‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील १८.५.२०२५ या दिवशीच्या मुख्य सत्राचे सूक्ष्म परीक्षण !

१७ ते १९ मे २०२५ या कालावधीत फर्मागुडी (फोंडा, गोवा) येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवातील द्वितीय दिवसाच्या मुख्य सत्राचे सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी मनोगत व्यक्त करताना डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या पत्नी डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांचा सन्मान

‘सनातनच्या साधिका सौ. ज्योती दाते (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांनी श्री महालक्ष्मीदेवीस्वरूप डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांचा सन्मान केला. तेव्हा डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांच्या देहातून दिव्य तेज प्रक्षेपित होऊन कुंदाच्या फुलांचा मंद सुगंध वातावरणात दरवळला. त्यामुळे वातावरण सात्त्विक होऊन श्रोत्यांचा भाव जागृत होत होता.

२. डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी मनोगत व्यक्त करणे

डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांची वाणी अत्यंत सात्त्विक आणि मृदू होती. त्यांच्या वाणीतून चैतन्यमय शीतल लहरींचे प्रक्षेपण होऊन वातावरण शीतल आणि चैतन्यमय झाले. त्यांच्या बोलण्यातून त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्याप्रतीचा कृतज्ञताभाव आणि आदरभाव प्रकर्षाने जाणवत होता. त्यांचे बोलणे अत्यंत सात्त्विक असून ‘ते ऐकतच रहावे’, असे वाटत होते. त्यांच्यामुळे उपस्थितांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दिव्यत्वाची केवळ माहितीच मिळाली नाही, तर प्रचीतीही आली.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

३. पू. अनंत आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) आणि त्यांच्या पत्नी सौ. सुनीती आठवले यांचा सन्मान

पू. अनंत आठवले यांचा सन्मान पू. प्रदीप खेमका (सनातनचे ७३ वे संत, वय ६५ वर्षे) आणि सौ. सुनीती आठवले यांचा सन्मान पू. (सौ.) सुनीता खेमका (सनातनच्या ८४ व्या संत, वय ६४ वर्षे) यांनी केला. पू. अनंत आठवले यांच्या ठिकाणी मला शेषनागाचे दर्शन झाले. त्या वेळी मला पुढील दृश्य सूक्ष्मातून दिसले, ‘पू. अनंत आठवले हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेरूपी श्रीविष्णूच्या कार्यात सहभागी झाल्याबद्दल सूर्यदेवाने पू. प्रदीप खेमका यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान केला, तसेच पू. अनंत आठवले यांच्या पत्नी सौ. सुनीती आठवले यांच्या रूपातील शेषनागाची पत्नी ज्योतिषमतीदेवी हिचा सन्मान सूर्यपत्नी संध्या हिने पू. (सौ.) सुनीता खेमका यांच्या माध्यमातून केला.’

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दिव्य मार्गदर्शन 

४ अ. मार्गदर्शन ऐकण्यासाठी देवता आणि ऋषिमुनी कार्यक्रमस्थळी सूक्ष्मातून उपस्थित असणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची वाणी ही परावाणी असून ती परम दैवी आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन चालू झाल्यावर पृथ्वीवर वैकुंठाचे वायूमंडल निर्माण झाले. श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दिव्य मार्गदर्शन ऐकण्यासाठी कार्यक्रमस्थळी देवलोकातील देवता आणि ऋषिलोकातील विविध ऋषिमुनी यांचे शुभागमन झाले. त्यांच्या आगमनाची चाहूल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना लागल्यामुळे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाच्या प्रारंभीच देवता आणि ऋषिमुनी यांना अभिवादन (वंदन) केले.

४ आ. मार्गदर्शन ऐकणार्‍या साधकांच्या चित्तात साधनेचे केंद्र निर्माण होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या वाणीतून प्रक्षेपित झालेला प्रत्येक शब्द हे चैतन्याने युक्त असलेले शब्दब्रह्म आणि त्यांची वाणी ही ब्रह्मवाणी आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन ऐकणार्‍या साधकांच्या अंतर्मनापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनातील प्रत्येक शब्द थेट पोचला आणि साधकांच्या चित्तात साधनेचे चैतन्यदायी केंद्र निर्माण झाले.

४ इ. साधकांवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या वाणीत श्रीविष्णूच्या दिव्य वाणीचे तेज सामावलेले आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन ऐकणार्‍या श्रोत्यांवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन त्यांच्यावरील त्रासदायक काळे आवरण दूर झाले. परिणामी साधकांमध्ये चैतन्य पसरून त्यांचे चेहरे उजळले.

४ ई. सर्व सात्त्विक जिवांना परमानंदाची अनुभूती येणे : मार्गदर्शनाच्या वेळी साक्षात् श्रीमन्नारायणाचे मूर्तीमंत स्वरूप असणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा दिव्य सत्संग लाभल्यामुळे केवळ हे मार्गदर्शन ऐकणार्‍याच नव्हे, तर पृथ्वीवरील समस्त सात्त्विक जिवांना परमानंदाची अनुभूती आली.

४ उ. गुरुदेवांनी सोप्या भाषेत साधनेचे महत्त्व सांगणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी उपस्थित साधकांना चैतन्यमय वाणीमध्ये आध्यात्मिक स्तरासह बौद्धिक स्तरावरही साधनेचे महत्त्व अत्यंत सोप्या भाषेत आणि सुंदर रितीने विश्लेषण करून सांगितले.

४ ऊ. गुरुदेव सूक्ष्मातून शेषनागाच्या आसनावर विराजमान असणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी ते स्थुलातून सामान्य दिसणार्‍या आसंदीवर; परंतु सूक्ष्मातून शेषनागाच्या आसनावर विराजमान झाले होते. तो शेषनाग फणा काढून चोहीकडे लक्ष ठेवत होता आणि कार्यक्रमस्थळी सूक्ष्मातून आक्रमण करण्यासाठी येणार्‍या वाईट शक्तींवर विषारी फुत्कार सोडत होता. यावरून मला ‘शेषनागाचा श्री गुरूंप्रतीचा समर्पितभाव आणि सेवाभाव, तर वाईट शक्तींप्रतीचा क्षात्रभाव’, असे विविध भाव अनुभवण्यास मिळाले.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.