
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, मुंबई आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार तथा लष्कर-ए-तोयबाचा (एल्.ई.टी.चा) प्रमुख हाफिज सईद आणि जैश-ए-महंमदचा (जे.ई.एम्.चा) प्रमुख मसूद अझहर यांना भारताच्या कह्यात देण्यास पाकिस्तान सिद्ध आहे. जर नवी देहलीने या प्रक्रियेत सहकार्य करण्याची सिद्धता दर्शवली, तर विश्वास निर्माण करण्यासाठी ‘तपासाधीन व्यक्तींना’ भारताच्या कह्यात देण्यास त्यांच्या देशाला कोणताही आक्षेप नाही. आतंकवादी हाफिज सईद आणि मसूद अझहर यांना संभाव्य करार अन् सद्भावना म्हणून भारताच्या कह्यात देण्याविषयीच्या प्रश्नाचे उत्तर देतांना बिलावल यांनी ही टिपणी केली आहे. राष्ट्रीय आतंकवादविरोधी प्राधिकरण (नॅक्टा) नुसार, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद या दोन्ही संघटनांवरही पाकिस्तानने बंदी घातली आहे, तर हाफिज सईद वर्ष २०१९ पासून आतंकवादी कारवायांसाठी निधी गोळा करण्यासाठी ३३ वर्षांची शिक्षा लाहोरच्या कोट लखपत कारागृहात भोगत आहे. जागतिक आतंकवादी मसूद अझहरवरही बंदी आहे. वर्ष २००१ मध्ये संसदेवर आक्रमण, २६/११ मुंबई आक्रमण, वर्ष २०१६ मध्ये पठाणकोट आक्रमण आणि वर्ष २०१९ मध्ये पुलवामा आक्रमण यांसारख्या भारतातील आतंकवादी आक्रमणात मसूद अझहरचा सहभाग होता. संयुक्त राष्ट्रांनी वर्ष २०१९ मध्ये त्याला जागतिक आतंकवादी घोषित केले होते.
अविश्वसनीय बिलावल भुत्तो झरदारी !
मुळात बिलावल भुत्तो झरदारी हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि हिंदुद्वेषी दिवंगत बेनझीर भुत्तो झरदारी यांचा मुलगा आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान असतांना याच बेनझीर भुत्तो यांनी ‘जम्मू-काश्मीर येथील सर्व मशिदींतून बांग देऊन हिंदूंनी एकतर इस्लाम पंथ स्वीकारावा किंवा स्वतः मरणासाठी सिद्ध व्हावे’, असे आवाहन करण्यास सांगितले होते. त्यानंतर आतंकवाद्यांनी आतंकवादी कारवाया चालू करून काश्मीरमधील हिंदूंची हत्या करण्यास प्रारंभ केल्यानंतर जम्मू-काश्मीर येथून ४ लाख ५० सहस्र हिंदु पंडितांना स्वतःचे घर सोडून देहली आणि अन्यत्र ठिकाणी विस्थापित व्हावे लागले होते. जे तिथेच राहिले त्यांना ठार मारण्यात आले, अनेक हिंदु महिलांवर बलात्कार करण्यात आले. त्यामुळे अशा हिंदुद्वेष्ट्या बेनझीर भुत्तो यांचा मुलगा बिलावल भुत्तो यांच्या विधानावर कितपत विश्वास ठेवायचा ? हा प्रश्न आहे.
बिलावल भुत्तो यांच्या विधानामागे राजकारण !
