हिंदुत्वनिष्ठांसाठी आधारस्तंभ असलेले रणझुंजार अधिवक्ता संजीव पुनाळेकर !

समाजात अशी काही व्यक्तीमत्त्व असतात की, त्यांच्याशी केलेल्या संवादाने, सहवासाने उत्साह येतो, आत्मविश्वास वाढतो. अशाच पैकी एक म्हणजे हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव आणि मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर होय. त्यांना ‘रणझुंजार’ ही उपमा अतिशय यथायोग्य लागू आहे. रोखठोक आणि निर्भीडपणे मत व्यक्त करणे, हा त्यांचा स्वभाव गुणधर्म आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे एक प्रथितयश अधिवक्ता असूनही सर्वसामान्यांशी आपुलकीने संवाद साधणे, अडचणी समजून घेऊन त्यांना साहाय्य करणे हा त्यांचा अंगभूत चांगूलपणा आहे. या सामाजिक कार्यासमवेत ‘हिंदुत्वनिष्ठांचे अधिवक्ता’ हा समाजात त्यांचा खरा नावलौकिक म्हणता येईल. प्रवाहासमवेत जाणारे अनेक असतात; परंतु काँग्रेस सरकारच्या काळात ज्या वेळी ‘हिंदु आतंकवाद’ हा फेक नेरेटिव्ह निर्माण करण्यासाठी षंड्यंत्रे करण्यात आली आणि अनेक हिंदुत्वनिष्ठांना त्यामध्ये नाहक गोवण्यात आले. त्या वेळी या षंड्यंत्राच्या विरोधात सर्वप्रथम कुणी दंड थोपटणार्‍यांमध्ये अधिवक्ता संजीव पुनाळेकर आघाडीवर होते. या संकटाच्या काळात हिंदुत्वनिष्ठांची ढाल बनून त्यांनी न्यायालयात कायदेशीर लढा दिला. हिंदु आतंकवादाच्या फेक नेरेटिव्हमध्ये अडकवून अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना कारागृहात टाकण्यात आले. तरीही न डगमगता त्यांनी ‘अधिवक्ता’ म्हणून धर्मकार्यातील योगदान थांबवले नाही. मालेगाव बाँबस्फोट प्रकरण, मडगाव बाँबस्फोट प्रकरण, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण, नालासोपारा स्फोटक प्रकरण आदी अनेक खटल्यांमध्ये संजीव पुनाळेकर यांनी हिंदुत्वनिष्ठांना विनामूल्य साहाय्य केले. हिंदुत्वनिष्ठ आरोपींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सत्य बाजू त्यांनी समाजात ठामपणे मांडली. अशा प्रकारे नि:स्वार्थ भावनेने हिंदुत्वासाठी लढा देणारे हे ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ समस्त धर्मप्रेमींसाठी प्रेरणादायी आहेत !.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर

विशेष सदर


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वाेच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. असे अधिवक्ता कुठे शोधून तरी सापडतील का ?

मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी शाम साहू यांचे ज्येष्ठ बंधू न्यायालयात त्यांना भेटायला आले असतांना सुनावणीच्या वेळी हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. त्या वेळी शाम साहू यांना भावाच्या अंतिम संस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी इंदूर येथे जायचे होते. आरोपी असल्यामुळे त्यांना पोलीस संरक्षणात जावे लागणार होते आणि त्यासाठी लाखो रुपयांचा व्यय होणार होता. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी त्यावेळी त्वरित पोलीस संरक्षणासाठीची रक्कम जमा केली. त्यामुळे शाम साहू यांना भावाच्या अंत्यसंस्कारासाठी इंदूर येथे जाता आले.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर

अशाच प्रकारे मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी यांचे अधिवक्ता म्हणून तब्बल १७ वर्षे विनामूल्य काम पाहिले. एवढेच नाही तर या काळात अधिवक्ता सुधाकर चतुर्वेदी यांच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्यही केले. ज्या वेळी सुधाकर चतुर्वेदी यांना जामीन संमत झाला त्या वेळी पैशामुळे ते कारागृहात राहू नयेत, यासाठी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी जामिनाची ५ लाख रुपये रक्कम भरली. अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठ आरोपींसाठी विनामूल्य खटला लढवला असे नाही, तर चौकटीच्या बाहेर जाऊन स्वत:चे कुटुंबीय असल्याप्रमाणे त्यांना वेळोवेळी आर्थिक साहाय्यही केले. अशी अनेक उदाहरणे देता येतील. अशा प्रकारे ‘ना ओळख, ना पाळख’, असूनही केवळ हिंदुत्वासाठी योगदान दिले म्हणून या आरोपींचा खटला लढवणारे आणि त्यांना आत्मियतेने साहाय्यही करणारे अधिवक्ता कुठे शोधून तरी सापडतील का ?

अधिवक्ता संजीव पुनाळेकर (उजवीकडे) यांचा ‘सनातन धर्मश्री’ पुरस्काराने सन्मान करताना सद्गुरु अनुराधा वाडेकर

हे ही वाचा →

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मान !

