शुभम् भवतु । ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची ऐतिहासिक अंतराळ मोहीम !!

१५ जुलै या दिवशी भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अंतराळ मोहिमेतून अमेरिकेत परतले. त्या निमित्ताने…

शुभांशू शुक्ला अंतराळ मोहिमेतून परतले तो क्षण

१५ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘एका नव्या अंतराळ युगाचा भव्य आरंभ, ‘ॲक्सिओम-४’ मोहीम : वैज्ञानिक आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व, शुभांशू शुक्ला : एक प्रेरणादायी प्रवास आणि अथक परिश्रमांचे प्रतीक’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/935182.html

अंतराळातून परतणारा तेजस्वी तारा आणि भारताचे उज्ज्वल भविष्य !

भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे केवळ एक अंतराळवीर नाहीत, तर ते भारतीय जिद्द, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी कुटुंब आहे), अशी दृढ धारणा असणारे भारतीय मन यांचे जागतिक प्रतीक आहेत. राकेश शर्मा यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी पुन्हा एकदा भारताला जागतिक पातळीवर अभिमानाने उभे केले आहे. त्यांची ही मोहीम भविष्यातील अनेक अंतराळ मोहिमांसाठी एक मार्गदर्शक ठरेल. भारताच्या अंतराळ युगाच्या दुसर्‍या पर्वाचा भक्कम अन् यशस्वी प्रारंभ झाला आहे.

शुभांशू शुक्ला यांचा हा प्रवास हेच दर्शवतो की, भारत आता केवळ अंतराळात संशोधन करणारा किंवा उपग्रह प्रक्षेपित करणारा देश नाही, तर तो मानवी अंतराळ प्रवासात सक्रीयपणे सहभागी होणारा अन् भविष्यातील अंतराळ शोधांचे नेतृत्व करणारा देश बनला आहे. त्यांचे हे यश भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचे आणि जागतिक स्तरावरील वाढत्या प्रभावाचे एक तेजस्वी उदाहरण आहे, जो येणार्‍या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत राहील. भारताचे अंतराळ क्षेत्रातील भविष्य आता अधिक उज्ज्वल आणि आशादायक दिसत आहे अन् शुभांशू शुक्लांसारखे अंतराळवीर या प्रवासातील महत्त्वपूर्ण तारे आहेत, जे भारताला नव्या उंचीवर घेऊन जात आहेत.

– प्रा. बाबासाहेब धोंडीराम सुतार

प्रा. बाबासाहेब सुतार

५.  ४१ वर्षांनंतरचा विक्रम

राकेश शर्मा यांच्यानंतर तब्बल ४१ वर्षांनी अंतराळात जाणारे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे दुसरे भारतीय आहेत. त्यांच्या या प्रवासाने भारताच्या अंतराळ इतिहासात एक मोठे अंतर भरून काढले.

६. ‘गगनयान’साठी मोलाचा अनुभव

जरी ही एक खासगी मोहीम असली, तरी शुभांशू शुक्ला यांना ‘आय.एस्.एस्.’वर मिळालेला अनुभव भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ मानवी अंतराळ मोहिमेसाठी अत्यंत मोलाचा ठरेल. त्यांचे निरीक्षण आणि अनुभव भविष्यातील भारतीय अंतराळविरांचे प्रशिक्षण आणि मोहिमेचे नियोजन यांसाठी उपयुक्त ठरतील.

७. भारतीय खाद्यपदार्थांची चव

शुभांशू शुक्ला यांनी आपल्यासमवेत गाजर हलवा, मूग डाळ हलवा आणि आमरस असे काही भारतीय खाद्यपदार्थ अंतराळात नेले होते. त्यांनी हे पदार्थ आपल्या आंतरराष्ट्रीय सहकार्‍यांसह वाटून खाल्ले आणि त्यांना भारतीय खाद्यसंस्कृतीची चव चाखायला मिळाली !

८. पुनर्वसन कार्यक्रम

अंतराळातून परतल्यावर त्यांना अनुमाने १० दिवसांच्या पुनर्वसन कार्यक्रमातून जावे लागेल, जेणेकरून त्यांचे शरीर पुन्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेऊ शकेल. अंतराळविरांसाठी हा एक सामान्य; पण महत्त्वाचा असा जिकिरीचा टप्पा असतो.

९. एका नव्या क्षितिजाकडे

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या यशस्वी मोहिमेमुळे भारताचा अंतराळ दृष्टीकोन केवळ उपग्रह प्रक्षेपण आणि ‘चांद्र-मंगळ’ मोहिमांपुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यात एक आमूलाग्र पालट घडला आहे. आता भारताने मानवयुक्त मोहिमांमध्ये सक्रीय सहभाग घेण्यासह ‘आय.एस्.एस्.’सारख्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांसमवेतचे सहकार्य वाढवण्यावर भर दिला आहे. भविष्यात चंद्रावर मानववस्ती स्थापन करण्याच्या आणि मंगळ मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याच्या भारताच्या आकांक्षांना या यशामुळे नवे बळ मिळाले आहे.

शुक्ला यांच्या ‘आय.एस्.एस्.’वरील अनुभवामुळे ‘इस्रो’ची महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ मोहीम नव्या उंचीवर पोचेल. या मोहिमेतील भारतीय अंतराळविरांना मिळणारे प्रशिक्षण आणि भविष्यातील मोहिमा यांचे नियोजन करतांना शुभांशू शुक्ला यांचा अनुभव अत्यंत मोलाचा ठरेल. त्यांनी अंतराळात केलेल्या प्रयोगांची माहिती आणि त्यांचे निरीक्षण ‘गगनयान’ मोहिमेतील अंतराळविरांच्या आरोग्याची काळजी घेण्ो, त्यांचे प्रशिक्षण अन् अंतराळयानाचे डिझाईन यांसाठी महत्त्वपूर्ण ठरतील, तसेच भारत सरकार लवकरच भारतीय अंतराळविरांसाठी अत्याधुनिक स्वदेशी अंतराळ प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा विचार करत आहे. यामुळे परदेशी प्रशिक्षणावर अवलंबून रहाण्याची आवश्यकता न्यून होईल आणि भारताची मानवी अंतराळ मोहिमांमधील आत्मनिर्भरता लक्षणीयरित्या वाढेल. याखेरीज खासगी अंतराळ उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठीही सरकार अनेक पावले उचलत आहे, ज्यामुळे अंतराळ क्षेत्रात नवोपक्रम आणि रोजगाराच्या संधी वाढतील.

१०. नव्या स्वप्नांचा प्रारंभ

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची कामगिरी ही केवळ एक वैयक्तिक यशोगाथा नाही, ती संपूर्ण भारताची नवीन स्वप्ने आणि सामर्थ्य यांची साक्ष आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, कठोर प्रशिक्षण आणि दुर्दम्य जिद्द यांच्या जोरावर त्यांनी हे सिद्ध केले की, भौगोलिक किंवा आर्थिक मर्यादा काहीही असल्या, तरी ‘कोणत्याही देशाचा एक सुपुत्र अंतराळाला गवसणी घालू शकतो.’ त्यांनी जगाला दाखवून दिले की, दृढनिश्चय आणि अथक परिश्रम यांनी कोणतीही अडचण पार करता येते अन् कोणत्याही उंचीवर पोचता येते. त्यांचे हे यश हेच सांगते की, भारतीय तरुणांमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि त्यांना योग्य संधी मिळाल्यास ते जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करू शकतात.

त्यांच्या या यशामुळे देशातील विद्यार्थ्यांमध्ये अवकाश संशोधन, वैमानिक विज्ञान आणि नवविज्ञान यांचे आकर्षण प्रचंड प्रमाणात वाढीला लागेल. अनेक तरुण आता केवळ अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणच नव्हे, तर खगोलशास्त्र, अंतराळ भौतिकशास्त्र आणि ‘एरोस्पेस’ (अंतराळ) अभियांत्रिकी यांसारख्या क्षेत्रांमध्येही स्वतःचे भविष्य शोधू लागले आहेत. प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि संशोधन संस्था यांसाठी शुभांशू हे एक प्रेरणास्थान बनतील.

११. पुनरागमन आणि राष्ट्रीय उत्सव

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या पृथ्वीवरील सुरक्षित पुनरागमनानंतर केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील भारतीय समुदाय आणि अंतराळप्रेमी यांच्यासाठी मोठा आनंदोत्सव असेल. त्यांचे हे पुनरागमन भारताच्या अंतराळ क्षेत्रातील वाढता आत्मविश्वास आणि जागतिक स्तरावरील महत्त्व यांचे प्रतीक बनेल. भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, ‘इस्रो’, देशाचे पंतप्रधान हे त्यांचे राष्ट्रीय सन्मानाने स्वागत करतीलच; पण देशातील प्रमुख वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे त्यांना ‘भारताचा अंतराळशूर’, ‘आकाशातील भारताचा तेजस्वी तारा’ आणि ‘आधुनिक भारताचा राकेश शर्मा’ अशा अनेक नावांनी गौरवतील. त्यांची अंतराळातील छायाचित्रे आणि अंतराळातील त्यांची कामगिरी सर्वत्र चर्चेचा विषय बनलेली असेल.

शुभांशू यांच्या आगमनाचा एक उत्सव संपूर्ण देशात साजरा व्हायला हवा, विशेषतः शाळा-महाविद्यालयांमध्ये ! त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शन आयोजित करावीत. अनेक विद्यार्थी अंतराळवीर बनण्याचे किंवा विज्ञान क्षेत्रात ‘करिअर’ करण्याचे स्वप्न पहाण्यास प्रारंभ करत असतील, तर त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्या या इच्छेचा सन्मान करून त्यांना अधिक मार्गदर्शन मिळेल, असे पहावे. या ऐतिहासिक घटनेमुळे देशभरात वैज्ञानिक आणि तांत्रिक शिक्षणाविषयी एक सकारात्मक अन् उत्साहवर्धक वातावरण निर्माण होईल. याचा लाभ सर्वांनी घेऊया. असे झाले, तर शुभांशू यांची ही अंतराळ साधना खर्‍या अर्थाने यशस्वी झाली, असे म्हणता येईल.

भारतीय अंतराळयुगाच्या या नवप्रवासाला शुभेच्छा ! शुभम् भवतु !!

– प्रा. बाबासाहेब धोंडीराम सुतार, साहाय्यक प्राध्यापक, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी. (१३.७.२०२५)

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ प्रवासातील प्रेरणादायी गोष्टी

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (‘आय.एस्.एस्.’वरील) प्रवास केवळ वैज्ञानिक आणि ऐतिहासिकच नाही, तर त्यात काही रंजक अन् प्रेरणादायी गोष्टीही आहेत.

अ. भारताचे पहिले ‘खासगी’ अंतराळवीर : शुभांशू शुक्ला हे खासगी अंतराळ कंपनी ‘ॲक्सिओम स्पेस’च्या मोहिमेतून ‘आय.एस्.एस्.’वर पोचणारे पहिले भारतीय ठरले आहेत. यापूर्वी राकेश शर्मा हे सोव्हिएत युनियनच्या मोहिमेतून अंतराळात गेले होते. हे खासगी अंतराळ प्रवासाचे एक नवीन पर्व मानता येईल.

डावीकडून शुभांशू शुक्ला आणि नरेंद्र मोदी

आ. पंतप्रधानांशी थेट संवाद : अंतराळातून ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ‘व्हिडिओ कॉल’द्वारे संवाद साधला. पंतप्रधानांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आणि ‘तुमच्या नावातही शुभ आहे अन् तुमची यात्रा नव्या युगाचा शुभारंभ आहे’, असे म्हटले. शुभांशू शुक्ला यांनीही अंतराळातून भारत किती भव्य दिसतो आणि तेथून कोणतीही सीमा दिसत नाही, हे सांगितले. हा क्षण भारतासाठी अत्यंत अभिमानाचा होता!

इ. विद्यार्थ्यांशी थेट संवाद आणि प्रेरणा : शुभांशू शुक्ला यांनी ‘आय.एस्.एस्.’वरून भारतातील शाळकरी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना अंतराळातील जीवन, प्रयोग आणि आव्हाने यांविषयी सांगितले. ‘तुम्ही मोठे झाल्यावर अनेक जण अंतराळवीर व्हाल. कदाचित् चंद्रावरही जाल’, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान आणि अंतराळ संशोधन यांसाठी मोठी स्वप्ने पहाण्यास प्रोत्साहित केले.

शुभांशू यांनी भारतासाठी ७ महत्त्वाचे वैज्ञानिक प्रयोग केले. ‘इस्रो’ (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) आणि भारतातील विविध संशोधन संस्था यांच्या सहकार्याने हे प्रयोग डिझाईन करण्यात आले होते. हे प्रयोग भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमा आणि पृथ्वीवरील वैद्यकीय उपचार यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

– प्रा. बाबासाहेब सुतार

आंतरराष्ट्रीय चमूचा भाग

डावीकडून शुभांशू शुक्ला, पेगी व्हीटसन, टिबोर कापू, स्लावोसझ उझनान्स्की-विस्निव्स्की

शुभांशू यांच्या ‘ॲक्सिओम-४’ चमूमध्ये अमेरिका, पोलंड आणि हंगेरी या देशांचे अंतराळवीर होते. ही मोहीम खर्‍या अर्थाने आंतरराष्ट्रीय सहकार्याचे एक उत्तम उदाहरण होती, जिथे विविध देशांचे वैज्ञानिक एकत्र काम करत होते.

