Hanuman Jayanti In Pakistan : पाकमधील कराचीत हनुमान जयंतीनिमित्त निघाली मिरवणूक !

कराची (पाकिस्तान) – येथे १५ एप्रिल या दिवशी हनुमान जयंतीनिमित्त ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’ अशा घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक अनेक मशिदींसमोरून गेली; मात्र कुठेही त्यावर आक्रमण किंवा दगडफेक झाली नाही. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात महिलाही सहभागी झाल्या होत्या.

कराचीत आहे १ सहस्र ५०० वर्षे जुने मंदिर

हनुमान जयंतीला कराचीतील सहस्रावधी हिंदू १ सहस्र ५०० वर्षे जुन्या पंचमुखी हनुमान मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिरात ध्वजारोहण करण्यासाठी येणार्‍या हिंदूंची या मंदिरावर पुष्कळ श्रद्धा आहे. हनुमान जयंतीनिमित्त सहस्रो लोक झेंडे घेऊन कराचीच्या रस्त्यांवर पोचले.

संपादकीय भूमिका

कराचीत हनुमान जयंतीची मिरवणूक शांतपणे आणि कोणतेही आक्रमण न होता काढली जाणे, हे कुणालाही आश्चर्यजनकच वाटेल; पण अशी स्थिती नेहमी असेल, यावर धर्मांधांची मानसिकता पहाता विश्वास ठेवता येणार नाही, हेही तितकेच खरे !