परराष्ट्र धोरणाची अनेक अंग आहेत, त्यातील सांस्कृतिक कूटनीतीचे महत्त्व अधिक आहे. भारताकडे मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. त्यात रामाचे माहात्म्य आणि महत्त्व अगाध आहे. ‘सब नर करहिं परस्पर प्रीती । चलहिं स्वधर्म निरत श्रुति नीती ।।’ म्हणजेच सर्वांमध्ये सामाजिक सौहार्द, परस्पर विश्वास आणि प्रेमाचे वातावरण असावे. सगळे आपापले धर्म, उत्तरदायित्व पार पाडत आहेत, याची जाणीव प्रत्येकास असावी. हे रामायणातील उद्बोधन जगासाठी शांततेचा संदेश आहे. त्यामुळेच रामायण ही भारताने जगाला दिलेली सुंदर भेट आहे.

१. श्रीराम म्हणजे आधुनिकता आणि विचारांची मुक्तता
मागे पंतप्रधान मोदी यांनी अगदी समर्पक शब्दांत श्रीरामाचे वर्णन केले होते, ‘‘श्रीराम म्हणजे आधुनिकता आणि विचारांची मुक्तता म्हणूनच तो सर्वव्यापी आहे, सर्व मानवजातीचा आहे. त्यामुळे राम हा भारताच्या ‘विविधतेतील एकतेचा’ धागा आहे.’’

वर्ष २०२० मध्ये ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी युनायटेड किंगडम येथे दिवाळीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात म्हटले होते, ‘‘ज्याप्रकारे रामाने आणि सीतेने रावणाचा विनाश केला, त्याप्रमाणे आपण कोरोनावर विजय मिळवू.’’ यावरून आंतरराष्ट्रीय जगतातसुद्धा ‘‘रामो राजमणिः सदा विजयते ।’’ हे प्रचंड भिनले आहे, असे लक्षात येते. भारताने ब्राझीलला लसींच्या रूपाने साहाय्य पाठवल्यावर तेथील राष्ट्राध्यक्ष बोलसेनारोंनी या साहाय्याला थेट हनुमानाच्या संजीवनी बुटीशी जोडणे आणि तसा फोटो ट्वीट करणे यातही रामायणाविषयीचे कुतूहल जगात किती आहे हे प्रकर्षाने जाणवते.
२. रामायण हे भारताला दक्षिण पूर्व आशियाई देशांशी जोडणारे प्रभावी माध्यम
मोदी सरकारच्या ‘ॲक्ट ईस्ट पॉलिसी’साठी श्रीराम हा महत्त्वाचा सांस्कृतिक दुवा आहे. लाओसमध्ये ‘फ्रा लक फ्रा राम’, कंबोडियामध्ये ‘रामकेर्ती’, थायलंडमध्ये ‘रामाकिएन’ इत्यादी रामायणाच्या कथा पूर्वापार चालत आल्या असून अजूनही जपल्या जात आहेत. रामायण हे भारताला दक्षिण पूर्व आशियाई देशांशी जोडणारे प्रभावी माध्यम आहे.
३. अनेक देशांनी घेतली आहे रामायणाची दखल
अगदी पंतप्रधान मोदींच्या इंडोनेशियन भेटीदरम्यान आणि त्यानंतरही जगातील सगळ्यात मोठी इस्लामिक वस्ती असूनही इंडोनेशियाने रामायणाची दखल घेतली. वर्ष २०१९ मध्ये जकार्तामध्ये रामायणावर आधारित ‘पतंग महोत्सवा’चे आयोजन केले. त्याचबरोबर ‘रामायणा’चा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित केला. या महोत्सवानंतर श्रीरामावर प्रचंड श्रद्धा असणार्या इंडोनेशियातील जावा बेटावरील नागरिकांना आपोआपच भारताबद्दल आदर आणि जवळीक वाटू लागली. अयोध्येची राजकुमारी सुरीरत्न हिने इसवी सनाच्या पहिल्या शतकात सुरो या कोरियन राजाशी विवाह केला, अशी आख्यायिका साऊथ कोरियात आहे. यामुळे अनेक कोरियन लोक प्रतीवर्षी अयोध्येला भेट देतात. याच संदर्भात मागे एकदा साऊथ कोरियातील तात्कालिक राष्ट्रपतींच्या पत्नीने अयोध्येतील दीपावली उत्सवात भाग घेतला होता. या भेटीगाठींमुळेच साऊथ कोरिया आणि भारतातील धार्मिक जनसंवादाला अधिक वाव मिळतो. जपानच्या दिग्दर्शकाने बनवलेले ॲनिमेटेड रामायण बघतच तर आमची पिढी मोठी झाली आहे. जातक कथेतील दशरथाची गोष्ट ज्यात बुद्धांनी मागील एका जन्मात आपण स्वयं श्रीराम असल्याचे सांगितले आहे.
४. रामायणाचा बहुआयामी दृष्टीकोन स्वीकारणे काळाची आवश्यकता
भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाच्या ‘रामायण सर्किट’ ह्या प्रकल्पामुळे आशियाई देशांना श्रीराम नामाच्या एका सांस्कृतिक धाग्यात बांधणे सहज शक्य होणार आहे. याचबरोबर आंतराराष्ट्रीय पातळीवर लोकांचा संवाद वाढवणे, व्यवसायांना प्रोत्साहन देणे त्याचबरोबर सरकारी संवाद वाढवणे हा त्यामागील महत्त्वाचा उद्देश आहे. या ‘रामायण सर्किट’मुळे भारतात मधुबनी चित्र काढणार्या कलाकारांना आंतरराष्ट्रीय संधी निर्माण होतील. रामायणाशी संबंधित छोट्या व्यवसायांना चालना मिळेल. त्याचबरोबर कोरिया, जपान, जावा, कंबोडिया यांसारख्या देशांमध्ये संस्कृतीचा अभ्यास करणार्या नव्या पिढीला रामायणाच्या विविध ग्रंथांच्या अनुवादित आवृत्त्याही सहज उपलब्ध होतील. सांस्कृतिक पर्यटनाच्या निमित्ताने आशियाई सरकारांमध्ये संवाद प्रस्थापित करणे सोपे होईल; म्हणूनच आशियाई देशांतील संबंध अधिक वृद्धींगत करण्यासाठी रामायणाचा बहुआयामी दृष्टीकोन स्वीकारणे काळाची आवश्यकता आहे.
आनृशंस्यमनुक्रोशः श्रुतं शीलं दमः शमः ।
राघव शोभयन्त्येते षड्गुणाः पुरुषोत्तमं ।।
अर्थ : अहिंसा, दया, विद्वत्ता, सुशील, आत्मसंयम आणि शांत चित्त हे गुण मर्यादा पुरुषोत्तमाची शोभा वाढवतात. श्रीरामाकडून आत्मसात् केलेले हेच ६ गुण परराष्ट्र धोरणाची मुख्य उद्दिष्टे म्हणून सहस्रो वर्षांपासून भारताची शोभा वाढवत आहेत.
– शांभवी प्रमोद थिटे, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी देहली.
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?