आधुनिक वैद्य आणि रुग्ण यांच्यातील नाते प्रेम अन् श्रद्धा यांवर अवलंबून !

१. वैद्यांनी रुग्णाशी नेहमी हसतमुखाने बोलणे आवश्यक ! 

‘आधुनिक वैद्य आणि रुग्ण यांच्यातील नाते प्रेम अन् श्रद्धा यांवर आधारित असते. सध्या आपण समाजात बघतो की, बर्‍याच वेळा रुग्ण वैद्यांवर अविश्वास दाखवतात. त्यामुळे वैद्य आणि रुग्ण यांच्यात श्रद्धेचा अन् प्रेमाचा संबंध रहात नाही. वैद्यांनी रुग्णांशी प्रेमाने बोलले पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वैद्यांचा चेहरा नेहमी हसतमुख असला पाहिजे; कारण रुग्ण वैद्यांमध्येच देव बघत असतो. वैद्यांच्या हसतमुख चेहर्‍यामुळे रुग्णाचा निम्मा ताण न्यून होऊन त्याचे काही आजार दूर होण्यास साहाय्य होते. तेव्हा रुग्णाला वैद्यांचा आधार वाटत असतो.

२. रुग्णाचे नीट ऐकून न घेतल्याने तो दुखावला जाणे

अ. काही आधुनिक वैद्य रुग्णाचे नीट ऐकून घेत नाहीत, म्हणजे रुग्णाला बोलूच देत नाहीत. माझ्या ओळखीचे एक आधुनिक वैद्य आहेत. एक रुग्ण त्यांच्याकडे एका शारीरिक त्रासासाठी गेला होता. आधुनिक वैद्यांनी रुग्णाला औषध दिले आणि पुढील आठवड्यात बोलावले. त्यानुसार रुग्ण त्यांच्याकडे गेला. प्रत्यक्षात त्या रुग्णाला त्यांच्या औषधांमुळे त्रास होत होता. त्याविषयी रुग्णाने वैद्यांना सांगितले; पण रुग्णाचे पूर्ण ऐकून न घेताच ते म्हणाले, ‘‘मी दिलेले औषध घेत रहा.’’

डॉ. दीपक जोशी

आ. माझ्या ओळखीचा एक रुग्ण एका आधुनिक वैद्यांकडे गेला आणि त्याने औषध घेतले. वैद्यांनी सांगितल्यानुसार रुग्ण पुन्हा त्यांच्या भेटीसाठी गेला. तेव्हा रुग्ण त्यांना स्वतःच्या अन्य विकाराविषयी सांगू लागला. तेव्हा वैद्य रुग्णाला रागावून म्हणाले, ‘‘तुम्ही ज्या व्याधीसाठी माझ्याकडे आला होता, त्याविषयीच सांगा.’’ त्यामुळे रुग्ण दुखावला गेला.

३. रुग्णांनी आधुनिक वैद्यांचे एकाग्रतेने,शांतपणे आणि श्रद्धेने ऐकावे ! 

काही रुग्ण वैद्यांकडे गेल्यावर वैद्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत नाहीत. त्याऐवजी रुग्ण यू ट्यूब किंवा अन्य सामाजिक माध्यमांतून वाचलेले किंवा ऐकलेले वर्णन सांगण्याचा प्रयत्न करतात; पण बाहेरचे ज्ञान अपूर्ण असते. ‘ते कुणी लिहिलेले आहे ?’, हेही आपल्याला ठाऊक नसते. त्यामुळे जेव्हा वैद्य रुग्णाला प्रकृती, औषधे आणि उपचार यांविषयी सांगत असतात, तेव्हा रुग्णाने वैद्यांचे म्हणणे एकाग्रतेने, शांतपणे अन् श्रद्धेने ऐकावे.

खरेतर वैद्य होणे, ही देवाची मोठी कृपा असते; कारण रुग्ण वैद्यांसमोर आपले शारीरिक, मानसिक इत्यादी त्रास मनमोकळेपणाने सांगतो. वैद्यांनी ते शांतपणे ऐकून घेतल्यावर रुग्णाच्या मनावरचा ताण हलका होतो आणि त्याचे बरेचसे मानसिक त्रास न्यून होतात.’

– डॉ. दीपक जोशी (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स), देवद, पनवेल. (१८.२.२०२५)