Rajnath Singh Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये नारीशक्तीचे महत्त्वपूर्ण योगदान ! – राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

लेफ्टनंट कमांडर दिल्ला के. आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए. यांच्यासोबत राजनाथ सिंह

पणजी, २९ मे (वार्ता.) – ‘भारताने नुकतेच ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथे आतंकवाद्यांच्या विरोधात प्रभावी कारवाई केली. या कारवाईमध्ये महिला वैमानिक आणि इतर महिला सैनिक यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. गोव्यात २९ मे या दिवशी सायंकाळी झालेल्या ‘आय.एन्.एस्.व्ही. तारिणी’च्या नाविक सागर परिक्रमा समारोप समारंभप्रसंगी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘जेव्हापासून सैन्यदलामध्ये महिलांची भागीदारी वाढली आहे, तेव्हापासून महिलांनी पुष्कळ चांगले योगदान देऊन त्यांचे दायित्व प्रभावीपणे पार पाडले आहे. सियाचिनच्या पर्वतरांगांवरील उंच भागापासून महासागरातील खोलापर्यंत भारतीय महिला अनेक दायित्व सांभाळत आहेत आणि यामुळे भारताची संरक्षण क्षमता अधिकच वृद्धींगत झाली आहे. आज सैनिकी शाळांची द्वारे महिलांसाठी खुली आहेत आणि चालू मासात ‘नॅशनल डिफेन्स अकादमी’मधून १७ महिला उत्तीर्ण होणार आहेत.’’

प्रारंभी ८ मासांच्या ऐतिहासिक समुद्र प्रवासानंतर लेफ्टनंट कमांडर दिल्ला के. आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए. या नौसैनिकांचे गोव्यात आगमन झाले. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या दोन्ही महिला नौसैनिकांचे स्वागत केले आणि त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. भारतीय नौदलाच्या या २ महिला अधिकार्‍यांनी ८ मासांमध्ये ४ खंडांत एकूण २५ सहस्र ४०० नॉटिकल मैलांचा प्रवास पूर्ण केला आहे. यामध्ये ३ महासागरांच्या प्रवासाचा समावेश आहे. या द्वयींनी या प्रवासामध्ये ‘फ्रेमेंटल’, ’लिटेल्टन’, ‘पोर्ट स्टॅनली’ आणि ‘केपटाऊन’ या बंदरांनाही भेटी दिल्या आहेत.