वाहतूक वाहने, कृषी यंत्रसामग्री, सौर वॉटर हीटर यांसारख्या उत्पादनांचा समावेश १२ टक्के कर स्लॅबमध्ये होतो. यांवर आता ५ टक्के कर आकारला जाईल.

या पालटांमुळे नागरिकांचे जीवन चांगले होईल ! – पंतप्रधान

पंतप्रधान मोदी

जी.एस्.टी.तील करकपातीविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’मधील पोस्टमध्ये म्हटले की,

स्वातंत्र्यदिनाच्या माझ्या भाषणात मी जी.एस्.टी.मध्ये पुढील सुधारणा आणण्याचा मानस सरकारच्या वतीने व्यक्त केला होता. केंद्र सरकारने जी.एस्.टी.चे दर पालटण्यासाठी आणि प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक सविस्तर प्रस्ताव सिद्ध केला होता. त्याचा उद्देश सामान्य लोकांचे जीवन सोपे करणे आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे, हा आहे.