संयम महत्त्वाचा !

२७ जून या दिवशी ओडिशा येथील जगन्नाथपुरीला रथयात्रा झाली. ‘या रथयात्रेत चेंगराचेंगरी होऊन ६०० भाविक घायाळ, तर ३ भाविकांचा मृत्यू झाला’.

२७ जून या दिवशी ओडिशा येथील जगन्नाथपुरीला रथयात्रा झाली. ‘या रथयात्रेत चेंगराचेंगरी होऊन ६०० भाविक घायाळ, तर ३ भाविकांचा मृत्यू झाला’, हे वृत्त वाचनात आले. या रथयात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्या ठिकाणी ‘पोलीस आणि सुरक्षादल’ नसल्याने हा प्रसंग झाला, असेही वाचनात आले. रथयात्रेसारख्या मोठ्या उत्सवांमध्ये गर्दी होणे साहजिक आहे; कारण जगन्नाथदेव वर्षातून एकदा भक्तांना दर्शन देण्यासाठी बाहेर येतो आणि भाविकही देवाच्या दर्शनासाठी आतूर असतात; परंतु ‘चेंगराचेंगरी होऊन भाविकांचा मृत्यू होणे आणि अनेक जण घायाळ होणे’, असे का होते ?

केवळ रथयात्राच नव्हे, तर प्रतिवर्षी होणार्‍या गणेशोत्सवात ही विसर्जनाच्या वेळी अशीच गर्दी होते आणि असे प्रसंग होऊन त्याचा गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येते. एकीकडे भाविकांचे दायित्व असते की, त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेतले पाहिजे आणि दुसरीकडे प्रशासनानेही अशा प्रसंगांचा गंभीर परिणाम पाहून पुढे असे प्रसंग टाळण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. भाविकांपैकी एकाने जरी सांगितलेल्या नियमांचे पालन केले नाही, तर त्याचा गंभीर परिणाम सगळ्या जनतेवर दिसून येतो. ‘सर्वांनीच संयम ठेवून असलेल्या नियमांचे पालन करत दर्शन घेतले, तर चेंगराचेंगरी होणार नाही’, असे वाटते. ‘देवाचे अस्तित्व अनुभवून चैतन्य आणि आनंद यांच्या स्तरावर सर्वांना मोठ्या प्रमाणात लाभ व्हावा’, हा या धार्मिक उत्सवांचा उद्देश आहे. हा उद्देश लक्षात घेऊन तो साकार होण्यासाठी प्रशासन, आयोजक आणि भाविक यांनी सर्व बाजूंनी प्रयत्न करायला हवेत, असे वाटते.

अशा चेंगराचेंगरीमुळे होणार्‍या गंभीर परिणामांच्या मुळाशी गेले, तर अनेक कारणे मिळतील; परंतु सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाने स्वतःमध्ये पालट करून सात्त्विकता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी यापूर्वी सांगितले आहे, ‘हिंदु राष्ट्रात रहाणारा समाज सात्त्विक असेल, तेव्हाच त्याची स्थापना होणार.’ हिंदु राष्ट्रात समाज सात्त्विक असल्याने परिणामी असे चेंगराचेंगरीचे प्रसंग होणार नाहीत. त्यामुळे स्वतःसह समाजात सात्त्विकता निर्माण होण्यासाठी साधनाच आवश्यक आहे !

– कु. शर्वरी हेमंत कानस्कर, फोंडा, गोवा. (५.७.२०२५)