संपादकीय : बांगलादेशी हिंदूंचे ‘जय श्रीराम’ !

हिंदूूंंचा नरसंहार, तसेच अनन्वित अत्याचार होणार्‍या बांगलादेशात नुकत्याच झालेल्या हिंदूंच्या विशाल ‘मशाल मोर्चा’मुळे आशेचा किरण दिसत आहे. बांगलादेश येथील गाईबांधाच्या पोलाश बाडी येथे श्रीरामाच्या ८१ फूट उंच मूर्तीसह मंदिराचे बांधकाम चालू होते; मात्र या विरोधात ‘जमात-ए-इस्लामी’च्या नेतृत्वाखाली कट्टरतावादी मुसलमानांनी मोहीम चालू केली, जमावाने मंदिराबाहेर घोषणा दिल्या आणि श्रीरामाच्या मूर्तीवर बूट फेकले. श्रीरामाच्या या घोर अवमानाच्या विरोधात हिंदूंनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यास, ठिकठिकाणी मोर्चे काढून निषेध नोंदवण्यास प्रारंभ केला आहे. बांगलादेशात निघालेला मशाल मोर्चा हा त्याच निषेधाचा भाग आहे. या मशाल मोर्चात श्रीरामाच्या अवमानामुळे संतप्त झालेल्या हिंदूंचे चेहरे उजळून निघाले होते. हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर, हिंदूंवर वारंवार आघात करणार्‍यांच्या विरोधात हिंदूंच्या झालेल्या या एकजुटीमुळे अन्य हिंदूंना बळ मिळेल.

हिंदूंवरील अत्याचार

बांगलादेशातील हिंदूंसाठी काम करणार्‍या तुरळक संघटना या त्यांच्या सामाजिक माध्यमांच्या खात्यांद्वारे बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडण्याचे काम करतात. त्यामुळेच बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांची माहिती जगाला होते.   अन्यथा हे अत्याचार जगाला कळलेही नसते. बांगलादेशात धर्मांध मुसलमानांची संख्या अधिक आहे. शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकण्याचे दिवस भारतियांनी पाहिले आहेत. काही कळायच्या आत बांगलादेशातील सरकार पत्त्यासारखे कोसळले. हा शेख हसीना यांच्या सरकारविरुद्धचा उठाव असतांना प्रत्यक्षात हिंदूंची मंदिरे, श्रद्धास्थाने यांना लक्ष्य करण्यात आले. हिंदूंच्या घरांची हानी करण्यासह हिंदूंच्या हत्या आणि हिंदु महिला-मुली यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आले. त्यामुळे ‘हा सरकारविरुद्ध उठाव आहे कि हिंदूंविरुद्ध ?’ एवढी भीषण परिस्थिती होती. बाबरी ढाचा पाडल्यानंतरही मोठ्या प्रमाणात उसळलेल्या दंगलीत बांगलादेशातील हिंदूंना ठार करण्यात आले होते. ३-४ वर्षांपूर्वी बांगलादेशात एका धर्मांधानेच कुराण भूमीवर ठेवले होते आणि त्याची निंदा केल्याचा आळ हिंदूंवर घातला. तेव्हाही हिंदूंविरुद्ध दंगली घडवण्यात आल्या. यामध्ये दुर्गापूजेचे मंडप पाडणे, जाळणे, श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड करणे, ‘इस्कॉन’ संस्थेचे आश्रम आणि कार्यालये यांवर आक्रमणे करणे, अशा विविध प्रकारे हिंदूंना लक्ष्य करण्यात आले होते. बांगलादेशातील हिंदु महिला आणि मुली यांना तर नरकयातना भोगाव्या लागत आहेत. त्यांना वस्त्रहीन करून त्यांचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित करणे, महिलांचा विनयभंग करणे, महिला आणि मुली यांचे बळजोरीने धर्मांतर करणे हे प्रकार प्रतिदिन घडत असतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार समितीपुढे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांचे, मंदिरे पाडण्याचे संबंधित अहवालांचे आकडे भयावह आहेत. याविषयी विदेशातील एखादा लोकप्रतिनिधी त्यांच्या सभागृहात बांगलादेशातील स्थितीकडे लक्ष देण्याची आणि हिंदूंवरील अत्याचार रोखण्याची मागणी करतो, बस ! यापुढे काही होत नाही.

हिंदूंना कुणी वाली नाही !

