मार्सेलिस उडीचा दिवस ‘साहस दिन’ म्हणून साजरा करावा ! – प्रा. श्याम देशपांडे, जिल्हाध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समिती, वर्धा

मार्सेलिस उडीचा दिवस ‘साहस दिन’

वर्धा, १४ जुलै (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ८ जुलै १९१० या दिवशी सागरात झेप घेतली. या ‘मार्सेलिस उडी’ला या वर्षी ११५ वर्षे पूर्ण होत आहे. या घटनेला भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे स्थान आहे. या घटनेमुळे भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जागतिक स्तरावर गाजला. भारत एक अशिक्षित, असंस्कृत आणि अविकसित राष्ट्र असून त्याला सुशिक्षित अन् सुसंस्कृत करण्यासाठीच आम्ही तेथे राज्य करत आहोत. ही ब्रिटिशांनी जगासमोर निर्माण केलेली प्रतिमा पूर्ण मातीमोल करणारे स्वामी विवेकानंद आणि दुसरे स्वातंत्र्यवीर सावरकर हे दोनच महापुरुष झाले. त्यामुळे ८ जुलै हा दिवस सर्वत्र ‘साहस दिन’ म्हणून साजरा करावा आणि शासनाने या दिवसाला ‘शौर्य दिवस’ म्हणून मान्यता प्रदान करावी, अशी मागणी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समिती’चे जिल्हाध्यक्ष प्रा. श्याम देशपांडे यांनी केली.

येथील आंतरराष्ट्रीय आर्यवत संघ आणि आंतरराष्ट्रीय बजरंग दल यांच्या वतीने स्थानिक महादेव मंदिरच्या सभागृहात ‘साहस दिना’ निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मंचावर सर्वश्री आर्यवत संघ जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल गदडे, आंतरराष्ट्रीय बजरंग दल जिल्हा महामंत्री रणजीत गौतम, दुर्गाशक्ती परिषद प्रांताध्यक्ष शितल बघेल यांच्यासह आर्यवत संघ आणि बजरंग दल यांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बजरंग जिल्हा प्रभारी कार्याध्यक्ष राजसम्राट बघेल यांनी, तर आभार बजरंग दल जिल्हाध्यक्ष गौरव पांडे यांनी मानले.