आतापर्यंत अनेक वेळा भारताने आतंकवादी हाफिज सईद आणि मसूद अझहर यांच्या विरोधात पाकिस्तानला पुरावे सादर करून त्यांना भारताच्या स्वाधीन करण्यास सांगितले होते; मात्र पाकिस्तानने त्या दोघांना देशातच आश्रय देऊन भारताची मागणी वारंवार फेटाळली आहे. भारताने संयुक्त राष्ट्रसंघातही हा प्रश्न उपस्थित करून या २ आतंकवाद्यांना भारताच्या स्वाधीन करण्याची मागणी केली होती. तरीही पाकिस्तानने या दोघांना भारताच्या कह्यात दिलेले नाही. आता बिलावल यांनी असे वक्तव्य का केले ? या मागे मोठे राजकारण आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात लवकरच सत्तापालट होण्याची शक्यता असून राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या जागी चीफ मार्शल असीम मुनीर यांना राष्ट्रपतीपदावर बसवले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर बिलावल भुत्तो झरदारी यांनी असीम मुनीर यांच्या विरोधात उघडपणे आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांनी हाफिज सईद आणि मसूद अझहर यांना भारताच्या कह्यात देण्यास कोणताही आक्षेप नसावा, असा कांगावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानात सर्वत्र चर्चा चालू झाली आहे. या सर्व घडामोडींमुळे पाकिस्तानातील राजकीय समीकरणे झपाट्याने पालटत आहेत. ‘जुलै महिन्यात पुन्हा एकदा देशात लष्करी हुकूमशाही येणार का ?’, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांच्यावर संतापला असून बिलावल यांनी जागतिक स्तरावर पाकिस्तानचा अवमान केल्याचा आरोप केला. ‘बिलावल यांचे विधान पाकिस्तानचे धोरण, राष्ट्रीय हित आणि सार्वभौमत्व यांच्या विरोधात आहे. कोणताही नेता आपल्या नागरिकांना शत्रूदेशाच्या कह्यात देण्याविषयी बोलू शकतो का ?’, असे तल्हा याने म्हटले आहे. बिलावल यांनी केलेले वक्तव्य त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे; कारण तल्हा आतंकवादी हाफिज सईद यांचा मुलगा आहे. त्यामुळे या दोघांचा वाद विकोपाला जाऊन त्यातून त्या दोघांपैकी कुणाचीही हत्या होऊ शकते.
पाक आतंकवाद्यांना भारताच्या स्वाधीन करणे अशक्यच !
‘पाकिस्तानी सैन्याने महंमद अली जिना यांना त्यांच्या मार्गातून हटवले होते. त्यांना ‘स्लो पॉयझन’ (हळू हळू भिनणारे विष) देऊन मारले होते. त्यानंतर त्यांचा उजवा हात मानले जाणारे लियाकत अली खान यांना एका कार्यक्रमात ठार केले. त्यानंतर फातिमा जिना यांना ठार करण्यात आले’, असा आरोप पाकिस्तानमधील ‘मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट’ या पक्षाचे प्रमुख अल्ताफ हुसेन यांनी ११ मे २०२३ या दिवशी जर्मनी येथील एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केला होता. ‘पाकिस्तानी सैन्याने वर्ष १९४७ नंतर नेहमीच पाकिस्तानवर नियंत्रण ठेवले आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ, बेनझीर भुत्तो, आसिफ अली झरदारी यांपैकी कुणाचीही सत्ता असो, त्यांना आय.एस्.आय. (पाकची गुप्तचर संघटना) आणि पाकचे सैन्य यांच्या मुख्यालयात जाऊन झुकावे लागत होते, असेही त्यांनी म्हटले आहे अन् ते सत्य आहे. पाकिस्तानने भारतासमवेत आतापर्यंत ३ वेळा युद्ध केले आहे, तसेच त्याने गनिमी काव्याने आतापर्यंत सहस्रो भारतीय सैनिक आणि हिंदू यांची हत्या केली आहे. त्यामुळे पाकिस्तानसारखा देश आतंकवादी हाफिज सईद आणि मसूद अझहर यांना भारताच्या स्वाधीन करेल, हे कदापि शक्य नाही.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने अलीकडेच पाकिस्तानच्या सीमेवरील आतंकवादी अड्ड्यांवर मोठी कारवाई केली होती, हे उल्लेखनीय आहे. या कारवाईमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. असीम मुनीर राष्ट्रपती झाल्यास हा तणाव वाढण्याची शक्यता आहे. असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याचा प्रस्ताव ठेवून त्यांचा विश्वास संपादन केला आहे. चीनही पाकिस्तानला कायम शस्त्रपुरवठा करत आहे. त्यामुळे भारताने अमेरिकेच्या जागतिक राजकारणापासून आणि पाकिस्तान अन् चीन या देशांपासून कायम सावध राहून युद्धनीती आखली पाहिजे !
| सैन्यासमोर झुकणार्या आणि आतंकवाद्यांना पोसणार्या पाकिस्तानमधील मंत्र्यांवर विश्वास ठेवणे, म्हणजे सापाला दूध पाजण्यासारखेच ! |

संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !
Trump Tariff : ट्रम्प भारतासह अनेक देशांवर १२.५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादणार
आतंकवाद्यांनी भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याची केली रेकी !
संपादकीय : दैवी स्वरसाज हरपला !