१. प्लास्टिकच्या कचरा निर्मितीत स्वत:चा वाटा आहे का ? याचे प्रत्येकाने परीक्षण करावे !
‘वर्ष २०२४-२५ मध्ये जगभरात अंदाजे ४ अब्ज टन प्लास्टिकचा कचरा निर्माण झाला’, असे संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे. ‘त्यात आपलाही वाटा आहे का ?’, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारून आत्मपरीक्षण करावे.
२. प्रगत देशांमधील प्लास्टिकच्या कचर्याच्या तुलनेत भारतातील कचर्याचे प्रमाण न्यून असले, तरी ते वेळीच आणखी न्यून करणे आवश्यक !
प्लास्टिकच्या कचरा निर्मितीत भारताचे प्रमाण अमेरिकेच्या एक दशांश असेल आणि युरोपच्या एक पंचमांश असेल; कारण अजून आपण त्यांच्याइतके प्लास्टिक आवेष्टित अन्न किंवा वस्तू वापरत नाही; पण तरीही आपल्याकडील प्लास्टिकच्या कचर्याच्या पुनर्चक्रीकरणाच्या अपुर्या सोयी बघता आपण कचरा आपणच अल्प केलेला बरा !
३. निसर्गातील सफाई कामगार, म्हणजे सूक्ष्मजीव हेही प्लास्टिकचे विघटन करत असणे !
प्लास्टिक कचर्याच्या विघटनावर जगभरात संशोधन चालू आहे. संशोधकांच्या लक्षात आले की, काही अळ्या, किडे प्लास्टिकचे कण खाऊन ते विघटीत करू लागले आहेत. बॅसिलस, हॅलोमोनास, आर्थ्राेबॅक्टर इत्यादी बुरशीजन्य गटातील काही सूक्ष्मजीव समुद्राचे पाणी, प्लास्टिकचा भराव टाकलेले खड्डे, डंपिंग ग्राऊंड (कचरा टाकायची जागा), उकीरडे, खारफुटीची माती, गटार यांमध्ये प्लास्टिकचा कचरा खातांना आढळले आहेत. निसर्गातील सफाई कामगार, म्हणजे सूक्ष्मजीव हे प्लास्टिकचे विघटन करायला सरसावले आहेत.
४. प्लास्टिकचे प्रदूषण टाळणे, हीच काळाची हाक !
आपण काय करत आहोत ? प्लास्टिकचे प्रदूषण टाळणे, हीच काळाची हाक आहे. प्लास्टिक हा आपले जीवन सुकर करणारा दूत आहे, हे नक्कीच ! वैद्यकीय सोयी, प्रवासी गाड्या आणि घरगुती वस्तू यांतील प्लास्टिक हे आपल्यासाठी वरदान आहे. त्यामुळे प्लास्टिकला दूषणे द्यायला नको; पण प्रदूषणही करायला नको. प्लास्टिक वारंवार कचर्यात जाणे ही खरी समस्या आहे.
– शुभदा चौकर (साभार : मासिक ‘ग्राहक तितुका मेळवावा’)
प्लास्टिक वारंवार कचर्यात जाऊ नये, यासाठी करावयाच्या उपाययोजना !
आपण सुजाण नागरिक म्हणून काय काय करू शकतो ? याकडे लक्ष द्यायला हवे.
१. एकदा वापरून फेकायच्या प्लास्टिकच्या बाटल्या, डबे, पिशव्या वापरणे टाळूया. प्लास्टिकच्या किंवा मेणकागदाच्या पेल्याऐवजी काचेचा किंवा स्टीलचा पेला वापरूया. एखाद्या कार्यक्रमात आपला स्वतःचा पेला घेऊन जाता येईल. आपण हे आपल्या घरगुती समारंभातही कटाक्षाने करू शकतो. पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा ‘क्रेट’ (खोका) आणणे टाळू शकतो.
२. घरी पाहुणे येतात, तेव्हा ‘वापरा-फेका’ प्रकारच्या ताटल्या, वाट्या, पेले वापरण्यापेक्षा घरातील किंवा शेजारच्या मैत्रिणींनी एकमेकींची भांडी तात्पुरती वापरायला घेणे, हा पर्यायही चांगला आहे.
३. खरेदीसाठी जातांना नेहमी कापडी पिशवी सोबत ठेवूया, तसे आवाहन आपण अधिकाधिक ग्राहक आणि विक्रेते यांना करूया.
४. सौंदर्यप्रसाधनांमध्ये ‘मायक्रोबीड्स’ (त्वचेच्या मेलेल्या पेशी काढण्यासाठी वापरलेले प्लास्टिकचे कण) असतात. अशा सौंदर्यप्रसाधनांचा वापर शक्यतो टाळूया.
५. प्लास्टिक आवेष्टित अन्नपदार्थ अल्प प्रमाणात खरेदी करूया.
६. आपल्या घरी निर्माण होणारा प्लास्टिकचा कचरा सुयोग्य वेचकांना (केवळ प्लास्टिकचा कचरा उचलून घेऊन जाणार्यांना) देऊया. आपले कार्यालय, शाळा आणि महाविद्यालये यांनाही अशा वेचकांशी जोडून देता येईल.
७. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि महापालिका प्लास्टिकच्या कचर्याच्या विल्हेवाटीसाठी योग्य प्रणाली वापरतील, यासाठी आग्रही राहूया.
८. प्रदूषण करणार्या प्लास्टिकवर कर लावणे आणि प्लास्टिक उत्पादक आस्थापनांवर त्यांच्या उत्पादनांच्या विल्हेवाटीचे दायित्व असणे, अशा गोष्टी धोरणांत यायला हव्यात. यासाठी आपण काय करू शकतो ?, याचा विचार करूया.
९. कागदी उत्पादने, मातीची भांडी, केळीच्या पानांचा वापर, पळस किंवा अन्य वाळलेल्या पानांच्या पत्रावळ्या आणि बांबूच्या वस्तू अशा नैसर्गिकरित्या विघटित होणार्या नवीन पर्यायांना प्रोत्साहन द्यायला हवे.
अशा छोट्या-छोट्या सवयी पालटून आपण या समस्येवर मात करू शकतो आणि पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. पृथ्वीचे निसर्गातील सफाई कामगार, म्हणजे सूक्ष्मजीव तेही आता त्यांची नैसर्गिक सवय पालटून प्लास्टिकचे विघटन करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. आपण तर बुद्धीजीवी मानव आहोत !
– शुभदा चौकर (साभार : मासिक ‘ग्राहक तितुका मेळवावा’)

उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !