संपादकीय : लोकप्रियता हिंदुहितकारी हवी !

तमिळ अभिनेते जोसेफ विजय

तमिळनाडूत चित्रपटांतून प्रचंड लोकप्रियता मिळवणार्‍या कलाकारांची संख्या पुष्कळ मोठी आहे. भावनांचा प्रचंड कल्‍लोळ, भडक संवाद, अविश्वसनीय ‘स्‍टंट’ हे प्रचंड प्रसिद्धी पावलेल्या दाक्षिणात्‍य चित्रपटांचे समीकरण आहे. ‘चित्रपट हा आभासी असतो’, हे ठाऊक असूनही तमिळनाडूतील बहुतांश लोक चित्रपटातील नायकांना देवत्व बहाल करतात. त्यांना मिळणारी प्रचंड लोकप्रियता देशातील अनेक कलाकारांसाठी हेवा वाटणारी असते. हीच लोकप्रियता काही कलाकारांसाठी राजकारणातील मार्ग ठरतो. चित्रपटातून राजकारणात पोचलेल्या तमिळनाडूतील ९ कलाकारांच्या पाठोपाठ प्रसिद्ध तमिळ अभिनेते जोसेफ विजय यांनी स्वतःची वर्णी लावली आहे. ‘जयललिता यांच्‍या निधनानंतर तमिळनाडूत निर्माण झालेली राजकीय पोकळी विजय भरून काढू शकतील का ?’, यावर मागील वर्षभरापासून खल चालू आहे. काहींच्या मते विजय ही पोकळी भरून काढतील, तर विरोधकांच्या मते त्यांची विधाने चित्रपटातील ‘डायलॉग’प्रमाणे असल्याने त्यात काही हवा नाही.

अभिनेते विजय यांनी त्यांच्या सार्वजनिक सभांमधून मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन आणि द्रमुक सरकार यांच्यावर कठोर टीका केली आहे. कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा, शिक्षण आणि शेतकर्‍यांचे प्रश्न यांवर ते सातत्याने बोलत असतात. नुकतीच मदुराई येथे त्यांच्या पक्षाच्या सभेला जनसागर उसळल्याची वृत्ते प्रसिद्ध झाली. विजय यांचा ‘तमिलगा वेत्री कळघम’ हा पक्ष वर्ष २०२६ मध्‍ये होणारी विधानसभा निवडणूक तमिळनाडूतील सर्व मतदारसंघांतून लढवणार असल्याचे भाष्य त्यांनी केले. लाखो चाहत्यांच्या समोर वल्गना करत त्यांनी भाजपला ‘वैचारिक शत्रू’ आणि द्रमुक पक्षाला स्वतःचा ‘राजकीय शत्रू’ घोषित केले. तसेच ते स्वतःला ‘डाव्या विचारसरणीकडे झुकणारा, सामाजिक न्यायावर आधारित आणि युवाशक्तीवर विश्वास ठेवणारा नेता’ म्हणून पुढे आणत आहेत.

चित्रपट आणि राजकारण यांचा संबंध

एम्.जी. रामचंद्रन्, जयललिता आणि करुणानिधी

तमिळनाडूचे राजकारण हे चित्रपटसृष्टीशी घट्ट बांधलेले आहे. पडद्यावर दिसणार्‍या नायकांनीच प्रत्यक्ष सत्तेची धुरा हाती घेतली, जनतेशी भावनिक नाते जोडून त्यांनी काही दशके स्वतःचे राजकीय वर्चस्व टिकवले. एम्.जी. रामचंद्रन् (एम्.के.आर्.) आणि जयललिता यांची उदाहरणे यासाठी पुरेशी आहेत. १९४०-५० च्या दशकात पेरियार यांच्या स्वाभिमान चळवळीच्या पार्श्वभूमीवर द्रविड पक्षाने समाजजागृतीसाठी चित्रपटांचा आधार घेतला. सी.एन्. अण्णादुरई आणि नंतर एम्. करुणानिधी यांनी पटकथा अन् संवाद यांच्या माध्यमातून जातीभेद, हिंदी भाषा लादण्यावरून आणि द्रविडी अस्मिता या विषयांवरून द्रविड विचारसरणी जनमानसात खोलवर रुजवली आणि स्वतःचा राजकीय पाया बळकट केला. १९६० च्या दशकात एम्.जी. रामचंद्रन् यांनी स्वतःची पडद्यावरील लोकप्रियता प्रत्यक्ष राजकारणात नेली. आधी द्रमुकमध्ये कार्यरत असलेले एम्.के.आर्. यांनी वर्ष १९७२ मध्ये ‘अण्णाद्रमुक’ पक्षाची स्थापना केली. एम्.के.आर्. त्यांच्या चित्रपटातील ‘गरिबांचा तारणहार’ ही प्रतिमा त्यांच्या मतपेटीतही उतरली आणि वर्ष १९७७ ते मृत्यूपर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले. यानंतर त्यांची सहकलाकार जयललिता यांनी नेतृत्व स्वीकारले. ‘अम्मा’ म्हणून प्रसिद्ध झालेल्या जयललिता यांनी काही योजनांच्या जोरावर जवळपास ३ दशके तमिळनाडूच्या राजकारणावर वर्चस्व ठेवले. करुणानिधी आणि जयललिता यांच्यातील स्पर्धेमुळे राज्यात द्रमुक–अद्रमुक ही द्विपक्षीय सत्तास्थिती निर्माण झाली. तमिळनाडूतील साधारण ७० ते ८० टक्के मतदार या दोन्ही पक्षांच्या मागे उभे असतात. उर्वरित २० ते ३० टक्के मतांसाठी अन्य पक्ष धडपडत असतात.

