निवडणुकीनंतर अडगळीत पडलेल्या महिला माझ्याकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र मागत आहेत !

  • सौ. रुपाली चाकणकरांचे विरोधकांना प्रत्युत्तर !

  • वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सौ. रूपाली चाकणकर यांच्या त्यागपत्राची मागणी करण्यात आली होती !

सौ. रुपाली चाकणकर

पुणे – माझे प्रदेशाध्यक्ष पद आणि महिला आयोगाचे अध्यक्षपद याविषयी महाविकास आघाडीवाले टीका करत आहेत. त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, मला महिला आयोगाचे अध्यक्षपद हे महाविकास आघाडी सरकार असतांना मिळाले आहे. या आधी ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या त्याही एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा होत्या. ज्या महिला निवडणुकीनंतर बाजूला पडल्या आहेत, त्यांना कुणी विचारत नाही, अशा महिला माझ्यावर टीका करत आहेत; कारण त्यांना माहिती आहे की, आयोगावर टीका केली की प्रसिद्धी मिळते, असे सौ. रूपाली चाकणकर यांनी म्हटले. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरून राज्य महिला आयोगाला विरोधकांकडून सातत्याने लक्ष्य केले जात आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा

सौ. रूपाली चाकणकर यांच्या त्यागपत्राची मागणीही होत आहे. या पार्श्वभूमीवर सौ.रूपाली चाकणकर यांनी ३ जूनला प्रसारमाध्यमांशी बोलतांना विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

सौ. चाकणकर यांनी सांगितले की, फुके प्रकरणातील महिलेचे पत्र मला मिळाले नाही. आमच्याकडे टपालाच्या माध्यमातून तक्रार घेण्याची सोय आहे. आयोगाचा क्रमांक बंद आहे, ही चुकीची बातमी आहे. आयोगाची दूरध्वनी सेवा कार्यालयीन वेळेत चालू असते. आयोगाचा नावलौकीक मोठा आहे. त्यांच्या काही सूचना असतील, तर मला पाठवाव्यात. फक्त प्रसिद्धीसाठी टीका करू नये. मी राज्य महिला आयोगाची आठवी अध्यक्ष आहे.