‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव’ या कार्यक्रमांतून प्रक्षेपित झालेल्या स्पंदनांचा साधक आणि साधिका यांच्यावर झालेला सकारात्मक परिणाम !

‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष यांचे औचित्य साधून फर्मागुडी (गोवा) येथील ‘इन्फिनिटी’ मैदानावर १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी (१८.५.२०२५ या दिवशी) सकाळी १० ते दुपारी १२.४५ या वेळेत ‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ या कार्यक्रमात मान्यवर वक्त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारी १२.५० ते २ पर्यंत ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव’ हा कार्यक्रम झाला. या दोन्ही कार्यक्रमांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा साधकांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने काही संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांसाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला. लोलकाने वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. हे संशोधन पुढे दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ सत्रामध्ये मार्गदर्शन केलेले वक्ते !

डावीकडून श्री. उदय माहुरकर, टी. राजासिंह, श्री. नीरज अत्री, अधिवक्ता विष्णु शंकर जैन

१. चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन

महोत्सवाला उपस्थित असलेले ४ साधक आणि ४ साधिका या संशोधनात्मक प्रयोगात सहभागी झाले होते. या सर्वांची ‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ या कार्यक्रमापूर्वी आणि कार्यक्रमानंतर, तसेच ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव’ या कार्यक्रमानंतर छायाचित्रे काढण्यात आली. या सर्व छायाचित्रांच्या लोलकाने चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील नोंदी पुढे दिल्या आहेत.

टीप – ‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव’ हे कार्यक्रम एका पाठोपाठ असल्याने ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव’ या कार्यक्रमापूर्वी साधक अन् साधिका यांची छायाचित्रे काढण्यात आली नाहीत.

लोलक

१ अ. ‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव’ या दोन्ही कार्यक्रमांचा साधक अन् साधिका यांच्यावर पुष्कळ सकारात्मक परिणाम होणे : प्रयोगातील ४ साधक आणि ४ साधिका यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. या सर्वांमध्ये सकारात्मक ऊर्जा होती आणि दोन्ही कार्यक्रमानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत उत्तरोत्तर वाढ झाली. या सर्वांच्या सकारात्मक ऊर्जेच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.

वरील नोंदींवरून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. प्रयोगातील साधक आणि साधिका यांच्यामध्ये आरंभीही (‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ या कार्यक्रमापूर्वीही) चांगल्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली.

२. ‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ या कार्यक्रमानंतर साधक आणि साधिका यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत अनुमाने ८ ते १४ मीटरने वाढ झाली.

३. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव’ या कार्यक्रमानंतर साधक आणि साधिका यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत अनुमाने ११ ते २० मीटरने वाढ झाली.

१ अ १. निष्कर्ष : ‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव’ या दोन्ही कार्यक्रमांचा प्रयोगातील साधक आणि साधिका यांच्यावर सकारात्मक परिणाम झाले. ‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ या कार्यक्रमाच्या तुलनेत ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव’ या कार्यक्रमाचा सर्वांवर अधिक प्रमाणात सकारात्मक परिणाम झाला.

१ आ. ‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ या कार्यक्रमाचा त्यातील मान्यवर वक्त्यांवर सकारात्मक परिणाम होणे : ‘या कार्यक्रमाचा त्यातील मान्यवर वक्त्यांवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी या कार्यक्रमातील काही मान्यवर वक्त्यांच्या छायाचित्रांच्या लोलकाने चाचण्या करण्यात आल्या. त्या मान्यवर वक्त्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. मान्यवर वक्त्यांच्या छायाचित्रांत आरंभीही पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळून आली आणि त्यांनी विषय मांडल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. हे पुढे दिलेल्या नोंदींवरून लक्षात येते.

१ आ १. निष्कर्ष : मान्यवर वक्त्यांनी कार्यक्रमात विषय मांडल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत अनुमाने ६८ ते १३१ मीटरने वाढ झाली, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. यातून ‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ या कार्यक्रमाचा त्यातील मान्यवर वक्त्यांवर आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला’, असे लक्षात येते.

१ इ. जन्मोत्सवाच्या कार्यक्रमानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ होणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव’ या कार्यक्रमात सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी उपस्थितांना साधनेविषयी अमूल्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमापूर्वी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ३०३२ किलोमीटर होती आणि कार्यक्रमानंतर ती ५१४५ किलोमीटर झाली; म्हणजे त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत २११३ किलोमीटरने वाढ झाली. हे पुष्कळच वैशिष्ट्यपूर्ण आहे.

२. चाचण्यांतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

सौ. मधुरा धनंजय कर्वे

२ अ. प्रयोगातील साधक आणि साधिका यांच्यामध्ये आरंभीही (‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ या कार्यक्रमापूर्वीही) चांगल्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून येण्याचे कारण : प्रयोगातील साधक आणि साधिका यांनी ‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ या कार्यक्रमापूर्वी अर्धा घंटा (सकाळी ९.३० ते १०) श्रीरामाचा सामूहिक नामजप केला होता. या नामजपातील चैतन्याचा त्यांच्यावर पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे त्यांच्यामध्ये आरंभीही (सनातन राष्ट्र पथदर्शन’ या कार्यक्रमापूर्वीही) पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. (श्रीरामाच्या सामूहिक नामजपाचे संशोधन निराळ्या लेखात देण्यात येणार आहे.)

