भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक लोकमान्य टिळक !

आज ‘लोकमान्य टिळक यांचे पुण्यस्मरण’ आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक लोकमान्य टिळक यांचे नाव आपण घेतले की, आपल्या मनात एक वेगळीच प्रेरणा निर्माण होते. लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणाचे साक्षात् स्वरूप होते.

लोकमान्य टिळक

१. राष्ट्रीय सभेच्या मवाळ कालखंडाची स्थिती

आता आपल्या मनात असा प्रश्न निर्माण होईल, ‘लोकमान्य टिळक यांनाच का बरे स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक म्हणायचे ?’, या प्रश्नाचे उत्तर देतांना आपल्याला राष्ट्रीय सभेच्या मवाळ कालखंडाचा विचार करावा लागेल. राष्ट्रीय सभेची स्थापना वर्ष १८८५ मध्ये झाली. त्या वेळी मोठमोठी भाषणे देणे, लहान-मोठे ठराव संमत करणे आणि त्याविषयी ब्रिटीश सरकारचे आभार मानायचे, अत्यंत संथपणे सारा कारभार पुढे ढकलायचा, असेच त्या वेळी चालले होते. ब्रिटीश राजवटीच्या विषारी वृक्षाला खत पाणी घालत राहून कधीतरी त्याला अमृताची फळे येतील, असा अंधविश्वास ठेवून पुढे चालत रहाण्याचे धोरण त्या काळाच्या मवाळ नेत्यांनी स्वीकारले होते; पण काळाची आवश्यकता होती की, ब्रिटीश सरकारच्या थेट मुळावर घाव घालणे आवश्यक आहे आणि अखेर तो दिवस आला…

२. सुरत येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनातून युग परिवर्तनाचा आरंभ !

२७ डिसेंबर १९०७ या दिवशी सुरत (गुजरात) येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले होते आणि अचानक एक तेजस्वी पुरुष सारा विरोध झुगारून देऊन निर्भयपणे व्यासपिठावर चढला अन् ‘मला माझे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे’, अशा निश्चय स्वरात त्यांनी सार्‍या सभेला अवाक् करून सोडले अन् त्याच क्षणी मवाळ युग संपून जहाल युगाचा प्रारंभ झाला. आणि हो, त्या महापुरुषाचे नाव होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ! ब्रिटिशांविरुद्ध थेटपणे जो लढा चालू झाला त्याचे एकमेव कारण होते ते म्हणजे, लोकमान्य टिळक यांनी घडवून आणलेले युग परिवर्तन !

३. लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यासाठी अंगीकारलेली चतु:सूत्री

वर्ष १८५७ च्या लढ्यानंतर झाशीच्या राणीच्या चितेतील विझत आलेली आग आणि फासावर थिजलेली तात्या टोपे यांच्या डोळ्यांतील आशा यांना टिळक यांनी पुन्हा जिवंत केले. केवळ जिवंतच नव्हे, तर त्यांनी ज्वालांच्या वादळात त्याचे रूपांतर केले. ‘स्वदेशीचा अंगीकार, विदेशी वस्तूंचा बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य’, या चतु:सूत्रीचे ते आद्यजनक ठरले होते. मोहनदास गांधी यांचा भारतीय राजकारणात प्रवेश होण्याआधीच राष्ट्रीय सभेत लोकमान्य टिळक यांच्यासारखे जहाल नेतृत्व होऊन गेले होते. ‘गांधी यांच्यासारख्या पुढार्‍यांनी टिळक यांनी सांगितलेल्या चतु:सूत्रीनुसार कार्य चालू ठेवले असते, तर कदाचित भारतीय जनतेला स्वातंत्र्याचा सूर्य थोडा आधीच पहाता आला असता’, असे माझे तरी मत आहे; पण टिळक हेच खर्‍या अर्थाने स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक होते, यात शंका नाही.

४. सशस्त्र क्रांतीमागील मूळ प्रेरणा लोकमान्य टिळकच !

कु. प्रार्थना पाठक

लोकमान्य टिळक यांनी अनेक देशभक्तांना क्रांतीकार्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या अंतर्मुख करणार्‍या केवळ एका वाक्यानेच चापेकर बंधूंना जुलूमी रँडचा वध करण्याची प्रेरणा मिळाली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर तर टिळक यांचे पट्टशिष्यच होते. ‘लोकमान्य टिळक हे तलवारीची मूठ असून तरुणांनी त्याचे धारदार पाते व्हावयास हवे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर सांगायचे.

हरिभाऊ त्र्यंबक देसाई म्हणतात,

तिलको लोकमान्यः सः वीरः सावरकरः तथा ।
सुभाषचन्द्रो नेताजी: त्र्ययेते राष्ट्रगौरवा: ।।

अर्थ : लोकमान्य टिळक, वीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस ही त्रयी, म्हणजे राष्ट्राचा गौरव होय.

यावरून एक वाक्य सुचले, ‘लोकमान्य टिळक हे बंदूक होते. त्या बंदुकीचा उडणारा खटका हे सावरकर, तर त्यातून ब्रिटिशांच्या छाताडात घुसणारी गोळी, म्हणजे नेताजी सुभाषचंद्र होय !’ यावरून आपल्या लक्षात येते की, सशस्त्र क्रांतीमागील मूळ प्रेरणा ही लोकमान्य टिळकच होते.

५. क्रांतीकार्याचे बीजारोपण

लोकमान्य टिळक यांनी क्रांतीकार्याचे बीजारोपण केले आणि पुढे त्याचा वटवृक्ष होऊन भारतमातेला स्वातंत्र्य मिळाले. कार्यासाठी अनेकांना अनेक जन्म कमी पडतील, असे उदात्त कार्य लोकमान्य टिळक एका आयुष्यात करून गेले. त्यांची देशभक्ती काही अंशी तरी आपल्यात आली आणि त्यानुसार कृती झाली, तरच त्यांच्यासाठीचे ते खरे अभिवादन ठरेल. शेवटी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या चरणी एवढेच शब्द अर्पण…

मुक्या मनाने किती उधळावे । शब्दांचे बुडबुडे ।।
तुझे पवाडे गातील पुढती । तोफांचे चौघडे ।।

– कु. प्रार्थना महेश पाठक (वय १३ वर्षे), सातारा रस्ता, पुणे. (२५.७.२०२५)