म्हादई जलवाटप तंटा
‘आर्.जी.’ पक्षाची राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या (एन्.आय.ओ. च्या) कार्यालयासमोर निदर्शनाद्वारे मागणी

पणजी, १५ मे (वार्ता.) – दोनापावला येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या ३ शास्त्रज्ञांनी ‘म्हादईचे पाणी वळवल्यास त्याचा गोव्यावर परिणाम होणार नाही’, असा अहवाल दिला आहे. या अहवालाचा राज्यभरातील विविध संघटनांकडून निषेध केला जात आहे. ‘रिव्होल्युशनरी गोवन्स’ (आर्.जी.) पक्षाच्या वतीने ‘टुगेदर फॉर म्हादई मूव्हमेंट’च्या (म्हादईसाठी संघटित लढा) वतीने दोनापावला येथे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या कार्यालयासमोर १५ मे या दिवशी निदर्शने करण्यात आली. ‘संस्थेला हा अहवाल कुणी सिद्ध करायला सांगितला ?’ याविषयी संस्थेने पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करावे’, अशी मागणी करण्यात आली. निदर्शनाला ‘आर्.जी.’चे अध्यक्ष मनोज परब, आमदार वीरेश बोरकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
मनोज परब पुढे यांनी या वेळी केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून दबाव आल्याने राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने हा अहवाल सिद्ध केल्याचा आरोप केला. आमदार वीरेश बोरकर यांनी म्हादईविषयी आता गावागावांत जागृती करणार असल्याचे म्हटले.
कर्नाटकचे म्हादईचे पाणी वळवल्यास गोव्याला हानीच होणार ! – राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी
पणजी – समुद्र विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी म्हादई संदर्भात जो अहवाल दिला आहे, त्या तिन्ही शास्त्रज्ञांनी म्हादई खोर्यात, विशेषत: कळसा-भंडुरा प्रकल्पाच्या संदर्भात जी पर्जन्यवृष्टीविषयक आकडेवारी उपलब्ध आहे, त्याचा उपयोग करून निष्कर्ष काढले आहेत; मात्र हे निष्कर्ष वास्तव्याला धरून नाहीत, असे मत पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केले आहे.
राजेंद्र केरकर पुढे म्हणाले, ‘‘शास्त्रज्ञांनी वर्ष २०१८ मध्ये म्हादई जल लवादाने दिलेल्या निवाड्याला आधारभूत मानले आहे. म्हादई पाण्यावर तेथील सर्वसामान्य लोक आणि जैविक संपदा यांच्या घटकांचे जीवनमान अवलंबून आहे. शास्त्रज्ञांनी त्यांच्या अहवालात याला अल्प महत्त्व दिले आहे. खानापूर नजीकच्या निरसे ग्रामस्थांनी म्हादईच्या पाट, सिंगूर आणि मडुरा या ३ उपनाल्यांचे पाणी जर कर्नाटकमधील मलप्रभा नदीत वळवले, तरी म्हादईच्या एकंदरीत जलसंपदेवर त्याचा दुष्परिणाम होणार आहे.’’