Jagdeep Dhankar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे त्यागपत्र

उपराष्ट्रपती जगदीप धनखड

नवी देहली – देशाचे १४ वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलैला रात्री त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केलेल्या त्यागपत्रात धनखड यांनी ‘आरोग्याला प्राधान्य देऊन आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करून मी भारताच्या उपराष्ट्रपतीपदाचे तत्काळ त्यागपत्र देत आहे’, असे म्हटले आहे.

७४ वर्षीय धनखड यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२७ पर्यंत होता. त्यांनी १० जुलै या दिवशी एका कार्यक्रमात म्हटले होते की, ‘जर देवाने आशीर्वाद दिला, तर मी ऑगस्ट २०२७ मध्ये निवृत्त होईन.’

सध्या चालू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात धनखड यांनी २१ जुलैला राज्यसभेच्या कामकाजात भाग घेतला. सभापती म्हणून त्यांनी भाषणही केले होते. त्याच रात्री त्यांनी एकाएकी पदाचे त्यागपत्र दिले. अधिवेशनाच्या कालावधीत त्यागपत्र देणारे ते पहिले उपराष्ट्रपती ठरले आहेत.