‘२२ जून २०२५ या दिवशी नाशिक येथे २ गुरांनी एका वयस्कर व्यक्तीला दुचाकी गाडीवरून खाली पाडले आणि अक्षरशः शिंगाने उचलून फेकले अन् त्यानंतर पायांखाली तुडवले. त्यात त्या वयस्कर व्यक्तीचा मृत्यू झाला. अशाच प्रकारे ४ दिवसांपूर्वी दोन बैलांच्या भांडणात एका महिलेला बैलाची धडक लागून तिचा मृत्यू झाला. रात्रीच्या वेळी म्हैस आडवी आल्याने अपघात होऊन वाहनचालक जायबंदी झाल्याच्या घटनाही दिवसेंदिवस वाढत आहेत. हे झाले भटक्या गुरांचे ! भटक्या कुत्र्यांचे आक्रमण लोकांवर होणे, हे तर नित्याचेच झाले आहे. २५ जून या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळकरी बालकावर भटक्या कुत्र्यांनी आक्रमण केले. त्याच दिवशी उदयपूर, राजस्थान येथे भटक्या कुत्र्यांनी एका लहानग्याचे चक्क लचके तोडले. अशीच घटना याच दिवशी डोंबिवली आणि मुंबई येथेही घडली. कुत्र्यांच्या आक्रमणांच्या दुर्दैवी घटना नागपूर, यवतमाळ, गडचिरोली, कल्याण, सतना (मध्यप्रदेश), गोव्याचे समुद्रकिनारे अशा किती ठिकाणच्या सांगाव्यात ! या दिवसांत अशा काही घटना वाचण्यात आल्या.

१. भटक्या कुत्र्यांनी निर्माण केलेली दहशत !
गोवा येथे प्रतिदिन एक मंत्री सकाळी फिरायला जात होते; परंतु केवळ भटक्या कुत्र्यांच्या मागे लागण्याच्या भीतीमुळे त्यांनी सकाळचे फिरणे बंद केल्याचे त्यांनी मध्यंतरी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. कुत्र्यांच्या दहशतीची आणखी एक बातमी वाचायला मिळाली. एका मुलीचे घर अगदी थोड्या अंतरावर असतांना तिने ‘कॅब बुक’ (भाड्याचे चारचाकी वाहन) केली. ‘इतक्या जवळच्या अंतरासाठी कॅब बुक करण्याचे कारण काय’, असे कॅबचालकाने सहज विचारले, तेव्हा तिने कारण सांगितले, ‘मी ज्या लोकवस्तीत रहाते, तेथे मोठ्या प्रमाणात कुत्री आहेत आणि ती मागे लागतात. या भीतीमुळेच घर जवळ असूनही कॅबने घरी जात आहे.’ हे सर्व ऐकल्यानंतर कुत्र्यांची किती दहशत निर्माण झाली आहे, याची कल्पना आपल्याला येऊ शकते. सध्या सकाळी फिरायला जाणार्या जवळजवळ प्रत्येकच व्यक्तीच्या हातात काठी असण्याचे कारण एकच आहे, ते म्हणजे भटकी कुत्री मागे लागण्याची भीती !
२. गोवा येथे समुद्रकिनारी कुत्र्यांची वाढलेली संख्या दहशत निर्माण करणारीच !
मध्यंतरी काही नातेवाइक पाहुणे आल्यावर मी त्यांना गोव्याच्या एका समुद्रकिनारी फिरायला घेऊन गेलो. तेथे गेल्यावर चारचाकीतून उतरलो, तेव्हा मला आश्चर्य वाटले, गाडीपासून समुद्रातील वाळूत जाईपर्यंत ७ ते ८ कुत्री आमच्या समवेत होती. २-३ कुत्र्यांना खरुज (त्वचाविकार) झालेले दिसत होते. त्यांचे लक्ष आमच्या हातातील खाऊच्या पिशवीकडे होते. केव्हा एकदा पिशवी उघडली जाईल, याची जणू ती वाटत पहात होती. ही परिस्थिती पाहून पाहुण्यांनाही अवघडल्यासारखे झाले. ‘पाहुणे वाळूत किंवा समुद्रातील पाण्यात खेळायला लागले, तर ही कुत्री त्यांच्या मागे लागणार नाहीत ना’, अशी भीती माझ्या मनात निर्माण झाली. कारण मागील ६ मासांत समुद्रकिनारी पर्यटकांवर भटक्या कुत्र्यांनी आक्रमणे केल्याच्या ५-६ बातम्या मी वाचल्या होत्या. ‘भटक्या कुत्र्यांना आवर न घातल्यास गोव्याच्या पर्यटन व्यवसायावर मंदीचे सावट येऊ शकते’, असे मला वाटले; कारण पर्यटक कुत्र्यांच्या भीतीमुळे किंवा किळसवाण्या संपर्कामुळे म्हणा समुद्र पर्यटनाचा आनंद घेऊ शकत नसेल, तर तो गोव्याला का येईल ?
