पालकांच्या अपेक्षा !

पूर्वी आपल्या मुलांना ते सुशिक्षित, सुजाण संस्कारक्षम नागरिक व्हावेत आणि जीवनावश्यक अर्थार्जन करावे, यांसाठी शिक्षण दिले जायचे. सध्या शिक्षणाचेही विकृतीकरण झाले आहे. पालकांची मानसिकता, उद्देश आणि ध्येय भयावह स्पर्धात्मक आणि सर्व काही प्रतिष्ठा मिळवण्यासाठी असे झाले आहे. त्यासाठी पालक प्रमाणापेक्षा आणि क्षमतेपेक्षा अधिक व्यय करतात. आपला मुलगा किंवा मुलगी यांना उत्तम गुण मिळाले, तर आपल्याला मोठेपणा मिळेल, कौतुक होईल, अशीही काहींची मानसिकता असते.

परिणामतः आजची मुले पालकांच्या या अपेक्षांच्या ओझ्याखाली जगत आहेत. ‘या स्पर्धेमध्ये आपण टिकून राहू का ?’, या विचारांमध्ये ती तणावाखाली रहात आहेत. पालकांच्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या, तर पालक काय म्हणतील ? आणि स्पर्धेमध्ये टिकून राहू शकलो नाही, तर समाज काय म्हणेल ? अशा दुहेरी विचारांच्या कात्रीत आजची मुले अडकलेली असतात. आज खेळण्याच्या वयामध्ये मूल आणि योग्य संस्कार करण्याच्या वयामध्ये पालक असे दोघेही या दुष्टचक्रामध्ये अडकल्यासारखे वाटतात.

 

अधिक गुण मिळवण्याच्या अपेक्षेमुळे मुले पालकांपासून दुरावलेली आहेत किंवा मुलांना निराशा आली आहे, असे काही काळापूर्वीपर्यंत आपण ऐकत होतो; परंतु आता मुलांची निराशा ही प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागली आहे. परिणामस्वरूप पालकही त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. याचेच उदाहरण म्हणजे नुकतीच घडलेली सांगलीची घटना आहे. या घटनेत वैद्यकीय प्रवेशपरीक्षेच्या सराव परीक्षेत चांगले गुण न मिळाल्याने वडील रागावल्यावर त्यांना उलट उत्तर दिल्याने वडिलांनी केलेल्या मारहाणीत मुलीने तिचे प्राण गमावले. वडील स्वतः मुख्याध्यापक होते. या घटनेत वडिलांना त्यांच्या प्रतिमेचा विचार होता का ? ‘आपल्या मुलीला चांगले गुण मिळालेच पाहिजेत’, असा त्यांचा आग्रह त्यांच्या मुलीला आणि त्यांना कुठल्या टोकाला घेऊन गेला ? वडिलांच्या या अयोग्य कृतीमुळे त्यांची भयंकर मानसिकता पुढे आली. त्यामुळे ‘असे मुख्याध्यापक शाळा कशी चालवत असतील ?’, असा प्रश्न निर्माण झाला. सध्या पालकांना ‘त्यांचे पाल्य आधुनिक वैद्य नाही, तर अभियंता होऊन त्याने पुष्कळ पैसे कमवावेत’, असे वाटते. कदाचित त्यांची स्वप्ने ते त्यांच्या पाल्यांच्या माध्यमातून पूर्ण करून घेत असतात. वरील घटनेनंतर‘आपण मुलांना मोकळीक द्यावी’, ‘मुलांना स्पर्धात्मक युगामध्ये असे ढकलू नये’, अशा बातम्या किंवा अशा प्रकारचे लिखाण या घटनेनंतर येऊ लागल्या आहेत. पालकांनी त्यांच्या अपेक्षा मुलांवर लादण्यापूर्वी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे, हाच बोध यातून घेतला पाहिजे !

– सौ. गौरी वैभव आफळे, गोवा.