संपादकीय : भारताने संपूर्ण स्वदेशी व्हावे ! 

भारतावर ब्रिटिशांचे राज्य येईपर्यंत देश ‘आत्मनिर्भर’ होता. भारतातून परदेशात मोठ्या प्रमाणात व्यापार चालत होता. भारतातील मसाले, धान्य, कापड, भांडी आदी वस्तू विदेशात निर्यात केल्या जात होत्या. इतकेच नव्हे, तर शिक्षणातही भारत विश्वगुरु होता. परदेशातून विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी येत होते. नालंदा आणि तक्षशिला येथील विश्वविद्यालये प्रसिद्ध होतीच, तसेच प्रत्येक गावामध्ये गुरुकुल होते. त्या वेळी ‘भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न २८ टक्क्यांच्याही पुढे होते’, असे म्हटले जाते. आता ते ६ टक्क्यांच्या आसपास आहे. यातून आपल्याला भारताला त्या वेळी ‘सोने की चिडीया’ का म्हटले जात होते, हे लक्षात येईल. देशाची समृद्धी आणि ऐश्वर्य यांमुळे मुसलमान आक्रमक, नंतर डच, पोर्तुगीज, फ्रेंच अन् इंग्रज यांनी भारतावर आक्रमण केले आणि देशाची लूट केली, तसेच भारताची शिक्षणव्यवस्था नष्ट करून कारकुनी पद्धतीची शिक्षणव्यवस्था आणून भारतियांच्या उद्योग व्यवसायाची मानसिकताही नष्ट केली. पूर्वी घराघरांमध्ये व्यवसाय केला जात होता. गावांमध्ये १२ बलुतेदार होते. त्यामुळे कोणत्याही कामासाठी कधी गावाबाहेर जावे लागत नव्हते. लोहार, सोनार, सुतार, शिंपी, न्हावी, गुरव, मांग, परीट (धोबी) आदी गावातच असल्याने गावातल्या गावात व्यापार चालत होता. प्रत्येक जण त्याच्या कामाच्या मोबदल्यात स्वतःकडील कामाची देवाणघेवाण करत होता. सुतार लोहाराकडून काम करून घेतांना सुताराच्या संदर्भात सेवा द्यायचा, तर लोहार सुताराकडून काम करून घेतांना लोहार काम करून देत होता. ही व्यवस्था पूर्णपणे स्वदेशी होती. इंग्रजांनी ही व्यवस्था जाणीवपूर्वक नष्ट केली आणि भारताला दरिद्री केले. स्वातंत्र्यानंतर हे समजायला आणि त्यात पुन्हा पालट करत भारताला मूळ पदावर आणणे आवश्यक होते. काँग्रेसचे तत्कालीन सर्वेसर्वा मोहनदास गांधी यांनीही स्वातंत्र्यानंतर खेड्यांच्या विकासाकडे लक्ष देण्यास सांगितले होते; मात्र इंग्रजाळलेले तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आणि पाश्चात्त्य शिक्षणपद्धत तशीच चालू ठेवण्यासह, स्वदेशीचा प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. स्वातंत्र्यपूर्वकाळात स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वतः मोहनदास गांधी यांनी स्वदेशीचा पुरस्कार करत त्यानुसार आचरण केले; मात्र स्वातंत्र्यानंतर त्यानुसार भारताला घडवण्याचे प्रयत्न झाले नाहीत. जनतेमध्ये स्वदेशीची भावनाही जागृत केली गेली नाही किंवा स्वदेशी उत्पादने कशी निर्माण केली जातील ? यासाठीचे प्रयत्नही झाले नाहीत. त्याच वेळी चीन आणि जपान यांनी मात्र त्यांच्या जनतेला याचे महत्त्व सांगून आधुनिकतेतही स्वतःचा देश कसा पुढे जाईल ? यासाठी कष्ट घेत प्रयत्न केले अन् आज भारतच नाही, तर संपूर्ण जग चिनी वस्तूंचा वापर करत आहेत.

परावलंबी देश गुलाम रहातो !