एम्.जी. रामचंद्रन्, करुणानिधी, जयललिता, विजयकांत यांनी सत्तेची चव चाखली. याला अपवाद ठरले, ते प्रचंड मोठा चाहतावर्ग असलेले रजनीकांत ! त्‍यांनी राजकीय पक्षाची घोषणा तर केली; मात्र वर्ष २०२० मध्‍ये विधानसभा निवडणुकीपूर्वी त्‍यांनी राजकारणातून माघार घेतली. तमिळनाडूतील जनतेने कमल हसन यांना नाकारल्‍याचा इतिहासही ताजा आहे.

काही अहवालांनुसार विजय यांच्या पक्षाचे सदस्यत्व कोट्यवधींच्या घरात गेले आहे. चाहत्यांचा उत्साह हा निवडणुकीतील मतांत रूपांतरित करणे, हेच त्याच्यासमोरचे मोठे आव्हान आहे; कारण ‘तमिळनाडूमध्ये दीर्घकाळापासून द्रमुक–अद्रमुक सोडून तिसर्‍या आघाडीस फारसा वाव मिळालेला नाही’, असा राजकीय विश्लेषकांचा अनुभव आहे.

मागील वर्षी विजय यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करत ‘तमिळनाडूत हा कायदा लागू करू नये’, अशी मागणी केली होती. राष्ट्रहिताशी संबंधित धोरणे अवलंबणार्‍या भाजपला विजय  यांनी ‘वैचारिक शत्रू’ का मानले आहे, हे त्यांच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयीच्या वक्तव्यातून दिसून येते. भाजपला ‘वैचारिक शत्रू’ मानणारी एक आघाडीच देशात कार्यरत आहे. अभिनेते विजय यांनी भाजपच्या विचारांना शत्रू मानले, याचा अर्थ दुसर्‍या आघाडीला जी हिंदुद्वेषी आहे, त्यांची मान्यता आहे, असे समजायचे का ?

तमिळनाडूतील हिंदूंना काय हवे ? 

अण्णामलई मंदिर, एकांबरेश्वर मंदिर, रामेश्वरम् ज्योतिर्लिंग, अंजनेय मंदिर यांसारख्या प्राचीन मंदिरांचे राज्य असणार्‍या तमिळनाडूतील जनता अत्यंत भाविक आहे. अत्यंत निष्ठेने सनातन हिंदु धर्म आणि परंपरा यांचे पालन तेथे केले जात असल्याचे आजही पहायला मिळते. त्याच तमिळनाडूत सनातन धर्माला हीन लेखून द्रमुकादी पक्षांनी सातत्याने हिंदु धर्मविरोधी भूमिका घेतली.

‘अल्पसंख्य चळवळीच्या नावाखाली तमिळनाडूमध्ये आतंकवादी कारवाया चालू आहेत. तमिळनाडू सरकार आणि राजकीय पक्ष निवडणुकीत एकगठ्ठा मतांसाठी आतंकवादाला विरोध करण्यास धजावत नाहीत. तमिळनाडूमधील काही फुटीरतावादी चळवळी राष्ट्रीय एकात्मतेच्या विरोधात उघडपणे प्रचार करतात आणि आतंकवादाचे समर्थन करतात. देशाची शांतता भंग करण्याच्या उद्देशाने तमिळनाडूमध्ये आतंकवादी कारवाया वाढीस लागल्या आहेत. केंद्रीय गृहखात्याने याकडे विशेष लक्ष द्यावे’, अशी मागणी तमिळनाडूतील हिंदुत्वनिष्ठांनी केली आहे.

आतापर्यंत चाहतावर्गाच्या संख्येच्या बळावर राजकारण केल्याने तेथील हिंदुहित साध्य झालेले पहायला मिळालेले नाही. मदुराईमध्ये जमा झालेल्या विजय यांच्या चाहत्यांची संख्या मोठी असल्याचा गवगवा होत असला, तरी याच वर्षाच्या फेब्रुवारीमध्येच मदुराईमध्येच पवित्र तिरुपरंकुंद्रम् टेकडीवर मुसलमानांना शिजवलेले मांस वाहून नेण्याची अनुमती दिल्यानंतर तेथील हिंदू मोठ्या संख्येने निषेधासाठी एकत्र आले होतेच. विजय यांच्या मदुराईतील सभेला लाखोंची उपस्थिती असली, तरी तो त्यांचा लाखोंचा ‘चाहतावर्ग’ असू शकतो; परंतु ‘मतदारवर्ग’ असेलच असे नाही. म्हणूनच तमिळनाडूतील जनतेने टोकाची व्यक्तीनिष्ठता जपण्यापेक्षा धर्म आणि देश हित जपणार्‍याला ‘लोकनायक’ म्हणून निवडणे अत्यावश्यक आहे.

तमिळनाडूतील जनतेने लोकप्रियतेपेक्षा देश-धर्म हित जपणार्‍याला ‘लोकनायक’ म्हणून निवडणे आवश्यक !