Lt Gen Rahul Singh : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी चीन पाकला भारताच्या सिद्धतेची माहिती पुरवत होता ! – लेफ्टनंट जनरल राहुल सिंह

लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांचा गौप्यस्फोट

लेफ्टनंट जनरल राहुल सिंह

नवी देहली – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या कालावधीत चीन पाकिस्तानला भारताच्या सिद्धतेविषयी आणि आघाड्यांवरील तैनातीविषयी आगाऊ माहिती पुरवत होता, असा गौप्यस्फोट लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी केला. ते येथे आयोजित ‘न्यू एज मिलिटरी टेक्नॉलॉजीज’ या कार्यक्रमात बोलत होते.

लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी दिलेली माहिती –

१. भारताला अधिक वेगाने आणि अधिक क्षमतेने काम करण्याची आवश्यकता !

जेव्हा सैनिकी कारवाईचे महासंचालक (‘डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन’, म्हणजेच डी.जी.एम्.ओ.) पातळीवर भारत-पाकिस्तान यांच्यात चर्चा चालू होती, त्याच वेळी पाकिस्तानला चीनकडून भारताच्या महत्त्वपूर्ण सैनिकी हालचालींची अद्ययावत माहिती मिळत होती.

२. चीन-तुर्की आणि पाक यांच्यात युती !

‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारत सीमेवर २ नव्हे, तर ३ शत्रूंशी लढत होता. पाकिस्तान थेट सीमारेषेवर होता आणि चीन त्याला सर्वतोपरी साहाय्य करत होता. पाकिस्तानकडे अनुमाने ८१ टक्के सैनिकी उपकरणे चिनी बनावटीची आहेत. या मोहिमेत चीनने त्याच्या शस्त्रास्त्रांची प्रत्यक्ष चाचणी पाकिस्तानच्या माध्यमातून घेतली. पाकिस्तान एकप्रकारे चीनसाठी ‘प्रयोगशाळा’ ठरला. तुर्कीयेनेही पाकिस्तानला साहाय्य करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

३. लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये हवाई संरक्षण अधिक बळकट करण्याची आवश्यकता

संपूर्ण ऑपरेशनच्या काळात हवाई संरक्षण आणि त्याचे व्यवस्थापन चांगले झाले होते; मात्र लोकवस्ती असलेल्या भागात योग्य व्यवस्था झाली नाही, त्यामुळे भविष्यात यावर अधिक लक्ष द्यावे लागेल.

४. २१ ठिकाणांना करायचे होते लक्ष्य !

पाकिस्तानातील लक्ष्य निवडतांना मोठ्या प्रमाणावर तांत्रिक माहिती आणि मानवी गुप्तचर माहितीचा वापर करण्यात आला. पाकिस्तानमधील लक्ष्य करण्याजोगी एकूण २१ ठिकाणे निश्चित करण्यात आली होती; मात्र अंतिम टप्प्यात ठरवले गेले की, त्यांपैकी केवळ ९ ठिकाणांना लक्ष्य करायचे. त्यानंतर एक संयुक्त निर्णय घेण्यात आला की, तीनही सैन्य दलांनी एकत्रितपणे अशी कारवाई करावी, जेणेकरून जगाला स्पष्ट संदेश जाईल की, भारत आता एकसंघ आणि सशक्त आहे.

५. स्वतःची परिस्थिती अधिक बिकट होऊ नये, यासाठी पाककडून युद्धविराम !

पाकिस्तानसमवेत झालेला युद्धविराम हाही एक रणनीतिक निर्णय होता; कारण युद्ध चालू करणे सोपे असते; पण ते थांबवणे आणि नियंत्रित करणे अत्यंत अवघड असते. त्यामुळे पाकिस्तानला हे समजले की, जर युद्ध चालू राहिले, तर भारत पूर्ण शक्तीनिशी प्रत्युत्तर देईल आणि पाकिस्तानची परिस्थिती आणखीनच बिकट होईल; म्हणूनच त्याने युद्धविरामाची मागणी केली.

६. आतंकवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश !

या मोहिमेद्वारे भारताने शेजारी देशांसह संपूर्ण जगाला स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कोणत्याही प्रकारच्या आतंकवादी कारवाया सहन करणार नाही.

संपादकीय भूमिका

चीन पाकला सर्व प्रकारचे साहाय्य करतो, हे जगजाहीर असल्याने भारताने चीनशी दोन हात करण्यासाठी सिद्ध व्हावे ! चीनला कोंडीत पकडण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे का ? आणि भारतीय नागरिक चिनी साहित्यावर बंदी घातली जाण्यासाठी प्रयत्नरत आहेत का ?, असेही प्रश्न उपस्थित होतात !