आज अमेरिका आणि युरोपीय देशांकडे भारताला हात पसरावे लागतात. जर भारत स्वदेशी वस्तूंनी स्वयंपूर्ण झाला असता, तर आज तो पुन्हा जागतिक स्तरावर महासत्ता असता. पुन्हा व्यापारात भारत पहिल्या क्रमांकावर आला असता. वर्ष १९९१ पर्यंत भारताने विदेशी आस्थापनांना भारतात गुंतवणूक करण्यास निर्बंध घातले होते, जेणेकरून भारतीय आस्थापनांना पुढे जाण्यास साहाय्य होईल; मात्र याचा परिणाम अपेक्षित न झाल्याने भारताला खासगीकरणाचे धोरण स्वीकारून परदेशी आस्थापनांसाठी भारतीय बाजारपेठ खुली करण्यासह गुंतवणूक करण्यासही अनुमती दिली. त्या वेळी १ डॉलरचे मूल्य १६ रुपये होते. आज ते ८७ रुपये झाले आहे. आज भारताची बाजारपेठ विदेशी वस्तूंनी व्यापलेली आहे. भारतीय वस्तू मिळणे अवघडच मानले जाते. ही स्थिती भारताला गुलामगिरीत टाकते. यामुळेच आज अमेरिका भारतावर आणखी दबाव आणून अन्य जी क्षेत्रे विदेशांसाठी बंद आहेत, ती उघडण्याची मागणी करत आहे. भारत आज नकार देत आहे. त्यामुळे संघर्ष होत आहे. ही गुलामगिरीची बेडी तोडण्यासाठी आतापासून भारतियांनी प्रयत्न केला, तर भविष्य चांगले होणार आहे. अन्यथा विदेशांकडून धमकावले जात रहाणार. यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी भारतियांना स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचा आणि व्यापार्‍यांना स्वदेशी वस्तू विकण्याचे आवाहन केले आहे. आता या वस्तूंची गुणवत्ता अधिकाधिक कशी चांगली होईल, तसेच त्याचे मूल्य नागरिकांना परवडणारे असेल, याचाही विचार करून भारतीय आस्थापनांनी कंबर कसली पाहिजे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी अनेक व्यापार क्षेत्रांत स्वदेशीचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला चांगले यशही मिळाल्याचे दिसून आले. नुकत्याच झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय ‘आकाश’ हवाई प्रणाली आणि ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र यांचा पराक्रम संपूर्ण जगाने पाहिला. दोन्ही स्वदेशी बनावटीच्या यंत्रणा आहेत, म्हणजेच भारत विदेशींच्या तोडीच्या गोष्टी बनवू शकतो आणि बनवत आहे, हे सिद्ध होते. आता भारत शस्त्रेही विकू लागला आहे. जी गोष्ट भारताच्या स्वातंत्र्यापासून चालू व्हायला हवी होती, ती आता होत आहे, हेही नसे थोडके असे म्हटले, तर चुकीचे ठरू नये. आज प्रत्येकाच्या हातात भ्रमणभाष आहेत, जे विदेशी आहेत. गूगल, यू ट्यूब, फेसबुक, एक्स, टेलिग्राम, इन्स्टाग्राम ही सामाजिक माध्यमे विदेशी आहेत. आता भारताने यांवर उपाय म्हणून भारतीय माध्यमे निर्माण करणे आवश्यक आहे. चीननेही त्याची स्वतःची सामाजिक माध्यमे निर्माण केल्याने वर उल्लेखलेल्या सामाजिक माध्यमांना कोणत्या प्रकारचा वाव नाही आणि देशाशी संबंधित महत्त्वाची माहिती कोणत्याही माध्यमालाच काय, कोणत्याही देशाला ती सहजासहजी मिळत नाही. येथे लक्षात घेतले पाहिजे की, एखादा देश जितका स्वावलंबी असतो, तितका तो अधिक काळ टिकून रहातो. याउलट परावलंबी देशाला नेहमीच गुलाम रहावे लागते.

‘स्वदेशी’ जीवनशैली व्हावी !

या सर्व प्रयत्नांमध्ये सामान्य जनतेचे दायित्व सर्वांत मोठे आहे. स्वदेशी हे केवळ सरकारचे धोरण न रहाता प्रत्येकाच्या जीवनशैलीचा भाग व्हायला हवे. भारतीय वस्तू वापरणे, म्हणजे आपल्या शेतकर्‍याला, कारागिराला साहाय्य करणे होय. जर प्रत्येकाने आपल्यातील खर्चातील किमान ८० टक्के भाग स्वदेशी वस्तूंवर व्यय केला, तर देशाचे चित्र पालटू शकेल. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात शक्य तितक्या भारतीय वस्तूंचा वापर करण्याची सवय लावली पाहिजे. कपडे, भांडी, अन्नपदार्थ, खेळणी, औषधे या सर्व क्षेत्रांत स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देता येते. विवाह, सण, उत्सव यांमध्ये परकीय वस्तूंचा दिखावा टाळून स्थानिक उत्पादनांना संधी दिली पाहिजे. शाळा-महाविद्यालयांनी ‘स्वदेशी सप्ताह’ साजरा करावा, उद्योगपतींनी स्थानिक कारागिरांशी सहकार्य करावे, तर शासनाने आधुनिक तंत्रज्ञान आणि आवश्यक ते प्रशिक्षण देऊन स्वदेशी वस्तूंची गुणवत्ता उंचावली पाहिजे. व्यापाराच्या दृष्टीने स्वदेशीचा वापर वाढल्यास आयात न्यून होईल आणि परकीय चलनाची बचत होईल. चीनने त्याच्या स्वदेशी उत्पादनांच्या जोरावर जगात स्थान निर्माण केले, त्याचप्रमाणे भारतही हे साध्य करू शकतो.

भारतियांना आता ‘स्वदेशी होणे, ही खरी देशभक्ती आहे’, हे शिकवणे आणि तसे संस्कार करणे, ही काळाची आवश्यकता आहे !