सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाने आत्महत्या केल्याचे प्रकरण

म्हापसा, ७ जून (वार्ता.) – सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या सॅम्युअल ब्रागांसा (वय २३ वर्षे) याने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता नवीन आणि गंभीर वळण मिळाले आहे. शवविच्छेदन अहवालात सॅम्युअल ब्रागांसा याचे डोके आणि डोळे यांना गंभीर दुखापत झाल्याचे अन् गळ्याच्या भागात गोळी लागल्याचा धक्कादायक तपशील समोर आला आहे. सॅम्युअल याला झालेली ही मारहाण त्याच्या मृत्यूच्या २४ घंटे आधी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गावसावाडा, म्हापसा येथे कचरा टाकल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमात प्रसिद्ध झाल्यानंतर सॅम्युएल याला म्हापसा पोलीस ठाण्यात अन्वेषणासाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. सॅम्युअलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता; मात्र आता शवविच्छेदन अहवालानुसार सॅम्युअलचा गळा आणि कवटी यांच्यामध्ये गोळी लागल्याची जखम असल्याचे स्पष्ट झाले आहे. शवविच्छेदन अहवालात सॅम्युअलचा उजवा डोळा सुजलेला होता आणि तेथेही हाड मोडल्याचे (फ्रॅक्चर) आढळले आहे. यामुळे ही जखम गोळीबाराच्या काही घंटे आधी झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. ही दुखापत जड वस्तूच्या जोरदार आघातामुळे झाली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आधीच या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करण्याचे आदेश दिले आहेत. सॅम्युअल याला पूर्वी मारहाण झाली होती का ? सॅम्युअलकडे ‘रिव्हॉल्वर’ कुठून आले ? या सर्व बाजूंचा सायबर आणि स्थानिक पोलीस कसून शोध घेत आहेत. ब्रागांसा कुटुंबियांनी या प्रकरणी जोपर्यंत व्हिडिओ काढणारी व्यक्ती आणि संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत सॅम्युअल याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. आत्महत्येच्या पूर्वी सॅम्युअलचे पोलीस ठाण्यात ७ घंटे अन्वेषण करण्यात आले. या काळातील सीसीटीव्ही चित्रीकरण देण्याची मागणी ब्रागांसा कुटुंबियांनी केली आहे.
सॅम्युअल याच्या मृत्यूच्या प्रकरणी सखोल आणि नि:पक्ष अन्वेषण करण्यासाठी म्हापसा येथे आंदोलन
म्हापसा – सॅम्युअल याच्या मृत्यूच्या प्रकरणी सखोल आणि नि:पक्ष अन्वेषण करण्याच्या मागणीसाठी ७ जून या दिवशी सायंकाळी म्हापसा येथे स्थानिकांनी मेणबत्ती मोर्चा काढून आंदोलन केले. या प्रकरणी ब्रागांसा कुटुंबियांना त्वरित न्याय देण्याची मागणी करण्यात आली.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा