नांदणीतील (जिल्हा कोल्हापूर) ‘महादेवी’ हत्तीणीसाठी सहस्रो नागरिकांचा मूकमोर्चा !

गोवंशियांच्या वाढत्या हत्या पहाता त्या रोखण्यासाठी सहस्रो नागरिक कधी संघटित होणार ?

‘हत्ती बचाव कृती समिती’च्या वतीने करण्यात आलेले आंदोलन

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) – शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील प.पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान यांच्याकडे दीर्घकाळापासून हत्ती आहे. सध्या त्यांच्याकडे ‘महादेवी’ नावाची हत्तीण आहे. ही हत्तीण गुजरात राज्याकडे सोपवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. येथील मठाचा हत्ती हा श्रद्धास्थान असून त्याचे मठाशी अतूट नाते असल्याने कोणत्याही परिस्थितीत ‘महादेवी’ हत्तीण आम्ही नेऊ देणार नाही, यासाठी सहस्रो नागरिकांनी एकत्र येत ‘हत्ती बचाव कृती समिती’च्या वतीने २५ जुलैला मूकमोर्चा काढला. कोणत्याही परिस्थितीत हत्ती नेऊ देणार नाही, अशी भूमिका नांदणीकरांनी घेतली आहे.

‘एका बाजूला प्राण्यांचा गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असतांना प्राण्यांच्या अधिकारालाच प्राधान्य द्यावे लागेल’, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले होते. या पार्श्वभूमीवर हत्तीला नेण्यासाठी पथक येणार असल्याचे समजताच सहस्रो नागरिक जमा झाले आणि त्यांनी कालपासूनच विरोध करण्यास प्रारंभ केला आहे. या मोर्चात शिरोळ मतदारसंघातील आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, सावकार मादनाईक यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. नांदणी येथील नागरिकांनी याला उत्स्फूर्त पाठिंबा देत गाव बंद ठेवले होते.

हत्ती न घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे ! – स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान, मठ, नांदणी

चंदगड, खानापूर यांसह अन्य भागांत शेतकर्‍यांच्या पिकांची जंगली हत्ती मोठी हानी करत आहेत. त्यांना पकडण्याऐवजी १ सहस्र २०० वर्षांची परंपरा असलेल्या नांदणी मठाचा हत्ती त्यांना का हवा आहे ? वेगवेगळी कारणे देऊन आमचा हत्ती गुजरात येथे पाठवण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. या संदर्भात आम्ही सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

काय आहे प्रकरण ?

या प्रकरणाचा प्रारंभ ‘पेटा’ या प्राण्यांच्या अधिकारासाठी लढणार्‍या कथित संस्थेच्या आरोपानंतर झाली. त्यांनी मठावर वन विभागाची अनुमती न घेता ‘महादेवी’ला तेलंगाणातील एका मिरवणुकीत सहभागी केल्याचा आरोप केला होता. या आरोपांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने एक उच्चाधिकार समिती नेमली होती. या समितीने नोव्हेंबर २०२३ मध्ये हत्तीणीची पडताळणी करून अहवाल सादर केला होता. त्याआधारे न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायालयाने या हत्तीणीला गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील ‘राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्ट’ला पाठवण्यास अनुमती दिली आहे. मठाने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून हत्तीणीचे संगोपन केल्याचा दावा केला आहे.