२. वडिलांच्या अस्थी विसर्जित करून हिंदुत्वनिष्ठांच्या खटल्यासाठी न्यायालयात उपस्थित रहाणे !

नालासोपारा प्रकरणामध्ये श्री. शरद कळसकर यांना महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने श्री. वैभव राऊत यांच्यासमवेत अटक केले, त्या वेळी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचे वडील अत्यवस्थ होते. या काळातच रुग्णालयात त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. दुसर्‍या दिवशी नालासोपारा प्रकरणातील आरोपींना न्यायालयात उपस्थित करण्यात येणार होते. वडिलांचा अंत्यविधी पार पाडून अधिवक्ता संजीव पुनाळेकर  दुसर्‍या दिवशी न्यायालयात जाण्यास सज्ज झाले. या वेळी प्रथम स्मशानात जाऊन त्यांनी वडिलांच्या अस्थी घेतल्या आणि न्यायालयात जातांना वडिलांच्या अस्थी समुद्रात विसर्जित करून हिंदुत्वनिष्ठांचा खटला लढवण्यासाठी ते न्यायालयात उपस्थित राहिले. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची कर्तव्यदक्षता समस्त हिंदुत्वनिष्ठांसाठी प्रेरणादायी आहे.

३. ‘हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍यांच्या हातून चूक झाली असली, तरी खटला लढवेन’, असे ठामपणे सांगणारे निर्भीड अधिवक्ता !

अधिवक्ता संजीव पुनाळेकर

सध्याच्या व्यावसायिक काळात अधिवक्ता म्हणून काम करतांना प्रथम आर्थिक गणिते पाहिले जातात. त्यामुळे कुणाचा खटला विनामूल्य लढवणे तर दूरचीच गोष्ट आहे. त्यात काँग्रेसच्या काळात ‘हिंदु आतंकवादी’ ठरवण्यासाठी भयानक षंड्यंत्रे करून हिंदुत्वनिष्ठांना विविध प्रकरणांमध्ये अडकवण्यात आले. या कठीण काळात हिंदुत्वनिष्ठांच्या साहाय्यासाठी पुढे येण्यासाठी काही हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनाही कचरत होत्या. अशा वेळी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी हिंदुत्वनिष्ठांचे खटले स्वीकारून त्यांना सर्वाेतोपरी साहाय्य केले. ‘हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍यांच्या हातून जरी चूक झाली असली, तरी त्यांनी कृत्य हिंदुत्वासाठी केले आहे; म्हणून मी त्यांचा खटला अवश्य लढवेन’, असे ठामपणे सांगणारे म्हणजे हिंदुत्वाच्या बाजूने पाय रोवून रहाणारे संजीव पुनाळेकर यांच्या सारखे हिंदुत्वनिष्ठ हीच हिंदुत्वाची शक्ती आहे.

🚩हिंदुत्वाचा बुलंद आवाज !🚩

आंदोलनाच्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना अधिवक्ता संजीव पुनाळेकर

‘हिंदु आतंकवाद’ या षड्यंत्राचा भाग म्हणून काँग्रेसच्या काही नेत्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सनातन संस्थेला गोवण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये काही हिंदुत्वनिष्ठांना अडकवण्याचा प्रयत्न केला. या वेळी समाजात संभ्रमाचे वातावरण होते. काँग्रेस, पुरोगामी मंडळींचे खोटेनाटे आरोप आणि ‘मिडिया ट्रायल’ या सर्वांनी एकत्रित भडिमार करून सनातन संस्थेला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न केला. समाजात सनातन संस्थेला अपकीर्त करण्याचे सर्वाेतोपरी प्रयत्न चालू होते. अशा वेळी अधिवक्ता संजीव पुनाळेकर  हिंदुत्वाचा बुलंद आवाज बनून सर्व हिंदुद्वेष्ट्यांना पुरून उरले. विविध वृत्तवाहिन्यांवर हिंदुत्वनिष्ठाची बाजू त्यांनी मांडली. ही वेळ अशी होती की हिंदुत्वनिष्ठही संभ्रमित होते. कालांतराने हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधातील या षंड्यंत्राची पोलखोल झाली; परंतु अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांसारख्या अधिवक्त्यांचे या संकटकाळातील योगदान मोलाचे ठरले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या षंड्यंत्रामध्ये नाहक गोवलेल्या हिंदुत्वनिष्ठांचे कुटुंबीय खचून गेले होते. त्यांना श्री. संजीव पुनाळेकर यांच्यासारख्या अधिवक्त्यांमुळे धीर मिळाला. हे योगदान मोलाचे होते.

४. अधिवक्ता पुनाळेकर यांच्या प्रयत्नांमुळे धर्मादाय रुग्णालयांत गोरगरिबांना योजनेचा परिणामकारकपणे लाभ होणे !

