संपादकीय : ‘तेज’स कि मागास ?

रेल्वेगाडी स्थानकात वेळेत न पोचण्याचा भारतीय रेल्वेचा ‘लौकिक’ जगभर आहे. रेल्वेचा या संदर्भात ‘हात’ धरणारा कुणीही नाही, अशी स्थिती आहे. एखादी गाडी वेळेत रेल्वेस्थानकात पोचली, तर तो दुर्मिळ योग समजला जातो. ही स्थिती अनेक दशके आहे. पंतप्रधान मोदी सरकारने यावर प्रयत्न चालू केल्यानंतर काही काळात नागरिकांना गाड्या वेळेत पोचत असल्याचा सुखद अनुभव मिळू लागला होता; मात्र त्यानंतर ‘गाडी’ पुन्हा तिच्या जुन्या वळणावर पोचली. याला काही प्रमाणात अतीजलद म्हणून मिरवत असलेल्या ‘तेजस’, ‘वन्दे भारत’ या गाड्यांचा मोठा ‘हात’ असल्याचे म्हटले जात आहे. या गाड्यांना प्राधान्य देण्याच्या धोरणामुळे अन्य गाड्यांना मागे ठेवले जात असल्याने त्या उशिराने धावत असल्याचे दिसून येत आहे. असे करूनही या गाड्याही उशिराने धावू लागल्याचे दिसू लागल्यावर जनतेमध्ये संतापाची स्थिती निर्माण झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावर ‘तेजस एक्सप्रेस’ चालवण्यात आल्यानंतर कोकणवासीय आणि पर्यटक यांना वाटले होते की, आता मुंबई-गोवा प्रवास केवळ आरामदायीच नाही, तर अत्यंत वेगवान होणार; मात्र माहिती अधिकारांतर्गत समोर आलेली गेल्या ७ महिन्यांची आकडेवारी पाहिली, तर ‘तेजस’च्या नावाखाली प्रवाशांच्या पदरी केवळ विलंबाचा मनस्ताप आणि सुविधेच्या नावाखाली फसवणूकच पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. १ नोव्हेंबर २०२५ ते १८ मे २०२६ या कालावधीतील कोकण आणि मध्य रेल्वे मार्गांवरील गाड्यांची सत्यस्थिती रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे धिंडवडे काढणारी आहे.

कागदावर ‘सुपरफास्ट’, प्रत्यक्षात विलंबाचा विक्रम !

रेल्वेच्या वेळापत्रकाचा बोजवारा कसा उडाला आहे, हे तेजस एक्सप्रेसच्या वक्तशीरपणाच्या घसरलेल्या टक्क्यांवरून दिसून येते. मडगाव-मुंबई तेजस एक्सप्रेसचा वक्तशीरपणा अवघा २० टक्के, तर मुंबई-मडगाव तेजसचा वक्तशीरपणा ४५ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. आकडेवारी अधिक स्पष्ट करायची झाल्यास, मडगाव-मुंबई तेजसच्या १४२ फेर्‍यांपैकी केवळ २९ वेळा ही गाडी वेळेवर धावली. मुंबई-मडगाव एक्सप्रेसचीही तीच अवस्था असून १४२ फेर्‍यांपैकी केवळ ६४ वेळा तिला वेळेवर पोचता आले. याचा अर्थ उर्वरित सर्व फेर्‍यांमध्ये ही ‘हायप्रोफाईल ट्रेन’ १ ते तब्बल ७-८ घंटे विलंबाने धावत होती. ज्या गाडीसाठी प्रवासी अधिक पैसे मोजतात, तिला जर सर्वसामान्य गाड्यांसारखे घंटोन्‌घंटे ताटकळत रहावे लागत असेल, तर या प्रिमियम सेवेचा लाभ काय ?

केवळ तेजसचेच नाही, तर एल्.टी.टी.-मडगाव एक्सप्रेसचा वक्तशीरपणा ३० टक्के आणि एल्.टी.टी.-करमळी रेल्वेगाडीचा वक्तशीरपणा अवघा २५ टक्के आहे. म्हणजेच कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणार्‍या बहुतांश महत्त्वाच्या गाड्या विलंबाच्या विळख्यात अडकल्या आहेत.

सुविधांची वानवा : प्रवाशांची उघड फसवणूक

तेजस एक्सप्रेस प्रारंभ झाली, तेव्हा तिचे मुख्य आकर्षण होते प्रत्येक आसनामागे असलेली ‘इन्फोटेन्मेंट’ (माहिती आणि मनोरंजन देणारी) स्क्रीन. आज या गाड्यांमधील ही आधुनिक डिजिटल सुविधा पूर्णपणे बंद पडली आहे. अत्यंत संतापजनक गोष्ट म्हणजे या नादुरुस्त स्क्रीन दुरुस्त करण्याऐवजी रेल्वे प्रशासनाने त्या काढून तिथे थेट प्लायवूडचे तुकडे ठोकले आहेत. हा प्रकार प्रवाशांच्या डोळ्यांत धूळ फेकणारा आणि रेल्वेच्या दर्जाची घसरण दाखवणारा आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे भाडे आकारून प्रवाशांना ‘थर्ड क्लास’ दर्जाची व्यवस्था देणे कितपत योग्य आहे ? याची दुसरी बाजू म्हणजे या स्क्रीन प्रवाशांकडून चोरण्यात आल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. प्रवाशांना सुविधाही हव्या आहेत आणि ते गुन्हेगारीही करत आहेत. यावरून ते या अत्याधुनिक सुविधा देण्याच्या लायकीचे नाहीत, असे कुणी म्हटले, तर ते चुकीचे ठरणार नाही !

समस्येचे मूळ

मडगाव एक्सप्रेस, वन्दे भारत, जनशताब्दी आणि तेजस या चारही महत्त्वाच्या गाड्या मडगाव रेल्वेस्थानकाकडे एकापाठोपाठ एक सोडल्या जातात. कोकण रेल्वेचा मार्ग अजूनही अनेक ठिकाणी एकेरी असल्याने आणि मडगाव रेल्वेस्थानकावरील मर्यादित क्षमतेमुळे या गाड्यांची तिथे प्रचंड कोंडी होते. एका गाडीला विलंब झाला की, त्याचा साखळीसारखा परिणाम मागून येणार्‍या सर्व गाड्यांवर होतो. जोपर्यंत या गाड्यांच्या धावण्याच्या वेळा आणि अंतिम स्थानकांमध्ये धोरणात्मक पालट केले जात नाहीत, तोपर्यंत या गाड्या कधीच वेळेवर धावू शकणार नाहीत, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.

काय केले पाहिजे ?

जर कोकण रेल्वेला तिचा ढासळलेला नावलौकिक आणि प्रवाशांचा विश्वास परत मिळवायचा असेल, तर तात्काळ पावले उचलणे आवश्यक आहे. यामध्ये तेजस एक्सप्रेस पूर्वीप्रमाणे केवळ करमळीपर्यंत चालवून तिथूनच ती परत मुंबईला मार्गस्थ करावी. यामुळे मडगाव रेल्वेस्थानकावरील ताण अल्प होईल. अन्य गाड्यांच्या संदर्भातही योग्य अभ्यास करून पालट केला पाहिजे, जेणेकरून गाड्या उशिरा धावणार नाहीत. आसनामागील प्लायवूड हटवून तिथे पुन्हा दर्जेदार स्क्रीन बसवाव्यात आणि गाड्यांचा अंतर्गत दर्जा सुधारावा. जर प्रवाशांकडून स्क्रीनची चोरी होत असेल, तर गाडीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून अशा चोरांकडून दंड वसूल करण्यासह त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

‘तेज’ गाड्या पांढरा हत्ती ठरू नयेत !

कोकण रेल्वे ही कधीकाळी भारतीय रेल्वेचे इंजिनीयरिंगचे आश्चर्य मानली जात होती; मात्र आज ती केवळ प्रशासकीय अनास्थेची बळी ठरत आहे. ‘वन्दे भारत’ आणि ‘तेजस’ सारख्या आधुनिक गाड्यांचे इंजिन केवळ चकचकीत असून चालत नाही, तर त्यांचे नियोजनही तितकेच वेगवान आणि अचूक असावे लागते. प्रवाशांचा वेळ आणि पैसा या दोन्हीची किंमत रेल्वेने ठेवायला हवी, अन्यथा प्रवासी रेल्वेकडे पाठ फिरवून रस्ते किंवा विमान वाहतुकीचा पर्याय निवडतील अन् रेल्वेच्या या महत्त्वाकांक्षी गाड्या केवळ पांढरा हत्ती ठरतील. रेल्वे मंत्रालयाने आता तरी जागे व्हावे आणि तातडीने सुधारणा कराव्यात, हीच कोकण रेल्वेच्या प्रवाशांची अपेक्षा आहे. केवळ कोकण रेल्वेच नव्हे, तर देशातील प्रत्येक गाडी वेळेवर पोचली पाहिजे, यासाठी रेल्वे प्रशासनाने कटीबद्ध राहून घाम गाळला पाहिजे !

‘कोणतीही गोष्ट वेळेत चालू करून वेळेत पूर्ण करणे’, हा संस्कार भारतियांमध्ये नसल्यानेच तो रेल्वेतही दिसून येत असून आश्चर्य ते काय ?