मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संत शिरोमणी नामदेव महाराज, परिवार आणि संत जनाबाई महाराज यांचा ६७५ वा संजीवन समाधी सोहळा !

पंढरपूर – समाजातील शेवटच्या व्यक्तीला समाजाच्या मुख्य धारेत आणणार्या आणि भागवत धर्माचा विचार आपल्या लेखणी अन् वाणीने देशभर पोचवणार्या संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर येथील मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात येईल. त्यांचे विचार हे त्यांचे खरे स्मारक असून हे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंढरपूर येथे आयोजित श्री संत शिरोमणी नामदेव महाराज, परिवार आणि संत जनाबाई यांच्या ‘षष्ठ शतकोत्तर संजीवन समाधी सोहळा’ कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘श्री नामदेव क्षत्रिय एकसंघ’चे राष्ट्रीय अध्यक्ष महेश ढवळे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, आचार्य तुषार भोसले, ह.भ.प. केशव महाराज नामदास, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘भारताच्या सर्व दिशांना जोडण्याचे आणि खर्या अर्थाने भागवत धर्मातील विचार वैश्विक करण्याचे कार्य त्यांनी केले. आपला पारंपरिक व्यवसाय जरी त्यांनी केला नसला तरी सामाजिक समरसतेचे वस्त्र विणण्याचे, संपूर्ण व्यवस्था पालटण्याचे आणि समाजाला एकतेचे मूल्य देण्याचे कार्य नामदेव महाराजांनी केले. संत कबीर, दादू, गरीबदास यांनी विचारांची प्रेरणा संत नामदेवांकडून घेतली. आपल्या संतभूमीत अभंगांच्या माध्यमातून संतांचा हा विचार आपल्यापर्यंत पोचला आहे. संत नामदेव महाराजांच्या ६७५ व्या संजीवन समाधीच्या निमित्ताने नामदेव पायरीचे दर्शन घेणे आणि तेथील ऊर्जा प्राप्त करून घेणे हा भाग्याचा दिवस असून या पायरीच्या दर्शनाने प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते. नामदेव महाराजांच्या अभंगात ‘पायरिचे चिरे’ असा उल्लेख आहे, त्यानी याच भावनेने आपले कार्य केले.’’
क्षणचित्रे

१. प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिलेला शुभेच्छा संदेश वाचून दाखवण्यात आला.
२. मुख्यमंत्र्यांनी श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या परिवारातील त्यांचे वंशज ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास आणि अन्य संतांचे पदपूजन केले.
३. श्री संत नामदेव महाराज यांच्या कार्याची माहिती आणि महिमा लोकांपर्यंत पोचण्यासाठी सिद्ध केलेल्या विशेष संकेतस्थळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
४. याप्रसंगी चांदीच्या विशेष नाण्याचे विमोचन करण्यात आले.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !