जुलाब (पातळ संडास) होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय

‘जुलाब म्हणजे वारंवार पातळ संडासला होणे. जुलाब ही एक साधारण शारीरिक समस्या आहे.

१. जुलाब होण्याची कारणे 

१ अ. संक्रमण : जीवाणू (बॅक्टेरिया), विषाणू आणि परजीवी ही पोटाच्या संक्रमणाची काही प्राथमिक कारणे आहेत. त्यांचे ३ प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

डॉ. दीपक जोशी

१ अ १. जीवाणू संक्रमण : यामध्ये अन्नपदार्थातून संक्रमण आणि अन्नातून झालेली विषबाधा यांचा समावेश होतो. या प्रकारच्या संसर्गास कारणीभूत असलेले पदार्थ, म्हणजे दूषित पाणी, अल्प शिजवलेले किंवा कच्चे मांस, अंडी, कोंबडी, न धुतलेली फळे आणि भाज्या इत्यादी.

१ अ २. संसर्गजन्य संक्रमण : हे मुख्यत्वे ‘रोटा’ अन् ‘नोरो’ या विषाणूंमुळे होते. ‘गॅस्ट्रोएन्टेरिटिस’ (जठर आणि आतडे यांचा दाह) हे त्याचे लक्षण आहे.

१ अ ३. परजीवी संसर्ग : सामान्य परजीवी संसर्ग, म्हणजे कृमी (जंत) संक्रमण. आतड्यांसंबंधी संक्रमण हे ‘हेल्मिंथ’ आणि ‘प्रोटोझोआ’ या परजीवी कृमींमुळे होते, तसेच दूषित पाण्यात पोहल्यामुळे किंवा त्याचे सेवन केल्यामुळे ‘क्रिप्टोस्पोरिडिओसिस’ आणि ‘जिआर्डिआसिस’ हे परजीवी आतड्यात प्रवेश करू शकतात.

१ आ. प्रतिजैविकांचे (‘अँटीबायोटिक्स’चे) सेवन करणे

१ इ. आतड्यांच्या समस्या

१ ई. एखाद्या खाद्यपदार्थाची ॲलर्जी

२. जुलाबाची लक्षणे

अ. वारंवार शौचाला जाण्याची इच्छा होणे

आ. पोटदुखी आणि मळमळ होऊन उलटीसारखे होणे

इ. अंग गरम वाटणे

ई. शरिरातील पाणी न्यून होऊन थकवा येणे

३. जुलाबावरील उपाय

अ. जुलाब होत असतील, तर सर्वांत पहिला उपाय, म्हणजे शरिरातील पाणी आणि खनिजे (‘पोटॅशियम’ आणि ‘सोडियम’ यांनाही खनिजे म्हणतात.) भरून काढण्यासाठी प्रत्येक १० मिनिटांनी ‘ओ.आर्.एस्.’ (टीप) घेत रहावे. ‘ओ.आर्.एस्.’ नसल्यास एक पेला (२०० मि.लि.) पाणी घेऊन त्यात २ चमचे (४ – ५ ग्रॅम) साखर आणि १ – २ चिमूट मीठ घालून हलवावे अन् ते पाणी प्रत्येक ५ ते १० मिनिटांनी २ – २ घोट पीत रहावे. असे केल्यामुळे शरिरातील पाणी न्यून होण्याचा धोका टळतो आणि थकवाही न्यून होतो.

टीप : ‘ओरल रिहायड्रेशन सोल्युशन’ : हे साखर, क्षार आणि पाणी यांचे मिश्रण असते.

आ. गुळाचा कोरा (दुध नसलेला) चहा करून प्यावा. त्यानंतर २० – ३० मिनिटांनी जुलाब न थांबल्यास पुन्हा एकदा गुळाचा कोरा चहा प्यावा.

इ. वरील दोन्ही उपाय करूनही जुलाब न थांबल्यास १ वाटी गरम भात घेऊन त्यावर १ चमचा तूप आणि चवीनुसार १ – २ चिमूट मीठ घेऊन तो भात चावून चावून खावा. नंतर त्यावर २० मिनिटे पाणी पिऊ नये. असे केल्याने जुलाब तात्काळ थांबतात.

ई. जुलाबासह उलटी होत असेल, तर एक छोटा गुळाचा तुकडा तोंडात धरून ठेवावा आणि तो हळूहळू चघळत रहावा.

उ. जुलाब थांबल्यावर १ – २ दिवस पचायला हलका आहार घ्यावा, उदा. तूप-मीठ-भात, मुगाची खिचडी किंवा भाजीचे सूप.

४. जुलाब झाल्यास वैद्यांकडे कधी जावे ?

अ. जुलाब १ – २ दिवसांपेक्षा अधिक दिवस होत असल्यास किंवा जुलाबाची मात्रा, म्हणजे पाणी अधिक जात असल्यास २ दिवस वाट न बघता तात्काळ वैद्यांकडे जावे.

आ. जुलाबातून चिकट द्रव किंवा रक्त पडणे

इ. पोटात पुष्कळ दुखणे, अंगात ताप असणे आणि शरिरातील पाणी न्यून होत असणे

ई. जुलाबांमुळे थकवा येणे आणि घरगुती उपचार करूनही जुलाब न थांबणे.’

– डॉ. दीपक जोशी, निसर्गाेपचार तज्ञ (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स), देवद, पनवेल. (१८.२.२०२५)