देशविघातक कलाकार !

सलमान खान, शाहरूख खान, अमीर खान आणि रणवीर अलाहाबादिया

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी मोठे आक्रमण केल्यावर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत भारताने पाकिस्तानवर हवाई आक्रमण करून आतंकवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले. संपूर्ण देशात हीच चर्चा होती. काही दिवस युद्ध चालू असतांना हिंदी चित्रपटसृष्टीमधील बहुतांश कलाकारांनी भारतीय सैन्याचे कौतुक करून त्यांना ‘सलाम’ केला, तसेच भारताविषयी प्रेम व्यक्त केले आहे. प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांसारख्या कलाकारांनी मात्र २० दिवस यावर मौन बाळगले होते. अनुमाने २० दिवस फक्त रिकाम्या क्रमांकाचे लिखाण प्रसारित केल्यानंतर त्यांनी एक भावनिक आणि देशभक्तीपर लिखाण केले. या लिखाणामध्ये त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने पाकिस्तान आणि ‘पीओके’मधील आतंकवादी तळांवर केलेल्या आक्रमणांचे कौतुक केले आहे.

अभिनेते सलमान खान यांनी सामाजिक माध्यमावर भारत आणि पाक युद्धबंदीविषयी दिलासा व्यक्त केला. त्याने ट्वीट केले होते, ‘युद्धविरामासाठी देवाचे आभार’; मात्र त्याच्यावर टीका होऊ लागल्यावर सलमान यांनी काही वेळातच ट्वीट काढले. सलमानचे हे ट्वीट अनेकांना अजिबात आवडले नाही. अनेक लोक इतके संतापले की, त्यांनी सलमान खानवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. पहलगाम आक्रमणाविषयी सलमान खानने निषेधात्मक प्रतिक्रिया दिली होती; मात्र अभिनेते शाहरूख खान आणि अमीर खान मात्र गप्प होते. भारतावरील आक्रमण, युद्ध, युद्धबंदी या सर्व काळात अभिनेते अमीर खान, शाहरूख खान यांनी मात्र काहीच अभिप्राय दिला नाही. यावरून या कलाकारांच्या निष्ठेविषयी संशय घेण्यास निश्चित जागा रहाते. भारत-पाक युद्ध चालू झाल्यावर खान मंडळी गप्प होती. समजा पहलगाम येथे २६ मुसलमान ठार झाले असते, तर त्या वेळी याच खान मंडळींनी नक्कीच शोक व्यक्त केला असता. त्यामुळे कोण कलाकार आपला देश, आपले सैनिक, सैन्य यांच्यावर प्रेम करतो आणि कोण करत नाही, हे लोकांनी समजून घेऊन अशा कलाकारांचे चित्रपट पहायचे का ? त्यांना प्रतिसाद द्यायचा का ? हे भारतियांना ठरवावे लागेल; जेणेकरून त्यांना त्याची कायमस्वरूपी जाणीव होईल.

दुसरीकडे वादग्रस्त कलाकार रणवीर अलाहाबादिया याने पुन्हा एकदा पाकिस्तानी लोकांची क्षमा मागितल्याविषयी त्याला आता लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. रणवीरला त्याची चूक लक्षात आल्यानंतर त्याने केलेले लिखाण काढले आहे. त्यामुळे रणवीरच्या कार्यक्रमांवरही लोकांनी बहिष्कार घातला पाहिजे; कारण अशा कलाकारांच्या कार्यक्रमांना जाऊन त्यांना मोठे करणे, ही लोकांचीच मोठी चूक असते. जे देशाशी इमान राखू शकत नाही, अशा कलाकारांना मोठे करणे, म्हणजे देशविरोधकांना पाठिंबा देण्यासारखे आहे. त्यामुळे अशा कलाकारांना मोठे करायचे का ? हे जनतेने ठरवावे लागेल !

–  श्री. सचिन कौलकर, सांगली.