गोव्यात मौसमी पावसाचे आगमन

पणजी – मौसमी पाऊस (मॉन्सून) केरळमध्ये ४ जूनला पोचला. त्यानंतर तो ७ जूनपर्यंत गोव्यात पोचणार असे वाटत असतांनाच अनुकूल वातावरणामुळे केरळमधून केवळ एका दिवसात मॉन्सून गोव्यातील काही भागांत पोचल्याचे हवामान खात्याने घोषित केले आहे. हवामान खात्याने राज्यात १० जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ताशी ४० ते ५० कि.मी. वेगाने, तसेच काही ठिकाणी ताशी ६० कि.मी. वेगापर्यंत वारे वहाण्याची शक्यता वर्तवली आहे. अरबी समुद्र खवळलेला असल्याने हवामान खात्याने मासेमारांना १० जूनपर्यंत गोव्याच्या किनारपट्टीलगत आणि समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा सल्ला दिला आहे. ५ जूनला सकाळी ८.३० वाजेपर्यंत त्या आधीच्या २४ घंट्यांत राज्यात काणकोण येथे ६० मि.मी., तर मडगाव येथे २१ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. ५ जूनला सायंकाळी काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडला.