श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे माजी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करा !

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे निवेदन निवासी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना महासंघाचे कार्यकर्ते

सोलापूर, १२ जून (वार्ता.)  – ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती’चे माजी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या कार्यकाळात विविध प्रकारच्या गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. ११ जून या दिवशी बालाजी पुदलवाड यांनी काही लोकांना बळजोरीने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ‘व्हीआयपी’ (विशेष महत्त्वाच्या व्यक्ती) प्रवेश देण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी रोखल्यावर त्यांनी अरेरावी केली आणि गोंधळ घातला. मंदिरातील देणग्यांची पावती पुस्तके बेपत्ता झाली असून त्यातून लाखो रुपयांचा हिशोब अपुरा आहे. तरी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे माजी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या संदर्भातील आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनियमिततेविषयी उच्चस्तरीय चौकशी करावी, या मागणीचे निवेदन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे यांनी स्वीकारले. या प्रसंगी जुने विठ्ठल मंदिराचे विश्वस्त श्री. शैलेंद्र जोशी, मल्लिकार्जुन मंदिराचे विश्वस्त श्री. दिलीप पाटील, चौडेश्वरी मंदिराचे पुजारी श्री. गोवर्धन म्याकल, हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश पांढरे आणि श्री. दत्तात्रय पिसे उपस्थित होते.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बालाजी पुदलवाड पंढरपूर येथील मंदिरात व्यवस्थापक असतांना विधानसभेत सादर झालेला लेखापरीक्षण अहवाल – वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ यात अनेक आर्थिक तफावत, बेकायदेशीर खर्च आणि नियमनविरुद्ध खरेदी प्रक्रियेचे उल्लेख आहेत. त्यांच्या कार्यकाळात वैयक्तिक संपत्तीमध्ये प्रचंड वाढ झाली असून उत्पन्नाच्या कायदेशीर स्रोतांशी तिचा मेळ बसत नाही. यासंदर्भात स्थानिकांनी लेखी स्वरूपात तक्रारी केल्या आहेत.

निवेदनात करण्यात आलेल्या काही मागण्या

१. वरील सर्व प्रकारांसंदर्भात उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात यावी.

२. वित्तीय आणि संपत्ती संबंधित घोटाळ्यांची चौकशी ‘ईडी’ आणि ‘सीआयडी’ (राज्य गुन्हा अन्वेषण) यांच्याकडून करण्यात यावी.

३. बालाजी पुदलवाड यांना भविष्यात कोणत्याही सार्वजनिक धार्मिक संस्थेमध्ये पदावर नेमू नये, यासाठी शासनाने निर्णय घ्यावा.