अहिल्यानगर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ‘मंदिर न्यास जिल्हा अधिवेशन’ !

अहिल्यानगर, २७ ऑगस्ट (वार्ता.) – मंदिर हे हिंदु धर्मियांचे आस्थेचे केंद्र आहे; पण मंदिरांचे सरकारीकरण झाल्यापासून जे विश्वस्त सरकारी मंदिरात सरकारने नेमलेले असतात, त्यांना मंदिराशी काही घेणे-देणे नाही; पण ते मंदिरात दान केलेले पैसे, म्हणजेच दानाचा दुरुपयोग कसा करतात ? याचा पण आपण अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे आपले मंदिर हे सरकारच्या नाही, तर भक्तांच्याच कह्यात पाहिजे आणि प्रत्येक मंदिराने दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या नोंदी करणे आवश्यक आहे. त्या त्या मंदिरातील उपासक हे त्या त्या मंदिराने जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिरही सरकारच्या नव्हे, तर भक्तांच्या नियंत्रणात असणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन कृष्णकृपांकित ह.भ.प. विकासानंद महाराज मिसाळ यांनी केले. ते अधिवेशनात मार्गदर्शन करत होते. श्री रेणुकामाता देवस्थान ट्रस्ट, एम्.आय.डी.सी., नवनागापूर, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर येथे २४ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र मंदिर-न्यास जिल्हास्तरीय एक दिवसाचे अधिवेशन पार पडले. त्या वेळी ते बोलत होते.

या अधिवेशनाचा शुभारंभ सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, कृष्णकृपांकित ह.भ.प. डॉ. विकासानंद महाराज मिसाळ, ‘मंगल सेवा भक्त मंडळा’चे पू. विश्वेश्वर स्वामी महाराज, ‘श्री रेणुकामाता देवस्थान ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री प्रभाकर भोर, हिंदु जनजागृतीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, माजी साहाय्यक धर्मदाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. त्यानंतर सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन मंदिर महासंघाचे अहिल्यानगर संयोजक श्री. भरत शिंदे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत श्री रेणुकामाता देवस्थानचे सचिव श्री. दत्तात्रय विटेकर यांनी केले, तर अधिवेशनाची प्रस्तावना हिंदु जनजागृती समितीचे अहिल्यानगर समन्वयक श्री. रामेश्वर भूकन यांनी मांडली. या अधिवेशनात अहिल्यानगर जिल्हा मंदिर महासंघाची कार्यकारणी घोषित करण्यात आली.
या अधिवेशनाला राहुरी, श्रीगोंदा, आष्टी, अहिल्यानगर, नेवासा, पाथर्डी, संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, शेवगाव, कर्जत, शिरूर येथील विविध मंदिरांचे २५० हून अधिक विश्वस्त, प्रतिनिधी उपस्थित होते.
विशेष
सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनास आणि धर्मशिक्षण फ्लेक्स प्रदर्शनास विश्वस्तांचा चांगला प्रतिसाद होता. अनेक मंदिरामध्ये धर्मशिक्षण फ्लेक्स लावण्याविषयी मागणी मिळाली.
मंदिरे धर्मशिक्षणाची केंद्रे बनायला हवीत ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

मंदिर हा हिंदु संस्कृतीचा वारसा आहे, तो जतन करणे महत्त्वाचे आहे. आपला धर्म, संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य वेळोवेळी मंदिरांमुळे झालेले आहे. मंदिर संस्कृतीचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे. मंदिरात येणार्यांना धर्माचा अभ्यास नसतो. तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्रे झाली आहेत. त्यामुळे तेथील आध्यात्मिक शक्तीचा लाभ होत नाही. मंदिरांमधून धर्मशिक्षण दिले, तर त्यांची श्रद्धा वाढून सशक्त राष्ट्रभक्ती असणारी पिढी निर्माण होईल आणि ती राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात योगदान देईल. मंदिरांतून संस्कारवर्ग घेणे, धर्मशास्त्र समजावून सांगणे हे कार्य नियमित व्हायला हवे. हिंदु समाजाची जन्महिंदु ते कर्महिंदु पर्यंत वाटचाल होण्यासाठी मंदिर अधिवेशन हे प्रभावी माध्यम आहे; म्हणून मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे बनायला हवीत.
मंदिरांचे रक्षण आणि संघटन करण्यासाठी मंदिर महासंघ कटीबद्ध ! – सुनील घनवट, मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक

आपल्या राजे-महाराजांनी मंदिरांची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिरांचे रक्षण केले, तसेच आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचे जीर्णोद्धारही केले. यातून मंदिरांचे महत्त्व लक्षात येते. आज मात्र भारताने ‘सेक्युलरवादी’ राज्यव्यवस्था स्वीकारल्यामुळे मंदिरांवर नवीन पद्धतीने आघात होत आहेत. मंदिरांचे सरकारीकरण आणि त्या मंदिरांत भ्रष्टाचार, पैसे घेऊन ‘व्ही.आय.पी. दर्शन’, मंदिरांची भूमी बळकावणे यांसह ‘वक्फ बोर्डा’चे अतिक्रमण चालू आहे. यामुळे मंदिर रक्षणासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ कार्यरत आहे. मंदिरांच्या समस्या सोडवतांनाच महासंघ मंदिरांचे संघटन करण्यासाठी कटीबद्ध आहे.
या वेळी निवृत्त साहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख यांनी न्यास नोंदणी, तसेच मंदिरांच्या अडचणीसंदर्भात मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात मंदिर विश्वस्तांना मंदिरांच्या भूमीविषयी येणार्या अडचणी याविषयी परिसंवाद आयोजित करण्यात आला. समारोपीय सत्रात मंदिर महासंघाच्या कार्याची पुढील दिशा कशी असावी ? याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. समारोपीय सत्रात हिंदु संघटक श्री. बापू ठाणगे आणि ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर यांनी उपस्थितांना संबोधित केले.
धर्माचे मार्गदर्शन हे फक्त मंदिरातच मिळू शकते ! – पू. विश्वेश्वर स्वामी महाराज, मंगल सेवा भक्त मंडळ
मंदिर हे आपले ऊर्जा स्रोत आहेत. मंदिराच्या माध्यमातून समाजात सात्त्विकता निर्माण होते आणि ती सात्त्विकता आपल्याला व्यसनापासून दूर नेते. सध्या समाजात आपण पहातो तरुण पिढीला धर्माचे मार्गदर्शन राहिले नाही, हे मार्गदर्शन फक्त मंदिरातच मिळू शकते. जो तो ज्याचे त्याचे बघून घेईल, असे विचार सर्वांचे असतात; पण या विचारामुळे मंदिराची किती हानी होत आहे. मंदिरावर आक्रमणे होत आहेत, मंदिराच्या जागा बळकावल्या जात आहेत. तरी आपण जागृत होत नाही; म्हणून प्रत्येक मंदिरात आरती होणे आवश्यक आहे. भगवंताच्या चरणी नतमस्तक होणे आवश्यक आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
नव्या शालेय वेळापत्रकात इयत्ता १ ली ते ८ वीसाठी तिसर्या भाषेचा समावेश नाही !