वर्ष २००४ मध्ये अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचे वडील गजानन पुनाळेकर यांना प्रकृती अस्वस्थामुळे मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. या काळात अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची आर्थिक स्थिती बेताची होती. या वेळी धर्मादाय रुग्णालयात विनामूल्य उपचाराविषयी त्यांनी माहिती विचारली असता त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, तसेच याविषयीची माहिती देण्यासाठीही कुणी उत्तरदायी व्यक्ती तेथे नव्हती. या प्रकारानंतर अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी जसलोक रुग्णालयासह अन्य ४ रुग्णालयांना पत्र पाठवून गरीब रुग्णालयांसाठी असलेल्या विनामूल्य आणि सवलतीच्या दरातील उपचारांविषयीची माहिती मागितली; मात्र त्यांच्या पत्रांना उत्तरे देण्यात आली नाहीत. सरकारकडून आर्थिक लाभ प्राप्त करूनही धर्मादाय रुग्णालये गरिबांना विनामूल्य आणि सवलतीच्या दरात उपचार देत नसल्याचा गंभीर प्रकार लक्षात आल्यावर या उपचारांविषयीचे दिशादर्शन निश्चित करण्यासाठी योजना सिद्ध करण्यात यावी, यासाठी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली. या याचिकेवरून न्यायालयाने गरीब आणि निर्धन रुग्णालयांच्या उपचारांसाठी धर्मादाय रुग्णालयांना रुग्णांकडून प्राप्त एकूण मिळकतीच्या २ टक्के निधी जमा करण्याची योजना निश्चित केली. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब रुग्णांना या योजनेचा लाभ होत आहे.

५. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून अधिवक्त्यांचे संघटन !

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी हिंदुत्वनिष्ठांसाठी केवळ न्यायालयीन लढा दिला असे नाही, तर हिंदुत्वासाठी योगदान देणारे आणखी अधिवक्ता निर्माण व्हावेत, यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अधिवक्त्यांचे प्रभावी संघटन केले. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून अधिवक्त्यांच्या शिबिरांमध्ये त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील विविध राज्यांतील अधिवक्ता हिंदुत्वाच्या कार्याशी जोडले गेले.

सद्यस्थितीत अनेक अधिवक्ता विविध राज्यांत, विविध संघटनांमध्ये कार्यरत असूनही हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून अनेक खटले विनामूल्य लढवत आहेत. अधिवक्त्यांच्या संघटन कार्यात अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचे योगदान मोलाचे ठरले.

६. अनेक गुणांचा समुच्चय !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्री. संजीव पुनाळेकर हे जरी एक निष्णात अधिवक्ता असले, तरी प्रथम ते एक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता आहेत. त्यामुळेच हिंदुत्वाच्या कार्यासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. प्रभावी वक्तृत्व, नेतृत्व, समाजातील व्यक्तींना कार्याशी जोडून घेण्याची हातोटी, अभ्यासूवृत्ती, कष्ट घेण्याची सिद्धता, क्षात्रवृत्ती, निर्भीडपणा, स्पष्टवक्तेपणा, उत्साही, कार्याचा ध्यास, अन्यांना साहाय्य करण्याची वृत्ती आणि या सर्वांसह निरपेक्ष प्रेम करण्याची वृत्ती अशा अनेक गुणांचा समुच्चय अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्यामध्ये आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी एकदा अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्याविषयी ‘कार्य करण्यासाठीचे आवश्यक गुण त्यांच्या तळमळीमुळे ईश्वर देतो’, असे उद्गार काढले होते.

हिंदु आतंकवादाच्या फेक नेरेटिव्हमध्ये अडकवून अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना कारागृहात टाकण्यात आले !

७. हिंदुत्वाच्या कार्यासह साधना करणारे अधिवक्ता !

अधिवक्ता संजीव पुनाळेकर

हिंदुत्वाचे कार्य प्रभावीपणे करण्यासाठी आध्यात्मिक सामर्थ्य आवश्यक आहे, हे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी जाणले आणि अनुभवलेही आहे. त्यामुळे नियमितच्या व्यस्त दिनचर्येतही ते साधनेला वेळ देतात आणि अन्यांनाही साधनेचे महत्त्व सांगतात. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येमध्ये आरोपींना साहाय्य केल्याप्रकरणी गोवून अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना कारागृहात टाकण्यात आले. ते ४२ दिवस कारागृहात होते; मात्र या काळातही त्यांनी अखंडपणे नामसाधना चालू होती.

पत्नीचा खंबीर पाठींबा हा पतीच्या समष्टी कार्याच्या यशामध्ये मोलाचा असतो.  त्याचे श्रेय अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या पत्नी सौ. अनिता यांचे आहे. गिरणी कामगारांचा नेता ते एक यशस्वी अधिवक्ता असा अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा जीवनप्रवास अतिशय संघर्षमय राहिला. समाज, राष्ट्र आणि धर्म या सर्वच क्षेत्रांतील अन्यायाच्या विरोधात त्यांनी एका कर्तव्यदक्ष अधिवक्त्याप्रमाणे आवाज उठवला अन् त्यासाठी संघर्षही केला. त्यांचे हे राष्ट्र आणि धर्म कार्यातील योगदान हिंदुत्वनिष्ठांसाठी प्रेरणादायी आहे.

🪷हिंदुत्वाचे शिलेदार या सदरामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मान्यवरांची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा !🪷