२ आ. ‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ या कार्यक्रमानंतर साधक आणि साधिका यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होण्याचे कारण : ‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ या कार्यक्रमात मान्यवर वक्त्यांनी त्यांचे विषय अभ्यासपूर्ण मांडले. त्यांनी राष्ट्र, धर्म, संस्कृती यांच्या रक्षणार्थ अनेक वर्षे निरपेक्षपणे कार्य केले आहे. यातून त्यांची साधना झाल्याने त्यांच्या वाणीत चैतन्य निर्माण झाले आहे. त्यांच्या बोलण्यातून प्रक्षेपित झालेली सकारात्मक स्पंदने प्रयोगातील साधक आिण साधिका यांनी त्यांच्या क्षमतेनुसार ग्रहण केली. त्यामुळे त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढल्याचे दिसून आले. यातून ‘वक्ते साधना करणारे असतील, तर त्यांच्या मार्गदर्शनाचे समष्टीवर आध्यात्मिकदृष्ट्या किती सकारात्मक परिणाम होतात’, हे लक्षात येते.

२ इ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव’ या कार्यक्रमाचा साधक आणि साधिका यांच्यावर अधिक प्रमाणात सकारात्मक परिणाम होण्याचे कारण : प्रयोगातील साधक आणि साधिका अनेक वर्षांपासून साधनारत आहेत. या सर्वांमध्ये गुरुदेवांप्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती) भाव आहे. प्राणशक्ती अल्प असूनही गुरुदेव तिन्ही दिवशी महोत्सवाला उपस्थित राहिले. त्यांनी जन्मोत्वाच्या दिवशी सर्वांना प्रत्यक्ष मार्गदर्शनही केले. गुरुदेवांची व्यासपिठावर प्रत्यक्ष उपस्थिती आणि त्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन यांमुळे साधक-साधिका भावविभोर झाले. साधक आणि साधिका यांनी त्यांची क्षमता अन् भाव यांनुसार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून प्रक्षेपित झालेले चैतन्य ग्रहण केले. त्यामुळे त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाल्याचे दिसून आले.

२ ई. ‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ या कार्यक्रमात विषय मांडलेल्या मान्यवर वक्त्यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे : ‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मान्यवर वक्त्यांमध्ये गुरुदेवांप्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती) अपार कृतज्ञताभाव आहे. मान्यवर वक्त्यांनी राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणार्थ अनेक वर्षे निरपेक्षपणे कार्य केले आहे. गुरुदेवांनी त्यांना केलेल्या अमूल्य मार्गदर्शनामुळे त्यांची साधना वृद्धींगत झाली आहे. अनेक हिंदुत्वनिष्ठांची आध्यात्मिक प्रगती झाली आहे. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त व्यासपिठावरून विषय मांडणे, म्हणजे जणू त्यांच्यासाठी (मान्यवर वक्त्यांसाठी) साधनेची अमूल्य पर्वणीच होती. ‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ या कार्यक्रमात मान्यवर वक्त्यांनी त्यांचे विषय चैतन्याच्या स्तरावर मांडले. त्यामुळे विषय मांडल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. यातून ‘हिंदुत्वनिष्ठांनी ते करत असलेले कार्य हे ‘साधना’ म्हणून करणे, तसेच त्यासाठी त्यांना आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन लाभणे’, यांचे महत्त्व लक्षात येते.

२ उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये मुळातच पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे आणि जन्मोत्सवाच्या कार्यक्रमानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत विलक्षण वाढ होण्याचे कारण : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे उच्च आध्यात्मिक पातळीचे समष्टी संत आहेत. गुरुदेवांमध्ये मुळातच पुष्कळ चैतन्य आहे. महर्षींनी नाडीपट्टीमध्ये म्हटल्यानुसार गुरुदेवांमध्ये श्रीविष्णूचे तत्त्व असून त्यांच्यामध्ये काळानुरूप विविध देवतांची तत्त्वेही मोठ्या प्रमाणात कार्यरत होत असतात. महर्षींनी नाडीपट्टीमध्ये म्हटल्यानुसार सनातन संस्थेने ‘न भूतो न भविष्यती ।’, अशा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे भव्य दिव्य आयोजन केले. हा महोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे सूक्ष्मातून मोठे कार्य चालू होते. या कार्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात चैतन्य त्यांच्याकडून प्रक्षेपित होत होते. गुरुदेवांचा जन्मोत्सव साजरा करणे, म्हणजे देश-विदेशातील सहस्रो साधक, धर्मप्रेमी, राष्ट्र-धर्म अन् संस्कृती यांच्या रक्षणार्थ कार्य करणारे यांच्यासाठी जणू अमृतयोगच ! सर्वांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ व्हावा, यासाठी प्राणशक्ती अल्प असतांनाही गुरुदेव तिन्ही दिवस सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहिले. त्यांच्या चैतन्यमय उपस्थितीमुळे महोत्सवाचे वातावरण उत्तरोत्तर अधिकाधिक चैतन्याने भारित होत गेले. जन्मोत्सवाच्या कार्यक्रमानंतर गुरुदेवांमधील सकारात्मक ऊर्जेत (चैतन्यात) विलक्षण वाढ होणे, हे जणू भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी गुरुदेवांनी सर्वांना भरभरून चैतन्य प्रदान केल्याचे द्योतक आहे. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या माध्यमातून आम्हा सर्वांकडून साधना करवून घेणारे आणि सर्वांना भरभरून चैतन्य प्रदान करणारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.७.२०२५)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे
निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.