३. सरकार आणि प्रशासन निद्रिस्त !
दुर्दैव म्हणजे कुत्र्यांच्या आक्रमणांच्या गंभीर घटना होऊनही कोणत्याही राज्यातील सरकार किंवा प्रशासन जागे व्हायला सिद्ध नाही. कुणी अगदीच आग्रहाने विचारणा केली, तर भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्याचे किंवा करण्याची योजना असल्याचे सूत्र पुढे केले जाते; परंतु किती कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले ? त्याला किती व्यय आला ? त्याची फलनिष्पत्ती काय ? इत्यादी जनतेसमोर कधीच येत नाहीत. त्यामुळे ‘खरोखरच ही उपाययोजना केली जात आहे का ?’, असा प्रश्न सामान्य जनतेला पडल्यावाचून रहात नाही.
अध्यात्मानुसार प्राणीप्रेमींना देवाण-घेवाण हिशोब फेडावाच लागेल !

अध्यात्मशास्त्रानुसार जर आपल्या कृतीत निरपेक्षता नसली, भावना असली, तर त्या कृतीचा देवाण-घेवाण हिशोब लागू होतो. त्यामुळे त्रासदायक भटक्या कुत्र्यांचे नको तितके लाड करणार्या या प्राणीप्रेमींनाही हा नियम नक्कीच लागू होतो. कर्मफलन्यायानुसार त्यांना या कर्माचे चांगले किंवा वाईट फळ हे भोगावेच लागणार आहे. जर या प्राण्यांचे पाठीराखे होऊन हे लोक पुण्य कमवत असतील, तर या प्राण्यांपासून समाजाला होणार्या त्रासाचे फळही प्राणीप्रेमी लोकांना भोगावेच लागेल; परंतु या लोकांचा अध्यात्माचा अभ्यास नसल्याने या गोष्टी यांना कळतीलच, असे नाही. त्यामुळे ‘जे काय करायचे, ते तुमच्या घरात करा, आम्हाला त्रास देऊ नका’, हे लोकांनीच या प्राणीप्रेमींना बजावले पाहिजे.
– श्री. योगेश जलतारे (२६.६.२०२५)
४. समस्येसंबंधी विविध न्यायालयांचे विविध दृष्टीकोन !
काही लोक प्रतिदिन या भटक्या कुत्र्यांना घरातील उरलेले अन्न किंवा काही जण स्वतः अन्न विकत आणून खायला घालतात. उपाहारगृहमालकही त्याच्या उपाहारगृहातील उरलेले अन्न कुत्र्यांना खायला घालतात किंवा रस्त्यावर आणून टाकतात. त्यामुळे ही कुत्री त्या ठिकाणी टोळी करून रहातात. त्या ठिकाणी कुत्र्यांचे एक प्रकारचे गुंडाराज निर्माण झालेले असते. या समस्या सोडवण्यासाठी काही लोक मध्ये मध्ये न्यायालयाकडे जातात; परंतु न्यायालयेही त्यांच्या त्यांच्या दृष्टीकोनातून वेगवेगळे निर्णय देतात. मध्यंतरी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने ‘भटक्या कुत्र्यांना खाऊ घालायचे असल्यास घरी नेऊन खाऊ घाला, लोकवस्तीत नको’, अशा आशयाचे काही दिशानिर्देश जारी केले होते. तेव्हा माननीय न्यायमूर्तींनी ‘जे लोक भटक्या कुत्र्यांना खायला घालतात, त्यांनी त्या कुत्र्यांचा उपद्रव लोकांना होणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी’, असा आदेश दिला होता; परंतु सर्वाेच्च न्यायालयाने ‘अशा लोकांवर बळजोरीने कारवाई करू नका’, असे सांगून आदेशाला स्थगिती दिली. मुंबई येथील काही वसाहतींत स्थानिक लोक भटक्या कुत्र्यांना खायला घालतात. त्यामुळे कुत्र्यांचा त्रास होतो; म्हणून काही गृहनिर्माण संस्थांनी अशा लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी खासगी सुरक्षा कर्मचारी (बाऊंसर्स) नेमले; परंतु मुंबई उच्च न्यायालयाने ‘भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणार्यांना इतरांनी त्रास देऊ नये’, अशी सक्त ताकीद दिली. त्यामुळे जनता अगदीच हतबल झाली आहे.

५. प्राणीप्रेमी संस्थांचे आततायी आणि समाजघातकी प्राणीप्रेम !
कुत्र्यांच्या समस्यांमुळे जनता त्रस्त झालेली असतांना प्राणीप्रेमी संघटनांचे प्राणीप्रेम नको तितके उफाळून येते. त्यांना ‘मनुष्य’ हाही एक प्राणी आहे आणि त्याच्यावरही आपण प्रेम केले पाहिजे’, हे लक्षात येईल तो सुदिन म्हणावा !
भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात कितीही माणसे घायाळ झाली, मृत्यूमुखी पडली, तरीही प्राणीप्रेमी संघटना भटक्या कुत्र्यांवर कारवाई करू देत नाहीत. हे लोक लगेचच न्यायालयाचे दार ठोठावून न्यायालयाच्या समाजोपयोगी आदेशांना खोडा घालतात. मेलेल्या माणसांविषयी हे लोक दुःख व्यक्त करतांना दिसत नाहीत.
धर्मशास्त्रानुसार प्राण्यांपेक्षा मनुष्य श्रेष्ठ असल्याने मनुष्याचे हित पाहिले पाहिजे; कारण सर्व सजिवांमध्ये केवळ मनुष्यप्राणीच साधना, उपासना करून स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घेऊ शकतो, बाकी सर्व भोगयोनी आहेत. यासह व्यक्तीपेक्षा समाज श्रेष्ठ असतो. त्यामुळे व्यक्तीगत आवडीनिवडीपेक्षा सामाजिक स्वास्थ्य आणि समाजहित प्राधान्याने पाहिले पाहिजे. त्यामुळे प्राणीप्रेमी लोकांना असलेले व्यक्तीगत प्राणीप्रेम समाजहिताचे नसेल, तर ते त्यांनी घरापुरतेच मर्यादित ठेवावे. जर ते समाजाचे अहित करणारे असेल, तर अशा लोकांना समाजानेच समज देण्याची आवश्यकता आहे.
६. उपाययोजना
अ. काही वर्षांपूवी प्रत्येक गावात भटक्या गुरांसाठी प्रशासनाने उभारलेले कोंडवाडे असत. तेथे प्रशासकीय कर्मचारी भटक्या गुरांना आणून बांधून ठेवत. त्यानंतर त्यांचा मालक शोधायला आल्यावर त्या गुरांचा ताबा मालकाला दिला जात असे. मालकाकडून प्राण्यांवर केलेला व्यय आणि दंड वसूल केला जात असे.
आ. पावसाळ्याच्या शेवटी कुत्र्यांची संख्या वाढल्यानंतर प्रशासन कुत्र्यांच्या मालकांना जाहीर पूर्वसूचना देऊन त्यांच्या गळ्यात पट्टा बांधायला सांगत. भटक्या अन् पिसाळलेल्या कुत्र्यांवर विषप्रयोग करून त्यांना मारत, तसेच गावाबाहेर खोल खड्डयांमध्ये पुरत असत. त्यामुळे कुत्र्यांची ही समस्या आटोक्यात होती. आता प्राणीप्रेमी संघटनांनी न्यायालयात धाव घेऊन पिसाळलेल्या कुत्र्यांवरील विषप्रयोगाला अमानवीय सांगून तसा आदेश घेतल्यामुळे भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग करता येत नाही. यावर उपाययोजना म्हणून शासनाने भटक्या कुत्र्यांना जंगलात सोडायला हवे किंवा प्राणीप्रेमी संघटनांना भटक्या कुत्र्यांचे दायित्व देऊन खासगी स्तरावर कुणाला त्रास होणार नाही, अशा पद्धतीने प्रतिपाळ करायला सांगितले पाहिजे.
इ. ज्या मालकाची गुरे भटकंती करतांना दिसतील आणि त्यांच्यापासून जनतेला त्रास झाल्यास त्याची हानीभरपाई मालकाकडून घ्यावी.
– श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक. (२६.६.२०२५)
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !