आजच्या ‘नक्षलवाद आणि जनसुरक्षा’ विशेषांकाच्या निमित्ताने…   

भारताच्या सीमारेषांवर पाकिस्तान आणि चीन या शत्रूराष्ट्रांसह अंतर्गत एक शत्रू निर्माण झाला आहे. हा शत्रू म्हणजे नक्षलवाद ! आतापर्यंत सर्वसामान्य नागरिकांना नक्षलवाद, माओवाद, साम्यवाद आदींविषयीची जुजबी माहिती काही घटनांच्या निमित्ताने त्या त्या वेळी प्रसिद्ध झालेल्या लेखांद्वारे मिळाली असेल; पण त्यांचे व्यापक स्वरूप फारच भयानक आहे. माओवाद हे नक्षलवादाचे उगमस्थान आहे. सर्वसामान्यांना नक्षलवाद म्हणजे ‘तोंडाला कापड बांधलेले आणि हातात बंदूक असलेले आदिवासी समाजातील तरुण’, असा समज आहे. हे चुकीचे नाही; पण केवळ या आदिवासी समाजातील लोकांना नक्षलवादी कारवायांसाठी सिद्ध करणारे माओवादी हे आदिवासी नाहीत, तर सुशिक्षित किंवा उच्चशिक्षित शहरात रहाणारे आहेत. यांनाच ‘शहरी नक्षलवादी’ म्हणण्यास गेल्या दशकात प्रारंभ झाला. त्यापूर्वी काँग्रेसच्या राजवटीत या शहरी नक्षलवाद्यांना पोसले गेले आणि त्यांच्यामुळेच सशस्त्र नक्षलवाद्यांना बळ मिळत होते. हे शहरी नक्षलवादी भारतीय प्रशासनात अधिकारी म्हणून, महाविद्यालयांत प्राध्यापक म्हणून आदी ठिकाणी छुप्या रितीने  वावरत आहेत, तर काही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली कार्यरत आहेत, म्हणजेच आपला तिसरा शत्रू आपल्या यंत्रणेत (सिस्टममध्ये) सामावलेला असून तो आपल्या दारापर्यंत पोचला आहे. या विशेषांकाच्या निमित्ताने एकूणच नक्षलवादाचे व्यापक स्वरूप आणि साम्यवादाचे भयंकर स्वरूप वाचकांच्या लक्षात यावे अन् त्याविषयी सतर्क होण्यासह सर्वसामान्य नागरिकांनी नक्षलवादाच्या विरोधात सनदशीर मार्गाने पेटून उठावे, हीच अपेक्षा !

– संपादक