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी केलेले ७ प्रयोग

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी केलेले ७ प्रयोग खालीलप्रमाणे आहेत.

अ. मांसपेशींच्या झीजेचा अभ्यास

प्रयोगशील शुभांशू शुक्ला

अंतराळातील सूक्ष्म-गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळविरांच्या स्नायूंची झीज होते. या प्रयोगात स्नायूंच्या हानीची कारणे आणि त्यावर उपचार करण्याच्या पद्धती यांचा अभ्यास करण्यात आला. याचा उपयोग मंगळ मोहिमा आणि पृथ्वीवरील स्नायूंच्या संबंधित रोगांवर उपचार शोधणे यांसाठी होऊ शकतो.

आ. पिकांच्या बियाण्यांचा विकास

या प्रयोगात ६ प्रकारच्या पिकांच्या बिया अंतराळात नेण्यात आल्या. अंतराळातील वातावरणाचा त्यांच्या वाढीवर आणि जनुकीय पालटांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात आला. भविष्यात चंद्र किंवा मंगळ यांवर शेती करण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे ठरेल.

इ. टार्डिग्रेड्सचा अभ्यास

टार्डिग्रेड्सचा अभ्यास

‘वॉटर बिअर्स’ म्हणून ओळखले जाणारे ‘टार्डिग्रेड्स’ हे अत्यंत लहान जीव आहेत, जे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही जगू शकतात. या प्रयोगात अंतराळातील वातावरणात त्यांच्या जगण्याची यंत्रणा, पुनरुत्पादन आणि जनुकीय पालट यांचा अभ्यास करण्यात आला. हे भविष्यातील जैवतंत्रज्ञान आणि दीर्घकाळ चालणार्‍या अंतराळ प्रवासासाठी उपयुक्त ठरू शकते.

ई. संगणक पडद्याच्या वापराचा मानवी मेंदूवर परिणाम

अंतराळात असतांना संगणक पडद्यांचा वापर केल्याने अंतराळविरांच्या डोळ्यांच्या हालचाली, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि हातांचे समन्वय यांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास या प्रयोगात करण्यात आला. भविष्यातील अंतराळयानांचे ‘इंटरफेस डिझाईन’ (संवाद साधन) करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.

उ. बियांच्या अंकुरणाचा अभ्यास

मेथीच्या शेतीचा अभ्यास

या प्रयोगात मेथी आणि मूग यांच्या बिया अंतराळात उगवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. अंतराळात उगवलेल्या बियांचे जनुकीय पालट, सूक्ष्मजिवांचे प्रमाण आणि पौष्टिक मूल्ये यांवर होणारा परिणाम पडताळण्यात आला. हे अंतराळातील दीर्घकालीन मोहिमांमध्ये ताजे अन्न मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल. या प्रयोगाच्या कालावधीत ते अंतराळातील एक प्रकारचे ‘शेतकरी’च बनले होते.

ऊ. सूक्ष्मशैवालांचा अभ्यास

या प्रयोगात सूक्ष्मशैवालांच्या ३ प्रकारांच्या वाढीचा आणि चयापचयाचा अभ्यास करण्यात आला. सूक्ष्मशैवाल भविष्यातील अंतराळ वस्तीमध्ये ऑक्सिजन, जैवइंधन आणि अन्नस्रोत म्हणून वापरले जाऊ शकतात.

ए. ‘सायनोबॅक्टेरिया’चा अभ्यास

‘सायनोबॅक्टेरिया’ हे प्रकाशसंश्लेषण (photosynthesis) करणारे सूक्ष्मजीव आहेत. अंतराळातील परिस्थितीत त्यांची वाढ आणि प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया यांचा अभ्यास करण्यात आला. बंद वातावरणातील जीवन आधार प्रणाली (closed-loop life support systems) विकसित करण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे आहे.

हे सर्व प्रयोग भारताच्या अंतराळ संशोधनाला एक नवी दिशा देणारे आणि भविष्यातील ‘गगनयान’ मोहीम, तसेच भारतीय अंतराळ स्थानकाच्या निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतील.

– प्रा. बाबासाहेब धोंडीराम सुतार