हिंदूबहुल देश भारत तर बांगलादेशाच्या शेजारीच आहे; मात्र ‘तेथील हिंदूंचा, म्हणजेच अल्पसंख्यांकांचा आपल्याशी काही संबंधच नाही’, अशा आविर्भावात सरकारी यंत्रणा आहेत कि काय ?, असे वाटते. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांची प्रकरणे उघड होत असतांना शासनकर्ते काही करत नाहीत. जोपर्यंत हे अत्याचार व्यापक आणि भयावह रूप धारण करत नाहीत, तोपर्यंत भारत सरकार काही करत नाही. हे अत्याचार वाढल्यावर केवळ एक पोकळ शाब्दिक निषेध केला जातो. अशाने बांगलादेशातील अल्पसंख्यांकांचे रक्षण होणार आहे का ? बांगलादेशात हिंदूंची सुरक्षा ‘रामभरोसे’ आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ ही संस्था आणि अन्य १-२ संस्था या हिंदूंना त्यांच्या परीने कायदेशीर, वैद्यकीय साहाय्य करतात. पू. अधिवक्ता रवींद्र घोष हे वयोवृद्ध असूनही एखाद्या तरुणाला लाजवेल या गतीने आणि तळमळीने बांगलादेशातील हिंदूंसाठी प्रयत्नशील असतात. या व्यतिरिक्त बांगलादेशातील ‘श्री दुर्गापूजा समिती’सारखी मंडळे अल्प प्रमाणात स्थानिक हिंदूंसाठी कार्य करून किमान सण-उत्सव तरी साजरे होतील, हे पहात आहेत; मात्र जिहादी, धर्मांध हे विकृत मनोवृत्तीचे असल्याने कधी श्री दुर्गापूजा मंडपांवर आक्रमणे करून ते तोडतील, उद्ध्वस्त करतील, याचा नेम नाही.

बांगलादेशात अशी भीषण परिस्थिती असतांनाही गत २ वर्षांमध्ये मुसलमानांकडून जे उठाव झाले, तेव्हा इस्कॉनचे माजी नेते चिन्मय कृष्ण दास प्रभु यांना अटक झाली होती. तेव्हा हिंदूंनी चिन्मय कृष्ण दास प्रभु यांना त्यांचा नेता मानले आणि त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी निदर्शने करून सरकारवर दबाव निर्माण केला. या वेळी हिंदूंचा मुसलमानांच्या समवेत काही ठिकाणी संघर्षही झाला, तरी हिंदू मागे हटले नाहीत. मोठ्या संख्येने हिंदु समाज रस्त्यावर निषेध करण्यासाठी उतरला होता. त्यांच्या या अभूतपूर्व एकीमुळे धर्मांध आणि कट्टरतावादी सरकारलाही नमावे लागले होते. भारत सरकारने हिंदूंवरील अत्याचारांचा निषेध केला. या आंदोलनाची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली होती. बांगलादेशासारख्या अतिशय जहाल, क्रूर, वासनांध आणि हिंदुविरोधी देशात हिंदूंचे संघटन होऊ शकते, यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता. जणू तेथे हिंदूंचा निर्वंश झाला, अशी परिस्थिती असतांना, सर्वच स्तरांतील हिंदूंचे प्रभावी संघटन पहाण्यास मिळाले. श्रीरामाच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी पुन्हा एकदा अशाच अभूतपूर्व संख्येत हिंदू एकत्र आले आहेत. सध्या एकाच जिल्ह्यात उभारण्यात येणार्‍या श्रीराममूर्तीच्या अवमानामुळे हिंदूंनी बांगलादेशातील ६४ जिल्ह्यांमध्ये श्रीराममूर्तीची स्थापना करण्याचा निश्चय केला आहे. बांगलादेशातील हिंदूंनी त्यांना अन्य कुणी साहाय्य करील, या भ्रमात राहू नये. हिंदूंना हिंदु म्हणून साहाय्य मिळण्याचे दिवस अजून आलेले नाहीत. तसे कोणतेही सरकार अथवा नेता सध्या जगाच्या पाठीवर नाही. उलट पाश्चात्त्य देशांमधील काही लोकप्रतिनिधी स्वत:च्या स्तरावर हिंदूंसाठी आवाज उठवत आहेत. हिंदूंना कुणी नेता अथवा सरकार साहाय्याला नसले, तरी हिंदूंनी घाबरण्याचे कारण नाही. हिंदूंना संघटित होऊन मशाल मोर्चा काढण्याची बुद्धी श्रीरामानेच दिली. श्रीराम हा रामराज्याच्या केंद्रबिंदू आहे. रामराज्य श्रीरामच आणू शकतो किंवा श्रीरामाची भक्ती करून रामभक्तच रामराज्य आणू शकतात. रामराज्यापूर्वी भयानक संघर्ष, युद्ध होणे हे ओघाने आलेच, त्याविना रामराज्याची फळे चाखायला मिळणार नाहीत. बांगलादेशात सध्या हिंदूंवर अत्याचार करणारी रावणाची राजवटच हिंदू अनुभवत आहेत. ही राजवट दूर होऊन हिंदूंसाठी सुरक्षित आणि रहाण्यायोग्य वातावरण निर्माण होण्यासाठी हिंदूंनी संघटित होण्यासह रामभक्ती करण्याला पर्याय नाही.

श्रीरामाच्या अवमानाविरुद्ध संघटित होणारे बांगलादेशातील हिंदू हे सर्व हिंदूंसाठी आदर्शवत !