माहिती अधिकार अंतर्गत मिळालेली माहिती
समुद्रकिनार्यांवरील पार्ट्या हा मुख्य स्रोत !

पणजी, ७ जून (वार्ता.) – गोव्यात ९० दिवसांमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणार्या ४९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे. ‘हेराल्ड’ या इंग्रजी वृत्तपत्राचे पत्रकार ऑगुस्टो रॉड्रिग्स यांनी माहिती अधिकाराखाली केलेल्या अर्जाला मिळालेल्या उत्तराद्वारे ही माहिती मिळाली आहे. १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत हे मृत्यू झाल्याची माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘न्यायवैद्यकशास्त्र आणि विषविज्ञान’ खात्याने माहिती अधिकाराखाली दिली आहे. या आकडेवारीमुळे राज्यातील ‘पार्टी’वर (मेजवानीवर) आधारित अर्थव्यवस्थेची एक प्राणघातक आणि काळी बाजू पुन्हा एकदा उघडकीस आली आहे, तसेच अमली पदार्थ, वैद्यकीय ‘प्रिस्क्रिप्शन’वरील औषधे आणि मद्य यांचे विषारी मिश्रण हीपण सध्या एक चिंतेची गोष्ट ठरली आहे.
१. चालू वर्षात पहिल्या ३ मासांतील हे मृत्यू गोव्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद झालेले आहेत. हा मृत्यूचा आकडा म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ, अमली पदार्थासंबंधी अन्वेषण करणारे अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांना धोक्याची घंटा वाटत आहे. मृत्यू आणि रात्री उशिरा चालणार्या पार्ट्या यांचा थेट संबंध असल्याची अधिकृत माहिती उपलब्ध नसली, तरी पोलिसांकडून मिळालेली माहिती, आपत्कालीन यंत्रणेकडे नोंद झालेल्या तक्रारी आणि न्यायवैद्यक निष्कर्ष यांमधून हे निष्कर्ष निघत आहेत.

२. माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार ३० जानेवारी या एकाच दिवशी ६ पोलीस ठाण्यांमध्ये झालेले ६ मृत्यू अमली पदार्थाशी निगडित आहेत. या ६ मधील २ मृत्यू हे हणजूण पोलीस ठाण्याशी निगडित आहेत. या ठिकाणी मृत्यू झालेल्या दिवसाच्या आदल्या रात्री (२९ जानेवारीच्या रात्री) १० वाजता वागातोर येथे अनेक ठिकाणी ध्वनीप्रदूषण होत असल्याच्या तक्रारी आपत्कालीन यंत्रणेकडे नोंदवण्यात आल्या होत्या.
३. ११ जानेवारी या दिवशी आगशी पोलीस ठाणे आणि फोंडा पोलीस ठाणे येथे प्रत्येक एक मृत्यूची नोंद झालेली आहे. या प्रकरणी १० जानेवारीच्या रात्री वागातोर येथे ध्वनीप्रदूषणासंबंधी २ तक्रारी आपत्कालीन यंत्रणेकडे नोंद झालेल्या आहेत. १० फेब्रुवारीला २ मृत्यू आणि ९ फेब्रुवारीच्या रात्री हणजूण येथे ध्वनीप्रदूषणासंबंधी १ तक्रार; ११ फेब्रुवारीला ४ मृत्यू अन् आदल्या रात्री हणजूण येथे ध्वनीप्रदूषणासंबंधी १ तक्रार, २० फेब्रुवारीला ३ मृत्यू आणि ध्वनीप्रदूषणासंबंधी ४ तक्रारी अन १७ मार्चला ५ मृत्यू आणि ध्वनीप्रदूषणासंबंधी ४ तक्रारी नोंद झालेल्या आहेत.
४. पोलीस अधिकार्याच्या मते राज्यात ठिकठिकाणी वास्तव्यास असलेले पर्यटक हणजूण आणि वागातोर येथील पार्ट्यांमध्ये सहभागी होतात अन् यामुळे मृत्यूंच्या नोंदी राज्यात ठिकठिकाणी झालेल्या आहेत. आधुनिक वैद्य फेन्टोन डिसोझा माध्यमांना म्हणाले, ‘‘गोव्यात ‘एक्सटसी’, ‘कोकेन’, ‘स्पीड’, ‘ब्लू पिल’ आदी अमली पदार्थांचे ‘पेन किलर’ (वेदनाशामक औषध) आणि मद्य यांचे मिश्रण करून त्यांची विक्री केली जात आहे. हे जीवघेणे मिश्रण आहे.’’ ‘हैद्राबाद नार्काेटीक्स एनर्फाेसमेंट विंग’चे एक अधिकारी माध्यमांना म्हणाले, ‘‘रेंडाक्स’ अहवालानुसार ‘ओक्झापाम’, ‘ट्रामाडोल’ किंवा ‘प्रीगाबालीन’ आदी औषधांचे अंश सापडले आहेत. ही औषधे अमली पदार्थ आणि मद्य यांच्यामध्ये मिसळून घेतली जातात. हे प्राशन केल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असते. अमली पदार्थ सहजतेने उपलब्ध असल्याने गोव्यात युवक आकर्षित होतात. ९ सप्टेंबर २०२५ मध्ये हणजूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अशाच एका प्रकरणात मृत व्यक्तीच्या शरिरात ‘ओक्झापाम’ औषधाचे प्रमाण ८० टक्के आढळले होते. वास्तविक ‘ओक्झापाम’ औषधाचे प्रमाण शरिरात १० टक्क्यांहून अधिक असू नये. ५ जानेवारीला झालेल्या ५ पैकी ४ मृत्यूंच्या घटनांमध्ये न्यायवैद्यकशास्त्र अहवालात मृत झालेल्यांच्या शरिरामध्ये मद्यासमवेतच ‘इथायलगुल्यूकोरोनाईड’ हे औषध, तर उर्वरित पाचव्या घटनेत मृत व्यक्तीच्या शरिरात ‘ट्रामाडोल’ हे औषध सापडले.’’
५. स्थानिकांच्या मते पार्ट्यांमध्ये ध्वनीप्रदूषण केले जाते आणि याचा आनंद केवळ अमली पदार्थाचे सेवन केल्यानंतरच घेता येतो. अनेक पार्ट्यांच्या स्थळांच्या बाहेर रुग्णवाहिका का ठेवल्या जातात ? पार्ट्यांमध्ये अतीसेवन केल्याने व्यक्ती भूमीवर कोसळणे, ही एक नित्याचीच गोष्ट आहे.
६. राज्यात १४ ते १७ मार्च या कालावधीत कार्निव्हल साजरा करण्यात आला आणि या काळात अमल पदार्थांमुळे ९ जणांचा मृत्यू झाला. (अशा कार्यक्रमांवर बंदी का घालू नये ? – संपादक)
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