संपादकीय : विमान अपघात : भाकीत आणि संवेदनशीलता !

एअर इंडियाचे ‘एआय १७१’

कर्णावतीहून लंडन येथे निघालेल्या एअर इंडियाचे ‘एआय १७१’ विमान उड्डाण करताच कोसळले. विमानात नुकतेच इंधन भरलेले असल्याने ते कोसळल्यानंतर आगीचा मोठा डोंब उसळला. विमान ज्या परिसरात कोसळले, त्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहाच्या परिसराचीही मोठी हानी झाली. यामुळे अपघातातील मृतांची संख्या मोठी आहे. विमान अपघाताचे अन्वेषण यापुढे होईलच. हा अपघात होता कि घडवून आणलेला अपघात हेही पुढे येईल; कारण तज्ञांकडून या अपघाताच्या संदर्भात लक्षवेधक आणि महत्त्वाची सूत्रे मांडली जात आहेत अन् अनेक तांत्रिक सूत्रेही पुढे येत आहेत.

अपघातग्रस्त विमानाने उड्डाण केल्यानंतर ते ६२५ फुटांवरून कोसळले. विमानाची दोन्ही इंजिन एकाच वेळी निकामी झाली. पक्ष्यांच्या धडकेने विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड होऊन ते निकामी होऊ शकते; परंतु दोन्ही इंजिन एकाच वेळी बंद होऊ शकत नाहीत, असे सांगितले जाते. इंधन टाकीच्या मुख्य ‘स्विच’पासून इंजिनच्या पुरवठा रेषेमध्ये बसू शकणार्‍या इंधनाचे प्रमाण केवळ ३०-४० सेकंदांसाठी इंजिन चालू ठेवू शकते. एवढ्या इंधनात ६२५ फूट उड्डाण शक्य आहे. त्यामुळे विमान उड्डाणापूर्वी पडताळणी करतांना नेमके काय झाले, याचे अन्वेषण केले जाईल. संपूर्ण पडताळणी केल्यानंतरच विमान लांबच्या प्रवासासाठी पाठवता येते. विमानाच्या पडताळणीच्या वेळी संपूर्ण इंधन पुरवठा रेषेची सखोल पडताळणी करणे अनिवार्य असते. पडताळणीनंतर विमानातील कर्मचारीही तेथे पोचू शकत नाहीत. इंधन पुरवठा रेषा ही विमानतळावरील विमानाची पडताळणी करणार्‍या कर्मचार्‍यांचे उत्तरदायित्व असते. उड्डाणापूर्वी इंधन टाकीची पातळी, इंधन पुरवठा रेषेचा दाब, ‘क्रॉसफीड’ आणि पुरवठा झडप, पंप कार्यक्षमता आदी पडताळणी अभियंते अन् प्रमाणन अधिकारी (ग्राऊंड टेक्निशियन) यांच्याद्वारे केली जाते. या पडताळणीनंतर आणि धावपट्टी उड्डाणासाठी सज्ज असल्यानंतरच वैमानिकांना बोलावले जाते. वैमानिक पडताळणी सूचीनुसार दुहेरी पडताळणी करतात; परंतु त्यांना इंधन पुरवठा रेषा चालू किंवा बंद करण्याचा अधिकार नाही, म्हणजेच मुख्य इंधन झडप (व्हॉल्व्ह) आणि पुरवठा रेषा ही केवळ भूमीवरील तांत्रिक कर्मचार्‍यांचे उत्तरदायित्व असते. जर मुख्य इंधन पुरवठा झडप बंद असेल, तर पुरवठा रेषेतील इंधनावर इंजिन ३०-४० सेकंद चालू शकते. ते इंधन संपताच दोन्ही इंजिन बंद पडून अपघात होऊ शकतो. ६२५ फूट उंचीवर विमानाचा अपघात झाला, हा याचा थेट पुरावा आहे. येथे प्रश्न निर्माण होतो की, पडताळणी अनिवार्य असलेली आणि केवळ पडताळणी पथकालाच दिसणारी गोष्ट कुणी बंद केली ? अन्वेषण यंत्रणांना असे काही प्रश्न आणि सूत्रे लक्षात घेऊन अन्वेषण करावे लागणार आहे. उड्डाणापूर्वी प्रमाणन अधिकारी किंवा अभियंते यांच्यापैकी झडप क्षेत्राला शेवटचा स्पर्श कुणी केला होता ? पडताळणीच्या वेळी त्या ठिकाणी कुणी अनधिकृत व्यक्तीने प्रवेश केला होता का ? यात झडप जाणूनबुजून बंद करण्यात आल्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे या घटनेत केवळ निष्काळजीपणा झाला कि हा कोणत्या उद्देशाने घडवलेला घातपात होता ? हे अन्वेषणाअंती पुढे येईलच.

ज्योतिषशास्त्राद्वारे मांडलेले भाकित

ज्योतिषी श्री. सिद्धेश्वर मारटकर

२४८ लोक असलेल्या या विमानातील केवळ एकच व्यक्ती दैव बलवत्तर म्हणून बचावली, त्याचप्रमाणे वाहतूक कोंडीमुळे १० मिनिटे विलंब झाल्याने एक महिला या विमानाच्या वेळेत पोचू शकली नव्हती. त्यामुळे तीही बचावली. भारतातील गेल्या २ दशकांतील हा सर्वांत मोठा विमान अपघात होता. त्याचे संबंधित क्षेत्रांवर परिणाम होणार असले, तरी एका गोष्टीकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले, ते म्हणजे ज्योतिषींचे अनुमान ! पुणे येथील प्रसिद्ध ज्योतिषी श्री. सिद्धेश्वर मारटकर यांनी जून महिन्यात ‘विमान दुर्घटना, आगीच्या घटना आणि वीज पडून अपघात होतील’, असे भाकित वर्तवले होते. अन्यही ज्योतिषींनी विमान अपघातांची शक्यता वर्तवली होती.

वर्ष २०२५ हेच मुळात आपत्कालीन घटनांचे असल्याची शक्यता अनेक ज्योतिषींनी वर्षाच्या प्रारंभीच वर्तवली होती. विज्ञानच सर्वश्रेष्ठ मानणार्‍यांना अनेक आव्हाने देऊनही ज्योतिषशास्त्र त्यांना पुरून उरले आहे. प्राचीन हिंदु धर्मातील ग्रहगणितांच्या मांडल्या जाणार्‍या शक्यता आजच्या काळातही बर्‍याच अंशी खर्‍या ठरतांना आढळतात. द्रष्टे संत, ज्योतिषतज्ञ यांच्या भाकितांना अंधश्रद्धा ठरवणार्‍यांना कर्णावतीच्या विमान अपघाताच्या निमित्ताने चपराक बसली असणार, अर्थात् ते हे मान्य करणार नाहीत, ही गोष्ट वेगळी; परंतु आजच्या काळातही ज्योतिषशास्त्रावर अनेकांचा विश्वास आहे आणि तो ठेवल्यास योग्य त्या सतर्कतेच्या उपाययोजना करून धोके टाळता येऊ शकतात, त्याची तीव्रता न्यून करता येऊ शकते, हे लक्षात घ्यायला हवे. पाश्चात्त्य देशांतील नॉस्ट्रॅडॅमस, बाबा वेंगा आदींनी वर्तवलेल्या भविष्यवाण्यांवर विज्ञानवादी कधी काही बोलण्याचे धाडस करत नाहीत; परंतु भारतीय ज्योतिषांनी ग्रहगणितांच्या आधारे मांडलेल्या अनुमानांना खोटे ठरवण्यात पुरोगाम्यांना मोठे शौर्य वाटते. असो.

‘मृत’ संवेदनशीलतेचे ‘जिवंत’ उदाहरण

या विमान अपघातानंतर घटनास्थळावरील अनेक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाले. इमारतीत घुसलेला विमानाचा पुढील भाग, अनेक ठिकाणे पडलेले विमानाचे भाग त्यासह प्रवाशांचे मृतदेह आदी मन हेलावणारी दृश्ये समोर आली. या आत्यंतिक दुःखद प्रसंगी अनेकांनी साहाय्याचे हात पुढे केले. अशा प्रसंगात हमखास घडणारी सध्याची मानवी कृती, म्हणजे हातात भ्रमणभाष घेऊन त्या ठिकाणची छायाचित्रे आणि व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित करणे. सर्वांत प्रथम बातम्या देणार्‍या वाहिन्यांची ही सवय सर्वसामान्य लोकांनाही लागली आहे, जी सामाजिकदृष्ट्या आणि वैयक्तिक जीवनातही ‘अत्यंत वाईट’ ठरली आहे. स्वतःची मान्यवरांसमवेत छायाचित्रे घेण्यापर्यंत ठीक असलेली ही सवय संवेदनशील घटनांच्या वेळी अत्यंत अयोग्य पद्धतीने समोर येते, जी सामाजिक मानसिकतेची चुकीची दिशा दर्शवते. भ्रमणभाष आणि सामाजिक माध्यमे ही विज्ञानाच्या प्रगतीची उदाहरणे; परंतु तीच मानवाच्या असंवेदनशीलतेला कशी कारणीभूत ठरतात ? विमान अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित काही लोकांच्या असंवेदनशीलतेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात विमान अपघातात मृत झालेल्या एका महिलेचे शीर पडलेल्या ठिकाणी अनेकांनी घोळका केल्याचे दिसते. हा केवळ घोळका नसून लोक त्या मानवी अवयवासह ‘सेल्फी’ घेत होते. लोकांच्या ‘मृत’ भावना आणि असंवेदनशीलता यांचे हे जिवंत उदाहरण ! अत्यंत दुःखदायक प्रसंगात हे लोक असंवेदनशीलतेने वागत असतील, तर भविष्यात देशात युद्धजन्य परिस्थितीत ते कसे वागतील ? याची कल्पना करता येईल.

वैज्ञानिक प्रगती मानवाला संवेदनशील बनवण्यात अयशस्वी ठरली असून संवेदनशीलतेसाठी मानवाला हिंदु धर्मशास्त्र मानण्यावाचून पर्याय नाही !