कामामुळे येणार्‍या थकव्यासाठी (‘बर्नाऊट’साठी) व्यायामाची आवश्यकता का आहे ?

‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्‍या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन, ‘अर्गोनॉमिक्स’चे (Ergonomics) तत्त्व आणि आजारानुसार योग्य व्यायाम यांची माहिती सादर करणार आहोत. व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल. या लेखात आपण ‘कामामुळे येणार्‍या थकव्यामध्ये (बर्नआऊट) व्यायाम का आवश्यक आहे ?’, यांविषयी जाणून घेऊया.

(भाग १)

१. दीर्घकाळ तणावाखाली काम केल्यामुळे (बर्नआऊट) येणारा शारीरिक, मानसिक आणि भावनिक थकवा विश्रांती घेऊनही न्यून न होणे

‘आपण काम करत असो किंवा सेवा, प्रत्येकानेच अनुभवले असेल की, कधी सलग बैठका, तर कधी तातडीच्या समयमर्यादा, कधी भरमसाठ संगणकीय पत्रे (ई-मेल्स), तर कधी कठीण ध्येय गाठण्याचे प्रयत्न (टार्गेट्स) असतात ! अशा वेळी मनावर येणारा ताण दुर्लक्षित करून आपण अधिक कालावधीसाठी काम करत रहातो. परिणामस्वरूप आपण पुष्कळ थकतो आणि अधिक काही करण्याची इच्छाच रहात नाही. विशेष म्हणजे विश्रांती घेऊनही यात सुधारणा होत नाही. अशा प्रकारे दीर्घकाळ तणावाखाली काम केल्यामुळे येणारा शारीरिक, मानसिक आणि भावनिक थकवा; जो विश्रांती घेऊनही लगेच न्यून होत नाही, याला ‘बर्नआऊट’ म्हणतात.

२. ‘बर्नआऊट’ची लक्षणे

‘ऊर्जा न्यून होणे, कामात रस न उरणे आणि कार्यक्षमता घटणे’ ही ‘बर्नआऊट’ची मुख्य लक्षणे असतात. अशा वेळी विश्रांती घेतली, तरीही थकवा, उदासीनता आणि निरुत्साह तसाच टिकून रहातो.

३. ‘बर्नआऊट’ची कारणे

बर्नआऊट केवळ काम अधिक केल्यामुळे येत नसून ‘शारीरिक अतिश्रम करणे आणि मनावर असलेला समयमर्यादेचा सततचा तणाव साठत जाणे’ यांमुळे येतो. शरीर आणि मन एकमेकांवर अवलंबून असतात. एक थकले की, दुसरेही थकते आणि याचा एकूण परिणाम हा ‘बर्नआऊट’च्या रूपात प्रकट होतो.

४. ‘बर्नआऊट’विषयी संशोधन काय सांगते ?

अ. वर्ष २०२० मध्ये ‘बी.एम्.सी. पब्लिक हेल्थ’ (BMC Public Health) या ‘जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार ‘जे लोक प्रतिदिन ६ घंट्यापेक्षा अधिक वेळ बसून रहातात, त्यांच्यात मानसिक आणि भावनिक थकवा (Burnout) यांचे प्रमाण अधिक आढळते. अल्प शारीरिक हालचालींमुळे शरिरात तणाव संप्रेरकाची (‘कॉर्टिसॉल’ची) पातळी नियंत्रित रहात नाही. त्यामुळे तणाव सहन करण्याची क्षमता न्यून होते.’

आ. वर्ष २०२० मध्ये ‘ऑक्युपेशनल हेल्थ’ (Occupational Health) या ‘जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार ‘थोडीशी शारीरिक हालचाल करणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये कामामुळे त्यांना येणारा थकवा २५ टक्के न्यून झाला.’

इ. वर्ष २०१८ मध्ये ‘ऑक्युपेशनल मेडिसिन’ (Occupational Medicine) या ‘जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार ‘जे लोक आठवड्यातून किमान ३ वेळा मध्यम किंवा तीव्रतेचा व्यायाम करतात, त्यांच्यात ‘बर्नआऊट’ची लक्षणे लक्षणीयरित्या अल्प असतात. व्यायामामुळे डोपामिन, सेरोटोनिन आणि एंडॉर्फिन या रसायनांची निर्मिती वाढते, जी व्यक्तीची विशिष्ट वेळेतील मानसिक किंवा भावनिक स्थिती (मूड) सुधारण्यास आणि मानसिक ताण न्यून करण्यास साहाय्य करते.’

५. ‘बर्नआऊट’चा धोका कुणाला ?

घंटोन्घंटो बसणे आणि मानसिक ताण घेणे, हे दोन्ही ‘बर्नआऊट’साठी अत्यंत पोषक ठरते. दुर्दैवाने बहुतेक लोक यांवर एकच उपाय काढतात आणि तो म्हणजे चहा किंवा कॉफी घेत अधिक वेळ बसून काम करत रहाणे ! अशा ‘बर्नआऊट’चा सर्वाधिक धोका पुढील लोकांना आहे.

अ. दिवसभर संगणकासमोर किंवा एकाच स्थितीत बसून काम अथवा नोकरी करणारे

आ. अनेक भूमिका निभावणारे उद्योजक

इ. घर आणि काम सांभाळणारे पालक

ई. सतत धावपळ करणारे व्यस्त लोक.’ (२५.६.२०२५)

– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा.

(क्रमशः)